Uncategorized
पोशिंदा
भर उन्हात आभाळ दाटलं
उत्साहित झाली सारी प्रजा
कुदळ फावडं खांद्यावर मारून
निघे पुन्हा शेतकरी राजा
गतवर्षीचा काळ खडतर
केली होती पेरणी दुबार
माथ्यावर आधीच कर्जाचा बोजा
त्यातच घेतले बीबियाणं,खत उधार
अन हुलकावणी दिली पावसाने
पार होत्याच नव्हतं झालं
घामाने हिरवंगार झालेलं शेत
उन्हाने पार सुकून गेलं
गाठीशी असलेले पैसे संपले
घरदारही गहाण पडलं
सुखी संसाराचं स्वप्न
पुन्हा एकदा धुळीला मिळालं
नजर लागली संसाराला
आप्तेष्टांची मायाही आटली
हास्य पार विरून गेलं
घरावर दुःखाची छाया दाटली
भल्या पहाटे निघतो धनी
माझ्या मनी विचारांचं काहूर माजतं
लपवून ठेवते दोर,कीटकनाशकं
निव्वळ कल्पनेनेच घाबरून जायला होतं
© PRATILIKHIT
No Comment