
चौकट
“काय साहेब, आजकाल बरंच काय काय लिहिताय नवीन.” त्याने फोन उचलताच पलीकडून आवाज आला.
“हो रे.. लॉकडाऊन आहे ना. बराच वेळ मिळतोय कामाव्यतिरिक्त. पण तुला आज एकदम माझी आठवण कशी काय आली? दीड वर्ष झालं असेल शेवटचं बोलून. माझ्या लिखाणाला प्रतिसाद देतोस तेवढाच. वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा मेसेज वरूनच बोललो आपण.”
“हो रे.. बराच बिझी होतो कामात.”
“अरे हो.. बरोबर.. युट्युबर ना तुम्ही. मोठी माणसं..”
“मोठी माणसं…कसलं काय..” सार्थक उसनं हसू म्हणाला.
“बोल बोल.. काय म्हणतोस बाकी.”
“काही नाही रे.. असंच बोलावसं वाटलं म्हणून फोन केला. ”
“पण आवाजावरून तरी तसं वाटत नाहीये मला. त्यामुळे उगाच फिरवाफिरवी न करता काय झालंय ते सांग.”
“आजकाल व्हिडिओला व्युज नाही येत रे इतके.” सार्थक थोड्या नाराजीनेच म्हणाला.
“ओह. असं आहे तर. पण तू तर व्हिडिओ तुझी आवड जोपासण्यासाठी करायचास ना. चांगला जॉब तर आहेच तुझ्याकडे.”
“हो. आवड म्हणूनच करायचो पण कोणत्याही कलाकाराची एवढी माफक इच्छा असते रे की त्याच्या कलेला प्रेक्षकांची दाद मिळावी. मी तर काय प्रोफेशनल युट्युबर नाहीये. त्यामुळे पाहणाऱ्यांचा प्रतिसाद हीच माझी कमाई.”
“बरोबर बोललास.”
“आणि हे तुला काही वेगळं सांगायला नको. कारण तू सुद्धा आवड म्हणूनच लिहितोस ना. ”
“हो. ”
“पण आधी तू आठवड्याला एखाद पोस्ट टाकायचास . काही सुचलं तर लिहून ठेवायचास पण आठवड्याला एक पोस्ट हे तुझं ठरलेलं होतं. पण हल्ली तू खूप पोस्ट टाकतोस म्हणून म्हटलं तुला विचारावं की हा बदल कसा काय?”
“ती एक वेगळीच कहाणी आहे.” मी हसतच म्हणालो.
“मला आवडेल ऐकायला. एवढी मोठी नियती कादंबरी वाचली तुझी तर हे नाही का ऐकून घेणार. ”
“हाहा.. अरे काय झालं होतं, तुझ्यासारखेच प्रश्न मला पडायचे. म्हणजे व्हायचं असं की मी काहीतरी लिहायचो आणि मला वाटायचं की हे वाचकांना आवडेल. त्या लिखाणाकडून खूप अपेक्षा असायच्या मला पण त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळायचा नाही. आणि जी पोस्ट अशी सहज लिहायचो त्याला फार चांगला प्रतिसाद मिळायचा. ”
“अच्छा.. पुढे??”
“मग मी सहज माझ्या एका लेखक मित्राला कॉल केला आणि त्याच्याशी बोललो. तो व्यावसायिक लेखक आहे.”
“काय म्हणाला तो?” सार्थकने उत्सुकतेने विचारलं.
“बघ कसं असतं ना सगळ्यांचीच आवड सारखी नसते. आपलंच बघ ना. मला ऐतिहासिक वाचायला आवडतं पण लिहितो मी प्रेमावर वगैरे. तुला विज्ञान विषयक वाचायला आवडतं आणि म्हणून तू व्हिडिओ सुद्दा त्याच बद्दल बनवतोस.”
“हो. बरोबर.”
“आणि शिवाय लोकांची चव सतत बदलत असते. आज लोकांना अमुक आवडतंय तर उद्या त्यांना भलतंच काहीतरी आवडेल.”
“हो. हे सुद्धा मान्य आहे. ”
“आपण आपले विचार व्यक्त करण्यासाठी, आपल्या भावना मांडण्यासाठी लिहितो. वाचक आपले विचार वाचतात, त्याच्याशी रिलेट करतात आणि त्यांना ते आवडतात. याचा अर्थ असा नाही ना की आपण लिहू ते वाचकांना आवडेलच असं. प्रत्येकाची मते ही भिन्न असतात. काही जणांना आवडेल तर काहींना नाही आवडणार. ”
“हे तर धरूनच चालतो ना आपण. कधी निगेटिव्ह कमेंट पण येतातच ना. मागे नाही का तुझ्या एका पोस्टला आली होती. केवढा डिस्टर्ब झाला होतास तू.”
“हो. अगदी मला विचारशील तर मी सुरुवातीला वाचकांना काय आवडत असेल, मी काय लिहिलं की त्याला जास्त प्रतिसाद मिळेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लिहायचो. त्यामुळे एक चौकट मी स्वतःभोवतीच निर्माण केली होती. आणि त्याच चौकटीमध्ये मी लिहायचो. त्यामुळे माझं लिखाण सीमित असायचं. ”
“हं… हे मागे तू सांगितलं होतस मला की बऱ्याच गोष्टींवर लिहायचं मन असूनसुद्धा तू लिहीत नाहीस.”
“हो. आता तुला मागच्या आठवड्याचं एक सांगतो. मी बसल्या बसल्या सहज एक कविता लिहिली. इतकी काही भारी नव्हती पण ठीकठाक होती. त्याच वेळी मी माझ्या एका मित्राशी व्हाट्स अँप वर बोलत होतो तर त्याला पाठवली. तो म्हणाला ‘छान आहे’. मला खरंतर ती इतकी काही चांगली वाटत नव्हती. तसं मी त्याला बोलून दाखवलं. तर तो म्हणाला ‘दरवेळी अत्तर निघायला आपण काय कस्तुरी मृग आहोत का???’ कधीतरी आपण सुद्धा सामान्य, फटकळ असं लिहू शकतोच की.'”
“हे मात्र एकदम बरोबर बोललांय तुझा मित्र.”
“बघ कसं आहे. आपल्याला आवडतंय तर आपण लिहायचं. आपण व्यक्त व्हायचं. नंतर वाचकांना किंवा पाहणाऱ्याला ते आवडतं की नाही हा पुढचा प्रश्न. पण त्याचा विचार आधीच करून आपण आपली कल्पनाशक्ती का बांधून ठेवावी? स्वैर सोडावं तिला. मारू दे किती भराऱ्या मारायच्या तितक्या. आणि हे फक्त लेखक किंवा युट्युबर यांनाच लागू होतं असं काही नाही. बरेच जण असे आहेत ज्यांना स्वतःला काय आवडतं, कशात आनंद मिळतो याबद्दल विचार न करता दुसरा करतोय ते आपल्याला कसं करता येईल ह्याचा विचार करतात. कसं मिळणार मग मानसिक समाधान?? आपल्याला काय आवडतं ह्याबद्दल विचार करून त्यात स्वतःशीच स्पर्धा करून सुधारणा करण्याचा प्रयत्न करायला हवा ना. आपण आपलं काम करत राहायचं. त्यातूनच आपली प्रगती होत राहील.”
“अगदी बरोबर बोललास भावा. बरेच विषय आहेत ज्याबद्दल लिहून ठेवलंय पण व्हिडिओ नाही बनवला. लागतो कामाला. धन्यवाद भाई.”
“शुभेच्छा. व्हिडिओची लिंक पाठव नक्की. वाट पाहतोय.”
No Comment