असहाय्य 😥😥
नेहमीप्रमाणे श्रेया बसची वाट पाहत उभी होती. तसा आज तिला ऑफिसमधून निघायला जरा उशीरचं झाला होता. Monthend असल्यामुळे कामाचं प्रेशर जरा जास्त होतं. रात्रीचे दहा वाजून गेल्याने रस्त्यावर वर्दळही तशी कमीच होती. श्रेया आपले ईअरफोन्स कानात घालून गाणी ऐकत आज बसला उशीर का झाला याचा मनोमन विचार करत होती. आजूबाजूला नजर फिरवत असताना तिची पुन्हा एकदा त्या दोन घाऱ्या डोळ्यांशी नजरानजर झाली. ती नजर तिच्यासाठी तशी नवीन नव्हती. गेल्या काही दिवसांपासून समोरच्या पडक्या दुकानातून कोणतरी आपल्या पाळतीवर असल्याचं तिला सारखं जाणवत होतं. पण असेल कोणीतरी, आपल्याला काय करायचंय?? असा विचार करून ती दुर्लक्ष करायची.
जसजश्या दुसऱ्या बस येत होत्या तशी आजूबाजूची लोकं सुद्धा कमी होत होती. श्रेयाचं गाव शहरापासून थोडं लांब असल्याने तिच्या गावाकडे जाणारी बस दर दोन तासाने असायची. शेवटी श्रेया बसस्टॉप वर एकटीच राहिली. तशी ती डॅशिंग होती पण तरी सुद्धा दोन पाच मिनिटे गेल्यावर तिला थोडं insecure वाटायला लागलं. तिने पर्स मध्ये हात घालून तिखटाची पुडी बाहेरच्या कप्प्यात काढून ठेवली. तिचं हे सगळं चालू असताना साधारण तिशीची एक अनोळखी व्यक्ती तिच्या बाजूला येऊन उभी राहिली. ड्रेसिंग वरून तरी थोडा सुशिक्षित वाटत होता तो. त्याला पाहून श्रेयाला जरा हलकं वाटलं. ती आधी पासून उभी होती म्हणून त्याने तिला विचारलं.
” दुर्गवाडीला जाणारी बस गेली???”
“नाही अजून…मी सुद्धा त्याच बसची वाट पाहतेय…”
“अच्छा..आज पहिल्या दोन बस सुद्धा आल्या नाहीत..बसचा काय प्रॉब्लेम झालाय देवालाच ठाऊक..मला लवकर जायचंय पण टॅक्सी सुद्धा मिळत नाहीये..”
” तिकडे सहसा कोणी टॅक्सीवाला नाही जात. परतीचं भाडं मिळत नाही ना त्यांना…special केली तर अवाच्यासवा पैसे घेतात.”
“ACtually माझी आई तिकडच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट आहे. आणि तिच्याजवळ कोणी नाहीये..मी इथे बँक मध्ये पैसे आणायला आलो होतो आणि इकडेच अडकून पडलो..बघतो एखादी टॅक्सी मिळाली तर..”
त्याने बराच प्रयत्न केला पण कोणताही टॅक्सीवाला दुर्गावाडीला जायला तयार नव्हता..शेवटी त्याने सगळे प्रयत्न सोडून दिले आणि पुन्हा येऊन बसची वाट पाहत उभा राहिला. तेवढ्यात एक टॅक्सी आली आणि त्याने हात केल्यावर ती थांबली..
” भैया..दुर्गवाडी जाओगे???”
” अहो साहेब…तिकडे कोणतीच टॅक्सी नाही जाणार आता. आणि आज बस पण नाही आहे..त्यामुळे आज इथंच कुठं राहता येतंय का बघा…”
” दादा…माझी आई ऍडमिट आहे तिकडच्या सरकारी इस्पितळात…आणि तिच्या सोबत कोणीच नाही..प्लीज चला ना तुम्ही…हवं तर जास्ती पैसे घ्या…”
” किती देणार???”
“तुम्ही बोला तुमच्या हिशेबाने….”
