
शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक
देशभरातल्या केवळ मराठीच नाही तर तमाम हिंदू बांधवांच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस. कारण त्या एका दिवसाच्या परिणामस्वरूप चांगले आणि सुखाचे दिवस आपण उपभोगत आहोत.
सोळाव्या शतकातला तो काळ होता. निजामशाह, आदिलशाह, औरंगजेब, सिद्दी, डच, इंग्रज, पोर्तुगीज यांसारख्या असंख्य परदेशी अजगरांच्या विळख्यात देश गुदमरत होता. देशातल्या सर्वसामान्य हिंदू जनतेला त्यांचा कैवारी असलेला हिंदू राजा हवा होता आणि त्याचवेळी महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज एका तेजस्वी सुर्यासारखे अखंड भारतवर्षाला परकीयांच्या गुलामगिरीच्या अंधकारातून मुक्त करण्यासाठी उभे ठाकले. आयुष्याची अनेक वर्षे ते परकीय सत्तांशी लढत राहिले आणि शेवटी ६ जून १६७४ आली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
राज्याभिषेक होणं किती महत्वाचं होतं हे आधी समजून घ्यायला हवं. कारण जोवर राज्याभिषेक झाला नव्हता तोवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख मुघल/ आदिलशाही दरबारात फक्त एक बंडखोर म्हणूनच केला जात होता. राज्याभिषेकाची बातमी जेव्हा औरंगजेबाच्या कानावर पडली तेव्हा त्याच्यावर झालेल्या आघाताची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही कारण एकदा का तख्त निर्माण झालं की सलतनत संपवणं जवळजवळ अशक्य असतं हे तो पुरतं जाणून होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने औरंग्याच्या दख्खन काबीज करण्याच्या स्वप्न पहिला सुरुंग लागला होता.
हा झाला इतिहास. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामुळे आपल्याला जो गर्जा महाराष्ट्र लाभला आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण कोणती पावलं उचलवतोय ह्याकडे पुन्हा एकदा लक्ष अत्यंत गरजेचं झालं आहे.
बऱ्याचदा असं होतं की एखादं सरकार कोणतीतरी योजना आणतं, मग सरकारी काम बारा महिने थांब या न्यायाने ती योजना प्रत्यक्षात येईपर्यंत सरकार बदलतं आणि मग दुसरं सरकार ती योजना रद्द करतं. मुळात सरकार बदललं किंवा सत्ता कुणाचीही असली तरीही त्याचा परिणाम ह्या सगळ्या बाबींवर होता कामा नये.
मागे समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यावरून खूप वाद झाले होते. स्मारक हवं की नको, स्मारक बांधण्यापेक्षा महाराजांच्या किल्ल्याची डागडुजी करावी वगैरे वगैरे अनेक कल्पना त्यावेळी मांडण्यात आल्या पण दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करण्यावर कुणी लक्ष घातलेलं फारसं दिसत नाही. किल्ल्यांची डागडुजी आणि जतन झालंच पाहिजे नाहीतर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण महाराजांचं महत्त्व कसं पटवून देणार… महाराज जर फक्त आपल्या मनात, गोष्टीत आणि पुस्तकातच राहिले तर न जाणो पुढच्या शंभर दोनशे वर्षांनी लोकं त्यांना फक्त एक सुपरहिरो म्हणूनच ओळखतील. महाराजांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंचे जर जतन केले तर येणाऱ्या पिढीला ते प्रेरणा देतील.
राज्यकर्त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांचे विचार, त्यांची शिकवण आत्मसात करायला हवी. राज्यातली आणि देशातली राजकारणाची परिस्थिती पाहता त्याची नितांत गरज आहे. कारण आताच राजकारण इतकं स्वार्थी आणि गलिच्छ झालं आहे की फक्त सत्तेसाठी लोकांनी निवडून दिलेले नेते लाचारासारखे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा स्वाभिमान विकत आहेत. जनतेच्या मतांचं कुणाला काहीही पडलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणं तर सगळ्यात आधी बंद व्हायला हवं कारण महाराज हा काही राजकारण करण्याचा विषय नाही. महाराज महाराष्ट्रातील जनतेच्यात जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे त्याचा आधार घेऊन खुर्ची मिळवण्याचा विचार करणाऱ्यांनी आता तरी हे लक्षात घ्यायला हवं की जनता सूज्ञ आहे. त्यामुळे फक्त मराठी मराठी, महाराज महाराज म्हणून मतं मागण्यापेक्षा जनतेच्या विकास कामांकडे लक्ष दिलं तरच जनता पुन्हा निवडून देईल नाहीतर एकच चूक पुन्हा पुन्हा करत राहायला नवीन तरुण पिढी काय मूर्ख नाही.
No Comment