
आठवणीतली दिवाळी
आठवणीतली दिवाळी
दिवाळी म्हटली की आपसूकच दिवाळीची सुट्टी ही आलीच. आता तशी ती एक दोन दिवसच मिळते पण जेव्हा शाळेत होतो तेव्हा सहामाही परीक्षा झाल्यावर चांगली महिनाभर सुट्टी असायची. तेव्हा लहान होतो त्यामुळे दिवाळी या सणाचं महत्व वगैरे इतकं माहीत नव्हतं, पण महिनाभर अभ्यास नाही, नुसता धांगडधिंगा, फराळ, फटाके, रोषणाई इतकंच काय ते आम्हाला समजायचं.
गणपतीनंतर दिवाळीची आम्ही सगळे मनापासून वाट पाहायचो..दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच अभ्यंगस्नान… सकाळी लवकर उठवून आई जेव्हा चिरोटे फोडायला द्यायची ना..तेव्हा अंगात एकदम उत्साह संचारायचा..रावण, मारीचासारखा तगडा राक्षस पायाखाली चिरडल्याचा फील यायचा. त्यानंतर मस्त उटण्याने अंघोळ…मला मात्र तेव्हा अगदी विचित्रच वाटायचं..कशाला लावतोय हे मातीसारखं अंगाला..आणि डोक्याला लावायचं तेल आपण हाताला का बरं लावतोय..असे बरेच प्रश्न पडायचे..पण एकदा शिवाजी द बॉस मधल्या रजनीकांत ला मुलतानी मिट्टी मध्ये अंघोळ करताना पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी मी टब भरून उटण्यासाठी हट्ट केल्याचं मला आठवतंय..
अंघोळ वगैरे झाली की मस्त नवीन कपडे घालून आम्ही सगळे एकत्र फटाके वाजवायचो..फटाक्यांची माळ सुटी सोडून एक एक फटाका वाजवणं आमचं आवडतं काम..ऍटम बॉम्ब, पाऊस, भुईचक्र, लक्ष्मीबार, डबलबार, बाण, फॅन्सी फटाके वगैरे वगैरे फोडण्यात सकाळ निघून जायची. फटाके फोडून झाल्यावर सगळे फराळ करण्यासाठी आपापल्या घरी पळायचे.. आणि नंतर पुन्हा ठरलेल्या ठिकाणी भेटायचे. भेटल्यावर फटाके फोडलेल्या ठिकाणी न फुटलेले फटाके शोधायचे आणि त्यातली दारू काढून एका बॉक्स मध्ये जमा करायचो. बॉक्स भरला की त्यामध्ये वात टाकून ती पेटवून द्यायचो. क्षणात पेट घेतल्यावर त्या दारूचा डोळे दिपावणारा भडका उडायचा.
संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर सगळे मेंबर परत एकत्र जमायचे..दिवाळीच्या दिवसात हमखास खेळला जाणारा खेळ म्हणजे चोर पोलीस..दिवाळीतल्या खोट्या खोट्या बंदुका घेऊन आम्ही पूर्ण गावभर चोर पोलीस खेळायचो. सध्या खेळल्या जाणाऱ्या पबजी, सीएसचा तो खरा फील असायचा.जर एखादा पोलीस पकडायला येत असेल तर आम्ही त्याच्या पायाखाली आपटी बॉम्ब फेकायचो. किंवा बंदुकीतला रोलकेप बाहेर काढून चपलेने घासून फोडायचो.
थोडासा अंधार पडला की पुन्हा आमचे वीर फटाक्यांची हत्यारं घेऊन बाहेर पडायचे. रात्री सकाळपेक्षा थोडी जास्तच व्हरायटी असायची. तेव्हा मला सापाची गोळी सुद्धा खूप आवडायची. धुराचा त्रास होतो म्हणून नाकाला रुमाल बांधून मी सापाच्या गोळीची पाकिटच्या पाकिटं पेटवून द्यायचो. बाण जोरात उडावा म्हणून हातात पकडून वात पेटण्याच्या वेळी तो हाताने जोरात हवेत उडवायचो. मोठा बॉम्ब फोडताना भीती वाटायची म्हणून अगरबत्तीने वात पेटवण्याऐवजी फुलबाजी पेटवून त्याच्या शेवटच्या टोकावर बॉम्बची वात ठेवून आरामात चालत लांब जायची टेक्निक वापरायचो.
एक गोष्ट मला कधीच जमली नाही ती म्हणजे रांगोळी..एक तर ती चिमटीत येत नाही आणि मुठीत आली तर खाली पडत नाही. बहुतेक वेळी मी रांगोळीची पार वाट लावून टाकायचो. माझ्या बहिणी खूप छान रांगोळी काढायच्या..त्यात सुपारीवर रांगोळीचा अभिषेक करून गोल गोल डिझाईन काढणे, एवढंच काय ते मला जमायचं. आता तर रांगोळी काढायचे पण साचे आलेत बाजारात.
हल्ली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर सगळ्यांचा कल असतो पण आजही लहान मुलांना फटाके वाजवताना पाहिलं की आमच्या लहानपणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
No Comment