
स्पर्श
नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार… संध्याकाळपासून सगळ्याच न्यूज चॅनल वर ही बातमी दाखवली जात होती. कुणी त्या पीडित मुलीच्या आईवडिलांना त्यांच्या भावना व्यक्त करायला सांगत होतं तर कुणी घटनास्थळी जाऊन काय घडलं असेल याची कथा बनवण्यात मग्न होतं. सारख्या सारख्या त्याच बातम्या दाखवतात म्हणून निशा तिथून निघाली आणि रूममध्ये जाऊन मोबाईलवर टाईमपास करत बसली.
निशा, दहावी चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर पुढे शिक्षणासाठी त्यांच्या गावी सोय उपलब्ध नसल्याने ती शहरात आली होती. घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे कॉलेजच्या हॉस्टेलवर राहण्याशिवाय पर्याय नव्हता. परीक्षा नुकतीच संपली होती आणि दोन तीन दिवसातच सुट्टीसाठी गावी जायचं या विचारात तिने सगळी बॅग वगैरे भरून ठेवली होती. पण आज का कोण जाणे तिचं मन इतर कशात लागत नव्हतं. सारखी ती टीव्ही वरची बलात्काराची बातमी डोळ्यासमोर येत होती. कोणतीतरी गोष्ट तिला अस्वस्थ करत होती. विचार करून करून डोकं दुखायला लागलं तसा तिने लाईट बंद केला आणि त्यातच तिचा डोळा लागला.
” सोडा… सोडा मला… आई….जीव गुदमरतोय माझा… सोडा…” ती एकदम किंचाळत उठली.
“निशा… काय झालं??” बाजूच्याच बेडवर झोपलेल्या सोनलने उठून लाईट लावत विचारलं. आणि निशाच्या त्या अवताराकडे बघून क्षणभर तिची भीतीने गाळणच उडाली. निशाचा चेहरा पूर्णपणे घामाघूम झाला होता, हातपाय थरथरत होते आणि चेहऱ्यावर कसलीतरी भीती स्पष्ट दिसत होती.
“काय झालं ?? वाईट स्वप्न पडलं का??” तिला पाणी देत सोनलने विचारलं.
तिने रडत रडतच सोनलला मिठी मारली.
“काय झालं?? सांगितलं तरच कळणार ना मला.” सोनल तिला धीर देत म्हणाली.
“कसं सांगू.. कळत नाहीये..”
” कसलं स्वप्न पडलं तुला??”
“बाबा….” तिने सोनलकडे पाहत अगतिकपणे विचारलं.
“काय झालं त्यांना.. ”
” काही नाही..”
” काय पाहिलंस स्वप्नात मला नीट सांगणार आहेस का तू?” सोनलने आता जरा दटावूनच विचारलं.
“लहानपणीची मी दिसले गं मला स्वप्नात. ”
” अरे वाह..छानच आहे ना मग..लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील ना..”
“ज्या दिसल्या त्या फार चांगल्या नव्हत्या गं..”
“म्हणजे???” सोनलने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.
“आता कसं सांगू तुला??” निशाने जरा चाचरतच विचारलं.
“सांगितलंस तर तुलाच बरं वाटेल गं”
“माझ्यावर जबरदस्तीचे प्रयत्न झालेत गं लहानपणी.” निशाने एकाच दमात सांगून टाकलं.
“काय?????” सोनलने एकदम आश्चर्याने विचारलं.
“हो..”
“कुणी केला??? तू तुझ्या आईवडिलांना सांगितलं नाहीस ह्या बद्दल काही ??”
“तेव्हा लहान होते गं.. काय कळत नव्हतं. की आपल्यासोबत होतंय ते नक्की काय आहे ते. आज बातम्यांमध्ये पाहिलं आणि सगळं आठवलं. तोच तो नकोसा स्पर्श, तोच तो मी केलेला विरोध, गोड गोड बोलून, चॉकोलेट बिस्कीटचं आमिष दाखवून साधलेली जवळीक, माझी होणारी तडफड… ”
“कुणी केलं हे??”
“कुंपणानेच शेत खाल्लं..”
” म्हणजे???”
“बाबा…” तिने मान खाली घालत उत्तर दिलं.
“काय???? तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं नाही का वाटत तुला??”
“स्वतःच्या जन्मदात्या बापावर कोण गैरसमजातून असा आरोप करेल गं?? चांगला वाईट स्पर्श ओळखण्याची देणगी देवाने स्त्रीला जन्मापासून दिली आहे ना..आपल्याला कळत असतं की जे काही आपल्यासोबत होतंय ते चांगलं नाहीये, आपल्याला त्याचा त्रास होत असतो पण जे घडतंय ते नक्की काय आहे ह्याबाबत आपण अगदी अनभिज्ञ असतो ना. ”
“पण हे सगळं खूप शॉकिंग आहे गं… मी कधीच असा विचार नव्हता केला… आपल्याच मुलीवर अशी वाईट नजर टाकणं म्हणजे…सुन्न झालीये मी एकदम.”
“असं कसं कोण करू शकतं ना. एवढ्या पवित्र नात्याला कसं कुणी कलंकित करू शकतं. इथे आपल्याला कुणा इतरांवर असा प्रसंग ओढवला तरी चीड येते आणि दुसरीकडे..”
“तसं पाहायला गेलं तर ह्याला मुख्यतः इंटरनेटवर जे अश्लील व्हिडीओ असतात ना ते जबाबदार आहे. त्यातच असं गलिच्छ काहीतरी दाखवलेलं असतं. वडील-सावत्र मुलगी , आई-सावत्र मुलगा अशी नाती अत्यंत घाणेरड्या प्रकारे दाखवली जातात त्यात. आणि आपल्या लोकांवर आधीच पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यात जे दाखवतात ते बरोबर वाटतं त्यांना. आणि जेव्हा वासनेने माणूस आंधळा होतो तेव्हा त्याला नात्याचं भान राहत नाही. आपण आपल्या कुटुंबव्यवस्थेत संस्कारांच्या आणि नीतिमत्तेच्या मोठमोठ्या गोष्टी मात्र फार पूर्वी पासून असे प्रकार आपल्याकडे होत आहेत. मात्र त्यावर कधीच खुली चर्चा केली जात नाही. कारण घराण्याची बदनामी होण्याच्या भीतीने वडीलधारे जाणीवपूर्वक त्यावर पांघरूण घालतात. आणि त्या ओढाताणीत कित्येक लहानग्यांचं बालपण भरडून निघतं. ”
“खरं आहे..अशा अनेक निरागस मुली असतील ज्या कदाचित आता ह्या क्षणाला असं दुःख भोगत असतील. ही विकृती आहे ग. माणूस जातीची.”
“आता ह्यावर काय करायचं ठरवलंय तू???”
“मी हे कुणाला सांगूही शकत नाहीये कारण आता कुणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि नातेसंबंध उगाच ताणले जातील. खूप वर्ष होऊन गेली आहेत ह्या गोष्टीला. पण ह्या मनोवृत्तीला विरोध होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच व्यक्त होणं मला गरजेचं वाटलं. हे वाचून लोकांची मनोवृत्ती बदलेल आणि काहीतरी सकारात्मक बदल होतील हीच अपेक्षा. ”
© PRATILIKHIT
Very good Pratik .. keep it up.
Thank you 😊😊