हुंडा (dowry)……एक होरपळ
आई गं ! सहन होत नाही मला ! सोडव रे परमेश्वरा ! फार फार भाजले आहे मी! काही क्षणांची सोबतीण आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय ! जगाचा निरोप घ्यायला निघालेय मी ! आई बाबा…कुठे आहात तुम्ही ? तुमची लाडकी चिमणी तुम्हाला सोडून चालली आहे !
थोडंथोड आठवतंय मला ! माझे बांधलेले हातपाय…. तोंडात कोंबलेला कपड्याचा बोळा…. अंगावरचं पेट्रोल…..ती मृत्यूची दूत बनून आलेली काडी…. ते धुराचे लोळ….आगीच्या ज्वाळा…. माझ्यावर मुलींसारखं प्रेम करू असं सांगून मला घरी घेऊन आलेले माझे सासुसासरे…मला सात जन्म सोबत करण्याचं वचन देणारा माझा नवरा…सगळे माझ्या मृत्यूचे साक्षीदार….माझ्याच माणसांनी मला मृत्यूच्या दारात उभे केले आहे.
आठवतोय मला तो आनंदाचा क्षण ! उंबरठा ओलांडून मी गृहलक्ष्मी म्हणून या घरात आले.माझ्या बाबांनी लक्ष्मीची उधळण केली या घरावर. पण ही माणसं.. माणसं कसली जनावरचं.. पैशाला चाटवलेली! एवढ्यावरच यांच समाधान कुठे होणार होतं. माझ्या बाबांनी मी सुखात राहावं म्हणून यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. पण यांना अजून हवंच होतं. सून म्हणजे पैसा मिळवण्याचं आयतं साधनच वाटलं या लोकांना. मग काय? सुरु झाला माझा छळ !
कधी कधी तर मला दोन दोन दिवस उपाशी ठेवायचे. अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवायचे.तू घरी फोन केला नाही तर तुला जाळून टाकू अशी धमकी द्यायचे. पण बाबांना अजून किती त्रास देणार म्हणून मी आपल सगळं सहन करत होते. मी यांनी सांगितलेल ऐकत नाही हे पाहून यांनी मला सिगारेट, कलथ्याचे चटके द्यायला सुरवात केली. एकदा तर सासूबाईंनी माझा हातचं गरम तव्यावर ठेवला. अंगाची काहिली झाली माझ्या.पण तरी मी सगळं सहन केलं.एक दिवस सासूबाईंच्या खोलीत काहीतरी खलबत शिजत होती.माझा कायमचा सोक्षमोक्ष लावायचा ठरला यांनी.
मला आठवतंय…. त्या दिवशी कोजागिरी पोर्णिमा होती. सगळे शेजारी पूजेसाठी देवळात गेले होते. मला पण जायच होतं पण सासरच्या मंडळींनी मला जाऊन नाही दिला.मला कल्पनाही नव्हती कि सगळ्यांसाठी पवित्र असणारी हि रात्र माझ्यासाठी काळरात्र ठरणार आहे.
माझा खून करण्याचा प्रयत्न केला या नराधमांनी.पण आता अश्रू आवरत नाहीयेत यांना.पुरावा नष्ट करण्यासाठी माझी संपूर्ण खोलीचं जाळून टाकली या लोकांनी. पण यांच्या लटक्या रडण्यावर जाऊ नका. मी गेल्यावर दुसरी कोणतीतरी मुलगी लक्ष्मीच्या लडी घेऊन येणार आहे यांच्या घरी. लक्ष्मीसाठी गृहलक्षमीचा सौदा करणारे हे! त्या मुलीला तरी सुखात ठेवतील कि नाही काय माहित! तुमची जर मुलगी असती आणि तिच्यावर जर हि वेळ आली असती तर तुम्ही काय केलं असतं? हा विचार का नाही करत हे?
आठवतंय मला माझं बालपण! स्वछंदी जीवन जगत होते मी. पाहिजे ती गोष्ट लगेच समोर असायची. सुखी संसाराची किती स्वप्न पाहिली होती मी. मला समजणारा,माझ्यावर प्रेम करणारा ,माझ्या भावना जपणारा साथीदार हवा होता मला.
पण या हुंड्यापाई माझ्या साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला. गुलाबांच्या पाकळ्यांच्या गालीच्यावर पाय ठेवून मी या घरात आले पण नशिबी आले ते काटे कुटेच.. माझ्या ममतेचा, भावनांचा गळाचं घोटून टाकला या लोकांनी.हुंड्याच्या लालसेपोटी मी सुद्धा एक माणूस आहे हेच विसरून गेली हि माणसं.
तुम्हाला साधा चटका जरी बसला तरी तुम्हाला किती त्रास होतो. माझं तर संपूर्ण शरीर आगीच्या ज्वाळींनी वेढलेलं असताना किती मरण यातना सहन केल्या असतील मी? आधुनिकतेच बिरुद लावून मिरावणारा हा समाज या हुंड्याच्या अंधारातून कधी बाहेर पडणार? सर्वसामान्य स्त्रियांमध्ये कायद्याविषयी ज्ञान आणि आपल्या हक्कांसाठी झगडण्याची तयारी असायला हवी.तरच माझ्यासारखं मरण तुमच्या वाट्याला येणार नाही.
अजूनही अशा अनेक मुली आहेत ज्यांचा हुंड्यासाठी छळ होत आहे. तुम्ही भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघत आहात मग पहिल्यांदा ज्या गोष्टीमुळे आपला देश मागे आहे त्या गोष्टींच्या मुळावरच घाव घालायला हवा. तरच आपला देश खऱ्या अर्थाने महासत्ता बनू शकेल.
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
Khupach sundar…khup masta padhhatine mandlay ha vishay tu✌👌👌👌
tysm apurva :*