” १००० रुपये घेईन…”
” ठीक आहे…चला…”
श्रेया बराच वेळ त्या दोघांच संभाषण ऐकत होती. टॅक्सी मध्ये बसता बसता त्या माणसाने तिला विचारलं…
” मॅडम…येताय का तुम्ही…तुम्हाला तुमच्या स्टॉप वर ड्रॉप करतो…”
” नाही नको..थँक यू विचारण्यासाठी..पण मी थोडा वेळ अजून बस ची वाट पाहते..आता येईलच इतक्यांत…”
” अहो मी तसही जातच आहे ना तिकडे..तर सोडतो तुम्हाला..किती वेळ तुम्ही इतक्या थांबणार इथे..रात्रही खूप झालीये..”
ती काही बोलणार इतक्यात तो टॅक्सीवाला तिला म्हणाला
” साहेब बरोबर बोलतायत..तुम्ही किती वेळ आशा उभ्या राहणार..बसा गाडीत..दोघांनापण सोडतो दुर्गावाडीला..”
टॅक्सीवाल्याकडे पाहताच तिला काही तरी आठवलं..तेच घारे डोळे..आपल्याला रोखून पाहणारा हा तर नसेल..छे.. हा कसा असेल…हा तर टॅक्सी ड्रायव्हर आहे..जाऊ का यांच्या बरोबर…हो नको हो नको करता करता शेवटी ती त्यांच्याबरोबर जायला तयार झाली. एकदा त्या पडक्या दुकानाकडे बघून ती टॅक्सीमध्ये बसली. दुकानातून तिला बघणारे घारे डोळे तिला दिसले नाहीत.
थोडं अंतर पार झालं असेल आणि अचानक टॅक्सी थरथरू लागली..ड्राइवरने टॅक्सी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि खाली उतरून बोनेट खोलून तो काय झालंय ते बघू लागला..त्याच्या पाठोपाठ तो माणूस आणि श्रेयासुद्धा उतरले.
” काय झालं काका???”
” इंजिन गरम झालाय वाटतं मॅडम.. दिवसभर गाडी चालू आहे ना..म्हणून झालं असेल. थोडा वेळ थांबलं की होईल ठीक..”
” थोडा वेळ म्हणजे नक्की किती वेळ..??? आधीच………….” तिचे पुढचे शब्द हवेतच विरले..अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तिला काही कळायच्या आत ती खाली कोसळली……”
दुर्गावाडीपासून थोडं अंतर दूर असलेल्या तलावावर सकाळपासूनच लोकांनी गराडा घातला होता..पोलिसही आले होते. त्या सर्व घोळक्याच्या मधोमध एक तरुणीचा मृतदेह पडला होता..प्रथमदर्शनी तरी तिच्यावर बरेच दिवस अमानुष अत्याचार झाल्याचे दिसत होते.. तिच्या हातावर, मानेवर सिगारेटच्या चटक्यांच्या खुणा दिसत होत्या..ओठांतुन रक्त येत होते..तिच्या चेहऱ्यावर मारल्याचे व्रण दिसत होते. केस पूर्णपणे विस्कटलेले होते. माशांनी चावे घेतल्यामुळे पायाच्या तळव्यांना जखमा झाल्या होत्या..पाहताक्षणी सर्वसामान्यांच हृदय हेलवणारं ते दृश्य होतं.
आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही अशीच असते असं काही नाही. पण अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा खात्री करून घेतल्यास पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. कधी कधी आपल्या नजरेला योग्य वाटणाऱ्यां व्यक्तीच्या मनातसुद्धा काय चालू असेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामूळे दुसऱ्या कोणाचं न ऐकता खऱ्या परिस्थितिचा अंदाज घेऊन योग्य ते पाऊल उचलण्यातच आपलं हित आहे.
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
Very nice and thrilling story….and most important is the msg u want to give to everyone🙌🙌
Thanks apu 🙂
Very nice story… N the message u gave to all by the story, its very important..everyone should read this… Good.. 👍👏
Thank you so much 😇
Khup sunder aani khar lihil aahes Pratik. asch lihit raha. All the best dear.
Thank you nikita
nice story
Thanks 🤗