
Be Positive
सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारी आणि इतर ओळखीच्या व्यक्ती कोरोनाशी दोन हात करत आहेत.
पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात येतेय की ज्या व्यक्तीच्या घरी कोरोनाने प्रवेश केला त्या व्यक्तीच्या घरातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आजूबाजूला राहणारे शेजारीसुद्धा इच्छा असूनही मदत करायला धजावत नाहीत. तसं पाहिला गेलं तर ह्यात चूक कुणाचीच नाहीये कारण सगळ्यांनाच आपल्या जीवाची धास्ती असते. पण आपलं आरोग्य सांभाळून आपण इतरांना मदत नक्कीच करू शकतो.
२०२० हे जगण्याचं वर्ष होतं तर २०२१ हे जगण्यासाठीच्या संघर्षाचं वर्ष आहे. गेल्यावर्षीपेक्षा ह्या वर्षीची परिस्थिती खूप भयानक आहे आणि आपल्याला त्यावर मात करायची असेल तर परस्परांतील हेवेदावे विसरून एकत्र येण्याची गरज आहे.
आपण काय करू शकतो??
१) सध्या हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता असल्यामुळे बऱ्याच जणांना घरीच क्वारंटाइन करण्यात येत आहे. आणि त्यामुळे त्या घरातील कुणीही घराबाहेर पडू शकत नाही. अशा वेळी आपण योग्य ते अंतर राखून आणि सॅनिटाईजरचा वापर करून त्यांना जीवनावश्यक गोष्टी, औषधे पुरवली तर त्यांनाही थोडा आधार वाटेल. अनेक ठिकाणी असं देखील होतंय की एखाद्या घरातल्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्या घराला पूर्णपणे वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण होतेय. त्यामुळे त्या घरात राहणाऱ्या लोकांना जेवण, औषधं अशा अनेक गोष्टींसाठी बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतंय. या संकटकाळात आपण एकमेकांच्या उपयोगी पडणं खूप गरजेचं आहे.
२) अनेक व्यक्तींना कोरोनाशी लढण्यासाठी रक्त, प्लाझ्मा, ऑक्सिजन बेड, Remdeaivir यांची गरज आहे. इतर वेळी आपल्या सर्व व्हाट्सएप ग्रुपचा वापर केवळ चर्चेसाठी आणि बातम्यांसाठी केला जातो पण आता त्याचा योग्य उपयोग करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याकडे प्लाझ्माची, रक्ताची, ऑक्सिजन बेडची किंवा इतर तत्सम गोष्टींची पूर्तता करणाऱ्यांची माहिती असेल तर कृपया ग्रुपवर शेअर करत राहा. तसेच कुणाला या गोष्टींची गरज असेल तर तेही शेअर करा.
३) गरज असेल तरच घराबाहेर पडा हे सरकारी यंत्रणांना आपल्याला वारंवार सांगावं लागतंय ह्यावरूनच आपण आपल्या जीवनाविषयी किती जागरूक आहोत याची प्रचिती येतेय. परिस्थिती गंभीर असतानादेखील लोकं स्वतःची काळजी घेताना दिसत नाही. आपण स्वतःची कितीही काळजी घेतली तरीही समोरच्याच्या चुकीमुळे आपण अडचणीत येऊ शकतो त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणं टाळा आणि गरज पडलीच तर योग्य ती खबरदारी घ्या.
©प्रतिलिखित
No Comment