
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा केली आणि एका नव्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली.
“छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री आणि मी ब्रिटिश प्रशासनाशी सामंजस्य करार करुन त्यातील अटींची पूर्तता करुन नोव्हेंबरपर्यंत ती महाराष्ट्रात आणू”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे.
त्यामुळे या वाघनखांचा विषय महाराष्ट्रात परत एकदा चर्चेत आला आहे. तसं पाहाता शिवाजी महाराजांची तलवार, वाघनखं, टीपू सुलतानाची तलवार, कोहिनूर हिरा, मयुर सिंहासन या गोष्टींची चर्चा अधूनमधून होत असते. 2024 हे वर्ष साडेतीनशेवं शिवराज्याभिषेक वर्ष आहे आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात येण्याला विशेष महत्व आहे.
पण ह्या वाघनखांचा नक्की इतिहास काय आणि ती लंडनला कशी हे आपण जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?
ईस्ट इंडिया कंपनीने 1818 ते 1823 या कालावधीसाठी सातारा संस्थानासाठी जेम्स ग्रँड डफ नावाच्या व्यक्तीची पॉलिटिकल एजेंट म्हणून नियुक्ती केली होती. साताऱ्याचे पॉलिटिकल एजंट म्हणून 2000 रुपये पगार आणि 1500 रुपये भत्त्यावर त्याने काम पाहिले. 1822 पर्यंत ते पॉलिटिकल एजंट राहिले.
इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवलं होतं. त्या महाराजांनी ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ज्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला, जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता आणि प्रतापसिंह महाराजांशी त्याची चांगली दोस्ती होती. महाराजांनी त्याला भेट म्हणून वाघनखं दिली होती. ती वाघनखं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ग्रँट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रँट डफ यांना तिथे दिसली असून तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहेत. त्या वाघ नखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघ नखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही.
काय आहे म्युझियम मधली नोंद?
म्युझियमकडे प्रत्येक वस्तूची एक नोंदही असते.यामध्ये म्युझियमनं पुढील नोंद केली आहे. ‘हे शस्त्र जेम्स ग्रेट डफ (1789-1858) यांच्या ताब्यात होते. ते इस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते आणि 1818 साली ते सातारा येथे रेसिडंट म्हणजेच पॉलिटिकल एजंट होते. या शस्त्राबरोबर एक खोका असून स्कॉटलंडमध्ये त्यावर काही मजकूर कोरण्यात आला आहे. ही वाघनखं शिवाजी महाराजांची असून याच्या मदतीने त्यांनी मुघलांच्या सरदाराला ठार केलं. हे शस्त्र जेम्स ग्रँट डफ ऑफ इडन यांना सातारा येथे रेसिडंट असताना मराठ्यांचा पंतप्रधान पेशवे यांनी दिलं. अशी नोंद केली आहे.’
या नोंदीत ‘1818 साली बाजीराव दुसरे यांनी बिठूरला जाण्यापूर्वी काही शस्त्रंही ब्रिटिशांकडे दिली असल्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी 160 वर्षं आधी वापरली गेलेली वाघनखं हीच असावीत हे सिद्ध करणं शक्य नाही’, असंही नमूद करण्यात आलं आहे.
तसंच तत्कालीन मुंबई गव्हर्नर लॉर्ड फोकलंडने आपल्या पत्नीसोबत एकदा सातारा संस्थानाला भेट दिली होती. ह्या भेटीबद्दल त्याच्या बायकोने असं लिहून ठेवलंय की साताऱ्याच्या राण्यांनी त्यांना काही वाघनखं दाखवली होती ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी अफजलचा वध करण्यासाठी जी वाघनखं वापरली होती त्याचासुद्धा समावेश होता.
जेम्स बफला वाघनखं दिल्यानंतर तब्बल तीस वर्षांनी गव्हर्नरच्या बायकोने हा दावा केला होता.आणि तिचा हा दावा खोटा असल्याचं बफच्या मुलाने कुठेही स्पष्ट केलेलं नाही.
काही इतिहासकारकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जी वाघ नखं तसेच शस्त्र वापरली याविषयीची स्पष्टता इ.स. १९१९ पर्यंत होती. कारण, ही शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण, आत्ता जे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली वाघ नखं महाराष्ट्र सरकार भारतात परत आणत आहेत, ती अफजलखानाचा वध केलेली वाघ नखं नाहीत.
कसा लागला वाघनखांचा शोध?
अफजलखानाच्या भेटीसाठी जाताना निशस्त्र जाण्याची प्रस्ताव दोन्ही बाजूनी मंजूर झाला होता. अफ़जल तो प्रस्ताव पाळणार नाहीच ह्याबद्दल महाराजांना खात्री होती पण महाराजांकडे शस्त्र असल्याची कल्पना जरी अफजलखानाला आली असती तरी त्याने भेट रद्द केली असती आणि इतक्या महिन्यांची मेहेनत वाया गेली असती. म्हणूनच महाराजांना अशा एखाद्या शस्त्राची गरज होती जे जवळ बाळगूनही शत्रूच्या नजरेस पडणार नाही. इतिहासाची बरीच पाने चाळल्यानंतर शेवटी असं एक शस्त्र महाराजांनी बनवून घेतलं जे मूठ आवळल्यावर बोटांवर एखाद्या अंगठीसारखं दिसेल आणि वेळ आल्यावर त्याने वारही करता येईल. हेच ते वाघनखं.

वाघनखांचा उपयोग कसा केला जातो?
वाघनखं ही धातूची असतात. एका पट्टीवर पुढे चार वाघाच्या नखांप्रमाणे वळलेली धातूची अणुकुचिदार नखं बसवलेली असतात आणि दोन बाजूंना ती बोटात घालायला दोन पोकळ्या असतात. ती हातात लपवून त्याच्याद्वारे अगदी जवळ असलेल्या शत्रूला मारायला वापरली जात असत. ह्याला मराठ्यांचं अमुक्त शस्त्र असंही म्हटलं जातं.
Follow PRATILIKHIT
1 Comment