दुसरी गोष्ट….

” अरे विक्या…..ती बघ परत तुझ्याकडेच बघतेय…”

” कुठं….” प्रार्थना चालू असताना त्याची नजर संपूर्ण ग्राऊंडभर तिला शोधू लागली.

“आरं….ती तर समोर परखड मास्तरांकडं बघतेय..तू उगा मला कायबाय सांगू नगं…”

” ती खरंच तुझ्याकडं बघत व्हती…आई रक्ताची शपथ…”

” सोड ना लेका…आपल्याला काय करायचंय… आपण असल्या भानगडीत पडत नाय…”

विक्रांतने आदिशला असं सांगून विषय टाळला खरा पण राहून राहून त्याची नजर तिकडेच वळत होती. गेले महिनाभर हेच चालू होतं. तो जेव्हा बघायचा तेव्हा नेमकी ती दुसरी कडे बघत असायची..जसं सगळ्याच मुली करतात. 

तशी विक्रांत आणि आदिश म्हणजे अगदी जिगरी दोस्त..जय विरुची जोडीचं म्हणा ना..खेळायला, डबा खायला, काही कांड करायला, अगदी वॉशरूमला जायला सुद्धा एकत्रच..आदिश बऱ्याचदा त्याला बोलला होता की त्यांच्या वर्गातली एक मुलगी नेहमी त्याच्याकडे बघत असते..पण विक्रांतला मात्र तसं काही जाणवलं नव्हतं. मुली असंच करतात ना..बघत असतील पण ते त्या मुलाला कळू देत नाहीत. अगदी तिचं हे वागणं त्याला सोडून अख्ख्या दुनियेला माहीत झालेलं असतं.

आदीश तसा बिनधास्तच होता.. तिच्या समोरून जाताना तो मुद्दामच विक्रांतला मोठमोठ्याने हाका मारायचा..जेव्हा इतिहासात विक्रांत युद्धनौकेवर एक छोटा धडा होता तेव्हा तर त्याने लटकेच खोकून खोकून अख्खा क्लासच डोक्यावर घेतला होता..

विक्रांत काय आपलं ऐकणार नाही तर आपणचं कायतरी सोक्षमोक्ष लावून टाकावा असं त्याने ठरवलं..आणि म्हणून त्याने त्याच्याच चाळीत राहणाऱ्या रुपाला विचारलं..
” रूपे…आपण लहानपणापासूनचे दोस्तर ना…”

” तुला आज अचानक आपली दोस्ती कशी आठवली..विक्याशी झगडा झाला की काय…”

“अगं नाय गं…. मला एक छोटीशी शंका होती..म्हटलं तुला विचारून बघतो..तुला यातलं काय माहित आहे का ते..”

” हा विचार न…”

” तुझी ती मैत्रीण सारखी आमच्या विक्याकडे कशाला बघत असते ग…सारखी जेव्हा बघावं तेव्हा बेडूक पाहिलेल्या नागावानी  टक लावून बघत असते..”

”  काय ठाऊक नाय रे..आमी पण तिला लय येळा ईचारल..पण ती काय सांगायलाच तयार नाय…”

” अच्छा…थांब मीच आता बघतो काय ते…”

शेवटी हो नाही हो नाही करता करता आदिशने त्याला तिच्याशी बोलायला राजी केलंच..एरवी कोणत्याही मुलीकडे न बघणारा विक्रांत… पण आदिशने सारखा तिच्या नावाचा तगादा लावल्यामुळे त्याच्या मनात कुठे तरी तिच्या बद्दल feelings निर्माण झाल्या होत्याच….संध्याकाळी खोखोची प्रॅक्टिस झाल्यावर आदिशने विकीला तिच्या समोर जवळजवळ ढकललंचं…

” रेणू…लय चांगली खेळलीस गं तू..काय पटापट गडी बाद केले…”

तिने फक्त एक छोटा स्माईल केलं..तोंडातून चकार शब्द सुद्धा काढला नाही..

” बरं चल.. मी जातो…” असं म्हणून तो वळून पुढे निघणार एवढ्यात तिने त्याला थांबवलं..

“विक्रांत…”

“हं… बोल ना…”

” तुला एक ईचारायचं होतं…बरेच दिवस ईचारेन म्हणत व्हते..पण जमलंच नाही…”

” हा ईचार की…त्यात काय एवढं…” मनातल्या मनात त्याची एक्ससाईटमेंट वाढली..ती काय विचारणार याचा थोडासा अंदाज असल्याने त्याला कधी ती एकदा सांगतेय असं झालं होतं. 

” अरे तुझा तो मित्र आहे ना…आदिश…त्याचं कोणावर प्रेम वगैरे आहे का?? नाही म्हणजे तू त्याचा खास मित्र आहे तर तुला माहीत असेलच ना..”

झालं….तिचं पुढचं बोलणं न ऐकताच तो आदिशकडे एक तिरपा कटाक्ष टाकत चालू लागला..रेणुका काही विचारतेय या कडे त्याचं लक्षच नव्हतं..आणि इथे आदिश लांब उभा राहून खुणेनेच त्याला काय झालं म्हणून विचारत होता..जेव्हा त्याने आदिशला त्यांच्यात झालेलं बोलणं सांगितलं तेव्हा आदिशला हसू आवरत नव्हतं..आणि विक्रांतच्या मनाची अवस्था मात्र त्या क्षणाला अत्यंत वाईट झाली होती…जमिनीतून वर आलेल्या कोवळ्या कोंबावर कोणीतरी डांबर टाकून रोलर फिरवल्यासारखी….

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

4390cookie-checkदुसरी गोष्ट….

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 114,879 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories