नियती….(भाग ११)
आज सकाळी घड्याळाचा गजर वाजायच्या आधीच तिला जाग आली. तिने वेळ पहिली तर साधारण साडेचार वाजले होते. आता उठलीच आहे तर घेते सगळं आवरून असा विचार करून ती मोठ्या कष्टाने बेडवरून उठली. एकदा मोबाईल चेक करून तिने तो चार्जिंगला लावला आणि रात्रभर चार्जिंगला लावलेली पॉवर बँक तिने आठवणीने बॅगेत ठेवून दिली.
तिने सावकाश सगळं आवरलं आणि खाली जाणार इतक्यात रश्मीची आई तिच्या रूम मध्ये आली.
” अरे वाह..आज मॅडम लवकर उठलेल्या दिसतायेत. जायचंय म्हणून झोप लागली नाही वाटते…”
” झोपले होते.. पण लवकर जाग आली. मग म्हटलं की जाग आलीच आहे तर आवरून घेते सगळं..परत मग घाई व्हायला नको…”
“हम्म..कॉफी हविये का???”
” हो…प्लिज कर ना..क्रीम पण टाक हा थोडं…”
“हो…टाकते..ये लवकर खाली….बाबा थांबलेत…”
” बाबा…” रश्मीने आश्चर्याने विचारलं..” बाबा कशाला उठलेत आज लवकर…”
” तुला सोडायला येणार आहेत ते….”
हे ऐकताच रश्मीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं…
” अगं आई मी जाईन ऑटो ने..बाबांना कशाला उगाच त्रास…”
” तू तुमचं तुम्ही बापलेक बघून घ्या बाई…मला त्यात ओढू नका..चल आता ये लवकर खाली…”
“हो आले….”
आई गेल्यावर रश्मी थोडी विचारात मग्न झाली. आता काय करायचं..बाबा जर सोडायला आले आणि त्यांना कळलं की मी त्यांच्याशी खोटं बोलतेय तर ते नंतर मला कधीच कुठे पाठवणार नाहीत…काय करावं…अविला विचारावं का ?? नको राहूदे…पहिले आपल्याच्याने काही होतं का पाहूया नाहीतर मग नंतर अविला कॉल करू.
ती खाली आली तेव्हा तिचे बाबा टीव्हीवर सकाळच्या बातम्या पाहत होते.
” बाबा..तुम्ही कशाला उगाच सुट्टीच्या दिवशी लवकर उठलात.. थोडा आराम करायचा ना….”
” असू दे ग..तसही नेहमीच्या वेळेला जाग येते तर मग उगाच लोळत पडण्यापेक्षा उठलेलं बर…उठलोच आहे तर तुला सोडून येईन स्टेशनला.”
” अहो बाबा कशाला..मी जाईन ऑटो ने…आणि माझ्याकडे काही फार मोठ्या बॅगा वगैरे सुद्धा नाही..एकच तर सॅक आहे…”
” तरीसुद्धा…एवढ्या सकाळी सकाळी कशाला एकटीच जातेस. मी आहे घरी..मी सोडतो तुला …”
” बाबा …दर वेळी तुम्ही मला असे सोडायला आलात तर मला कशा जमणार बाकी गोष्टी…मलासुद्धा थोडी हिम्मत दाखवायला हवी ना…” रश्मीने शेवटचा डाव टाकला..ही मात्र बरोबर लागू पडली आणि रश्मीने सुटकेचा निश्वास टाकला.
*********************************************
रश्मी जेव्हा स्टेशनला पोहोचली तेव्हा अविची गॅंग आधीच तिथे हजर होती. रश्मी येताच अविनाशने तिची आणि त्याच्या इतर मित्रमैत्रिणींची ओळख करून दिली. आणि मग ते निघाले. तास दोन तास बाईक चालवल्यावर मध्ये ते एखादा ब्रेक घायचे..चहा, बिडीकाडी झाल्यावर मग परत पुढच्या प्रवासाला लागायचे. तसं मुंबई ते शेगाव साधारण ५०० किलोमीटरच अंतर..त्यामुळे त्यांना रात्रीसुद्धा प्रवास करावा लागणार होता. कार असली असती तर त्यांनी आलटूनपालटून चालवत तेवढंच अंतर लवकर पार केलं असतं. असा बराच वेळ प्रवास करून ते मध्यरात्री शेगावला पोहोचले. रश्मी आणि अविनाशने आधीच हॉटेल बुक करून ठेवल्यामुळे त्यांना फारशी अडचण आली नाही..आता थोड्यावेळ आराम करावा आणि मग हॉटेलवल्याच्या गाडीतून शेगाव फिरायचं…असं सगळं ठरवून आपापल्या रूममध्ये गेले.
सकाळी त्यांना लवकरच उठावं लागणार होतं.कारण शेगाव फिरायचं म्हणजे एक पूर्ण दिवस हवाच..कसा घालवला आपल्या नायक, नायिकेने तो दिवस..काय काय केलं त्यांनी..रश्मी आणि अविमधलं नात अजून फुललं का…त्यांनी त्यांच्या भावना एकमेकांना सांगितल्या का….तुम्हाला उत्सुकता आहे ना…मग भेटूया..पुढच्या भागात..
क्रमशः
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment