हातावरचं पोट…

हातावरचं पोट…

 

” काय वं… तुमाला काय वाटतं?? अजुन किती दिस चालेल हे समदं..???” लक्ष्मीने संत्याच्या बाजूला बसता बसता विचारलं.

” आता म्या तरी काय सांगू तुला ??? काय बी खरं वाटत नाय बघं…कुटबी काम मिळेना झालंय.. कल परवा हिंडलो की मी..कुणी काम देईल या आशेनं.. पण कुणी साधं बोलायला पण येत नाय..मुकादमला फोन केला व्हता म्या..तो तर बोलला की अजून महिनाभर तरी यात काय बदल होणार नाय..”

“महिनाभर…समदं कठीण होऊन राहिलंय हो…घरात काय बी नाय खायला..आता लेकरू खेळून दमून भागून घरला येईल त्याला कंच्या तोंडानं बोलू की घरात काही नाही म्हणून…”

“आता त्याला आपण तरी काय करायचं…सगळीकडेच बंद आहे तर कुठून आणायचं पैंकं..”

संत्या आणि त्याची लक्ष्मी दोघेही खोपटाच्या एका कोपऱ्यात बसून बाहेर इतर मुलांसोबत खेळणाऱ्या आपल्या आठ वर्षांच्या पोराकडे अगतिकपणे बघत होते. आता थोड्याच वेळात पोरगं खेळून दमून भागून घरी येईल आणि आशेने आपल्याकडे खायला मागेल. आणि त्याला आपण साधा भाकर तुकडाही देऊ शकत नाही याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तसे ते दोघेही मोलमजुरी करायचे. पण पोराला खूप शिकवायचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी त्याला म्युनिसिपालटीच्या शाळेत घातलं होतं. भल्या पहाटे उठून , सर्व आवरून ते दोघे मजुरांच्या बाजारात हजर राहत आणि कुण्या मुकादमाने त्यांना एक दिवसाच्या कामासाठी भाड्याने घेतलं की मग त्या जागेवर जाऊन दिवसभर मोलमजुरी करून जे पैसे येतील त्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि आणि घरखर्चासाठी पैसे त्यांना मिळत. पण कोरोनाव्हायरस मुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आलं आणि हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांची पार वाताहत झाली.

” माय..खूप भूक लागलीया…काय तरी खायला दे की…” घरात येता येताच पप्याने एकच कल्ला केला. संत्या आणि रखमा दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिले.

” ये बाळा इथं..तुला गोष्ट सांगतो..मग जेवू आपण..” संत्याने आपली मांडी सावरत पप्याला अलगद आपल्यापाशी बसवून घेतलं.

” एक गाव व्हतं.. तिथं एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होती. त्यांचं बी तिथं एक शेत व्हतं. पण त्या गावात पाऊसच पडायचा न्हाई..शेतं पार सुकून जायची..म्हणून मग एक दिवस शेतकरी आणि त्याची बायको शहाराकडं आली.तिथं त्यांचं कुणीबी ओळखीचं नव्हतं..”

” बाबा..आपलं पण असल ना असंच गाव..”

“व्हय आहे ना…लई लांब हाय..तू मोठा झाला ना की आपण जाऊ हा तिकडं…तर म्या काय सांगत व्हतो…हा…ती दोघं बी शहाराकडं आली..मिळेल ते काम करून, मोलमजुरी करून त्यांनी तिथं एक झोपडी बांधली…”

” आपली हाय तशी????” पप्याने उत्सुकतेने विचारलं.

” व्हय…अगदी आपली हाये तशीच…दोघांचं बी तसं बरं चाललं व्हतं…दिवसाच्या दिवसा पैकं मिळत व्हतं. कधी कधी कमी मिळायचं तर कधी कुणी खुश होऊन जास्त बी द्यायचा. कुणी तर जेवण बी द्यायचा रातच्या करता…”

” रातच्याला जेवण…लईच चांगली माणसं व्ह्ती म्हणजे…तुम्हाला भेटली का व कवा अशी माणसं…”

” व्हय तर…मला आणि तुझ्या आईला बी देतात की कवा कवा जेवण…आम्ही आणतो ना तुझ्याकरता…”

जिथे कामाला जाईल तिथे दुपारचं उरलेलं अन्न त्यांना मिळतं हवं समजण्याइतपत पप्या खूप लहान होता. त्यामुळे त्याला अधिक काही समजावण्याच्या भानगडीत संत्या पडला नाही..

” असं सगळं चाललेलं असताना एकदा एक भयंकर रोग आला…सगळी माणसं पटतात मारायला लागली…म्हणून मग सगळं बंद झालं…त्या दोघांनाबी कुठं काम मिळत नव्हतं. दोघेबी उपाशी राहू लागले..”

” पण बाबा…त्यांना काम मिळत नव्हतं तर त्यांनी त्याच्या गावी परत जायचं ना…तिथं त्यांना राहता आलं असतंच की..”

” त्यांची लोकं बी त्यांना त्यांच्या गावात घेईनात..कारण तो रोगच असा व्हता की एकाला झाला की लगेच दुसऱ्याला व्हायचा..गावातल्या लोकांनीबी त्यांना गावात घेतलं नाई.. त्यांनी लई गयावया केल्या पण कुणिबी त्याचं ऐकलं नाई..”

” मग पुढे काय झालं बाबा..??

” पुढची गोष्ट तर मला बी अजून माहीत नाई बाळा..काय होईल कसं होईल…कधी संपेल यो वनवास….ईचार करून करून…”

तो पुढे काही बोलणार इतक्यात रखमाने पप्याला हाक मारली. समाजसेवा करणाऱ्या काही लोकांनी वस्तीमध्ये जेवण आणून दिलं होतं.ते घेण्यासाठी वस्तीतल्या लोकांची एकच झुंबड उडाली होती. आजचा दिवस तर पार पडला…पुढेचे दिवस कसे पार पडतील…संत्या मात्र याच विचारात होता…

© PRATILIKHIT

12150cookie-checkहातावरचं पोट…

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

2 Comments

  1. mast liha aahe sir ya varti me ek skitt kiva short film basvu shakto ka tumcha sammati asel tar. please sir

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories