
रक्षाबंधन (भावना तीच, साजरी करण्याची पद्धत वेगळी)
रक्षाबंधन. हिंदूंचा एक पवित्र सण. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ असेही म्हणतात. अर्थात रक्षाबंधन म्हणजे काय, ती का साजरी केली जाते याबाबत मी जास्त काही बोलणार नाही कारण ते सर्वांनाच माहित आहे. अगदी शिशुवयापासूनच आपण रक्षाबंधन साजरी करत आलेलो आहोत.
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते.अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूॅं बादशहाला राखी पाठवली व हुमायूॅं बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले.
हे झालं जुन्या काळातलं . पण बदलत्या काळानुसार रीती बदलल्या. भावना तीच राहिली पण सण साजरा करण्याची पद्धत बदलली. आपलं रक्षण करणाऱ्याबरोबरच ह्या जे इतरांचं रक्षण करतात त्यांना राखी बांधायची नवीन पद्धत सुरु झाली. आणि मग आपल्या घरापासून कोसो दूर असलेल्या सैनिकांबद्दल कृतज्ञेतेची भावना व्यक्त करण्यासाठी देशाच्या सीमेवर रक्षाबंधन सोहळा संपन्न होऊ लागला. आपल्या रक्षणास सदैव तत्पर असणारे पोलीस, डॉक्टर; आपल्याला सुखसोयींसाठी झटणारे कर्मचारी यांना राखी बांधून, त्यांना ओवाळून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची नवी पद्धत सुरु झाली.
रक्षाबंधन हा सण केवळ बहीण भावापुरताच मर्यादित न राहता सगळ्या नात्यांशी जोडला गेलेला आहे. एक बहीण दुसऱ्या बहिणीला राखी बांधते, पत्नी आपल्या पतीला राखी बांधते तर काही ठिकाणी मुलगा आपल्या वडिलांना राखी बांधून त्याच्यासोबतच संपूर्ण कुटुंबाचं रक्षण केल्याबद्दल वडिलांचे आभार मानतो. आपण ‘माहेरची साडी’ ह्या मराठी चित्रपटात पाहिलं आहेच बहिणीचा भाऊ अपघात झाल्यावर अभिमानाने सांगतो ‘ज्या हाताला ताईने राखी बांधली तो हात शाबूत राहिला. असं वाटतंय की दोन्ही हातांना राखी बांधून घ्यायला हवी होती.’
हल्ली भावनेसोबतच फॅशन सुद्धा दिसू लागली आहे. म्हणजे लहान मुलांसाठी कार्टून वगैरेंच्या राख्या असायच्या पण ह्या वर्षी बाजारात खाद्यपदार्थांसारख्या दिसणाऱ्या राख्या आल्या आहेत. थोडक्यात काय तर काळानुसार आपण सण साजरे करण्याच्या पद्धती बदलतो पण आपले विचार, त्या मागचा उद्देश कायम राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी काल परवा तुर्की देशात घडलेली घटना पाहिली की वाटतं स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.
सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे सर्व सण साधे पद्धतीने साजरे करण्याचं आवाहन सरकार करत आहे. म्हणजे या वेळी रक्षाबंधनांसाठी दरवर्षीप्रमाणे कुणाच्या घरी जाता येणार नाही. पण मेसेज मेसेज खेळण्यापेक्षा एक फोन कॉल करून आपण आपल्या माणसांशी नक्कीच बोलू शकतो. त्यांना स्वतः बनवलेल्या राख्या व्यवस्थित काळजी घेऊन पाठवू शकतो. तुम्ही स्वतः बनवलेली राखी पाहून जर तुमच्या माणसांच्या चेहऱ्यावर हास्य नाही उमटलं तर नवलच.
© PRATILIKHIT
No Comment