पोखरण…एक यशोगाथा
११ मे १९९८..पोखरण येथे झालेली अणूचाचणी. भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं गौरवपूर्ण पान.. भारतीय सुरक्षा यंत्रणेला नवं आयाम देणारं..अणू चाचणी झाली हे आपल्याला माहितीये पण ती कशी झाली आणि ती होण्याआधी संपूर्ण जगापासून आपल्या वैज्ञानिकांनी ती शिताफीने कशी लपवून ठेवली याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे.
अर्थात मी त्या मागचं राजकारण वगैरेबद्दल न बोलता थेट मुद्द्यालाच हात घालतो. २० मार्च ११९८ ला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम , आर.चिदंबरम आणि भारताचे त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात झालेल्या मीटिंगमध्ये अब्दुल कलामांनी पंतप्रधानांकडून अणूचाचणी करण्याची परवानगी मिळवली. अर्थात या कार्यासाठी गुप्तता पाळणे खूप गरजेचे होते. कारण त्या काळात अमेरिका ही महासत्ता होती आणि अमेरिकेने फक्त ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स या देशांनाच अणूचाचणी करण्याची परवानगी दिली होती. भारताला अणूचाचणीची परवानगी नव्हती पण पाकिस्तानने बलुचिस्तान येथे छुपी अणूचाचणी केल्यामुळे भरतालासुद्धा स्वसंरक्षणासाठी अणूचाचणी करणे गरजेचे होते.
भारत अणूचाचणी करणार याची अमेरिकेला कुणकुण होती आणि म्हणूनच अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) भारतावर चार सॅटेलाइट च्या मदतीने नजर ठेवून होती. तसेच अमेरिका भारतीय लष्कराच्या (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) वर बारीक लक्ष ठेवून होती. इतकं की DRDO ची फोन सुद्धा टॅप होत होते.
या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी अब्दुल कलामांनी एक युक्ती शोधून काढली. त्यांच्या सांगण्यानुसार DRDO ताजमहल, व्हाईट हाऊस, कुंभकर्ण, सिएरा असे सांकेतिक शब्द वापरायला सुरुवात केली जेणेकरून अमेरिकन इंटेलिजन्स ला काही संशय येणार नाही.
अमेरिकेचा असा दावा होता की CIA च्या सॅटेलाइट मधून भारताची कोणतीही हालचाल लपली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही बारकाईने करणे गरजेचे होते. DRDO आणि ऑटोमिक एनर्जी डिपार्टमेंटचे वैज्ञानिक लष्करी गणवेशात फिरत जेणेकरून CIA ला संशय येणार नाही.
सॅटेलाइटमध्ये न दिण्यासाठी वैज्ञानिक कधीच एकत्र प्रवास करत नव्हते. तसेच पोखरणला जाताना ते तडक पोखरणला न करता आजूबाजूच्या गावांमधून फिरून मग पोखरणला जात. तसेच सर्व काम हे रात्रीच होत असे. रात्री काम करून दिवस उजाडायच्या आधी ते झाकून ठेवलं जातं होतं.
असे अनेक अडथळे पार केल्यानंतर ११ मे १९९८ ला ५८ भारतीय वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताने ‘ऑपरेशन शक्ती’या नावाने पोखरण येथे अणूचाचणी यशस्वीपणे पार पाडून आता भारत कोणत्याही युद्धाला तोंड देण्यास समर्थ आहे याची जगाला दखल घेण्यास भाग पाडली. त्या नंतर दोनच दिवसांनी भारताने १३ मे ला अजून दोन अणुस्फोट घडवून आणले. त्या नंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताने अणूचाचणी यशस्वीपणे केल्याची घोषणा केली आणि त्याच पत्रकार परिषदेत भारत कधीही अण्वस्त्रांचा वापर करणार नाही आणि जर युद्ध झालंच तर ज्या देशाकडे अण्वस्त्रे नाहीत त्या देशावर अण्वस्त्रें टाकणार नाही हेसुद्धा घोषित केलं.
खरंतर असा काही माहितीवजा लिखाण मी कधी केलं नव्हतं परंतु आपल्या सर्वानाच या गोष्टीबद्दल सविस्तर माहिती हवी म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला. यासाठी गूगल आणि यू ट्यूब चीच फार मदत झाली. हा लेख वाचून तुम्हाला थोडंफार का होईना पोखरण अणूचाचणी बद्दल माहिती मिळण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा करतो.
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment