नियती……(पर्व दुसरे  भाग २०)

त्या दिवसापासून रश्मी आणि विराजसच अधून मधून बोलणं व्हायचं..त्यांच्या बोलण्यातूनच त्यांच्यातील मैत्री वाढत होती. त्याचे ग्रुप सोबत असताना मात्र त्यांच्या तोंडातून एक अक्षर निघत नसे. पण त्यांच्या जीआर माधुरीनेच निखिलला सांगितलं की आपण सगळे एकत्र आहोत तर आपण एकत्रच ट्रिप करूया. निखिलने इतरांचं मत घेतल असता सिद्धेश आणि गौरवने सरळ नापसंती दर्शवली. पण ‘ आपण इथे एकत्र आहोत..कधी आपल्याला कोणाची मदत पडेल सांगता येत नाही. एकत्र राहिलो तर तेवढंच आपल्याला चांगलं’ असं मत मांडत विराजसने कसाबसा सगळ्यांचा होकार मिळाला. निखिल आणि अक्षयच अजिबात पटत नसल्याने ट्रिप प्लॅंनिंग मधून निखिलने माघार घेतली आणि पुढचं प्लॅंनिंग विराजस करेल असं त्याने माधुरीला सांगून टाकलं. विराजसने सुद्धा अक्षय जर लुडबुड करणार नसेल तरंच मी प्लान करेन अशी अट घातली. कारण विराजस सुद्धा थोडा तापट डोक्याचा होता. त्याने ठरवलेलं काही झालं नाही किंवा त्याच्या प्लॅनिंग मध्ये कोणी खो घातला की याचा तिळपापड व्हायचा. माधुरीने सगळ्या अटी मान्य केल्यावर शेवटी सगळं LG एकत्र जायला तयार झाला.

विराजसने मग गुगलवर शोधून दोन तीन ठिकाणं निवडली. सगळ्यांच्या संगनमताने पोंमुडी हे थंड हवेचं ठिकाण ठरवण्यात आलं. विरजसने मग ट्रॅव्हल्स शी वगैरे बोलून दोन छोट्या बस बुक करून टाकल्या..

ठरल्याप्रमाणे सगळे निघाले पण विराजसने ट्रिपच्या प्लॅन मध्ये थोडासा बदल केला होता. पूर्ण दिवस पोंमुडीला काय करणार…. म्हणून त्याने पहिले मीनमुट्टी धबधब्याला भेट द्यायचं ठरवलं. महामार्गावर बस ठेवून सगळे पायीच पुढे निघाले. वाटेत एक छोटासा ओढा होता. तो पार केल्यावर जवळपास पंधरा मिनिटे चालल्यावर ते धबधब्याच्या एका टोकाला पोहोचले. मुख्य धबधबा अजून वर होता. काही जणांनी तिथेच बसकण मांडली. वर जायचं तर धबधब्याच्या एका बाजूने थोडंस ट्रेकिंग करत जावं लागणार होतं. सर्व एकत्र जरी आले असले तरीसुद्धा इथे देखील जो तो आपापल्या ग्रुपला धरून होता. निखिल वगैरे थोडा वेळ खाली थांबले पण त्यांच्यातला ट्रेकर त्यांना काही स्वस्थ बसू देईना. मग सगळे जण वर जायला निघाले. मजल दरमजल करत शेवटी ते दुसऱ्या टप्प्याला पोहोचले. मुख्य धबधबा तिथून दहा मिनिटे दूर होता. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच धबधब्याच्या पाण्याचा एक प्रवाह ओलांडून जायचं होतं. पाणी खूप खोल नसलं तरी सुद्द्धा मागे जवळपास १०० फूट खोल दरीसारखा उतार होता. प्रवाह पार करण्यासाठी एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाड दोरखंड बांधलेले होते.

पाण्याचा प्रवाह पार करुन विराजस आणि त्याचा ग्रुप पुढे गेले तर रश्मी आणि अक्षय दोघेच तिथे विश्रांती घेत बसले होते. त्या दोघांनाच पाहून विराजसचा थोडं आश्चर्यच वाटलं.

” हे काय….दोघेच तुम्ही??? बाकीचे कुठे गेले…??”
” अरे कोणालाच नव्हतं यायचं एवढ्या वर..किती मनधरणी करून झाली. शेवटी मग आम्ही दोघंच आलो पुढे.”
” अच्छा……” विराजस बोलला खरा पण त्याच्या मनातली शंका काही कमी झाली नाही.

आता एकाच ठिकाणी पोहोचायचं असल्यामुळे सगळे एकत्रच निघाले. पावसाळा नसला तरी धबधब्याला बरंच पाणी होतं. केरळ मध्ये अधून मधून पाऊस सुरूच असतो. त्यामुळे इथे मुबलक पाणी आणि सर्वत्र हिरवागार निसर्ग असतो. समोरून उंच डोंगरावरून तो धबधबा कोसळत होता. फार मोठा नसला तरीसुद्धा ते दृश्य विहंगम होत. थोडा वेळ सगळे तिथेच थांबले. समोर काचेसारखं स्वच्छ पाणी पाहून अक्षयला पाण्यात उडी घ्यायचा मोह आवरत नव्हता पण तिकडे रखवालदार उभा असल्याने अक्षय मोठ्या कष्टाने स्वतःला आवर घालत होता. तासभर तिथे सेल्फी वगैरे काढून सगळे परतीच्या प्रवासाला लागले. अर्धा रस्ता पार करतात तर त्यांना समोर त्यांच्या LG मधले बाकी जण वर चढत असलेले दिसले..

” बघा….आता येतायेत सगळे…म्हणजे आता फुकट टाईमपास होणार….” विराजस निखिलला म्हणाला.
” तुझं काय ते तू बघ….मी फक्त तुझ्या बरोबर येणार आहे…” निखिल हसतच म्हणाला.
” हो आता काय…आलीया भोगासी…”

ते सगळे खाली उतरले तेव्हा मिथिला वगैरे खालच्याच पाण्यात पाय टाकून बसलेले. आजूबाजूला इतर बरीच मंडळी तिथे जलविहार करत होती. त्यांना पोहताना पाहून सर्वांच्याच मनात त्या पाण्यात पोहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. मागचा पुढचा काहीही विचार न करता सर्वांनीच पाण्यात उद्या टाकल्या..थंडगार पाण्यामुळे त्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला तरीसुद्धा त्यांनी बाकी जण येईपर्यंत त्या पाण्यात मनसोक्त पोहून आपली इच्छा पूर्ण केली. सगळे आल्यावर ठरलेल्या हॉटेल मध्ये जेवण करून त्यांच्या बस पोंमुडी च्या रस्त्याला लागल्या.

जसजसं पोंमुडी जवळ यायला लागलं तसा हवेत गारवा वाढू लागला. सभोवताली खोल दऱ्या आणि वळणावळणाचा घाट..त्यातही ते ड्रायव्हर अगदी सफाईने बस चालवत होते. पोंमुडीला उतरले तेव्हा हवेत बऱ्यापैकी थंडावा जाणवत होता. अक्षयने उतरल्या उतल्याच एक सिगरेट पेटवून स्वतः पुरती सोय करून घेतली. भराभर सिगारेटचे झुरके घेत त्याने सिगरेट संपवली तोच पुन्हा जोराचा पाऊस सुरू झाला. सगळे जण धावत जाऊन एका मोठ्या झाडाखाली उभे राहिले. काही जणांकडे छत्र्या होत्या पण वाराचं इतक्या जोरात वाहत होता की त्याच्यासमोर छत्रीचा टिकाव लागणंसुद्धा कठीण होतं. थोडावेळ पासून तो पाऊस आला तसा निघून गेला. मग सगळे आपापल्या ग्रुपने फिरायला बाहेर पडले.

एका ठिकाणी विराजस आणि रश्मीचा ग्रुप जवळजवळ उभे होते. तीच संधी साधून विराजसचा चिडवण्यासाठी निखिलने त्याला तो नको म्हणत असतानाही रश्मी बरोबर फोटो काढायला लावला. तिने काही फारसे आढेवेढे घेतले नाही..जणू काही ती त्याच क्षणाची वाट पाहत होती. मध्येच एखादा मोठा ढग येई आणि समोरच दृश्य त्यात हरवून जाई. अक्षय एका उंच ठिकाणी उभा राहून तिथून मोठ्याने आरोळ्या ठोकत होता. विरुद्ध बाजूला असलेले त्याच्याच LG मधली काही मुलं त्याला प्रतिसाद देत होती.

अंधार पडू लागतात विराजसने सगळ्यांना घाईघाईने बस मध्ये बसवलं आणि ते निघाले. या ट्रिपच्या दरम्यान त्याने रश्मीचे बरेच फोटो काढले होते. अर्थात तिच्या सांगण्यावरूनच.. त्याने ऐश्वर्याचे काढलेले एक दोन फोटो तिने पाहिले आणि तो फोटो चांगले काढतो म्हणून तिनेही त्याला तिचे फोटो काढायला सांगितलं. त्याच निमित्ताने त्यांची अजून ओळख झाली होती. जाताना रश्मी आणि विराजस वेगवेगळ्या बस मध्ये असल्यामुळे त्यांना बोलता काही आलं नाही. एक बस मुलांच्या हॉस्टेलला गेली आणि दुसरी मुलांच्या..

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

6760cookie-checkनियती……(पर्व दुसरे  भाग २०)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 125,541 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories