
ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…
ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं..
तसं पाहायला गेलं तर सैनिक होणं हे देशातल्या कोणत्याही लहान मुलाचं स्वप्न असतं. थोडंफार कळायला लागल्यावर आपल्या मनात सैनिकांबद्दल अपार आदर निर्माण होतो. समोर युनिफॉर्म मधला भारतीय सैनिक दिसल्यावर आदराने हात सॅल्यूट करायला उठणार नाही असा एकही सच्चा भारतीय सापडणार नाही.
पण ह्याहून जास्त कौतुक तर मला सैनिकांच्या घरच्यांचं वाटतं. पूर्वीच्या काळी जरी आतासारखे मोबाईल, फोन नसले तरीही सैनिकांच्या घरच्यांच्या मनात इतकी भीती नसायची जितकी आता असते. कारण पूर्वीच्या काळी भ्याड अतिरेकी कारवाया आताच्या तुलनेत कमी असायच्या. म्हणजे जर युद्ध किंवा काही कारवाई झाली तरच सैनिकांच्या जीवाला धोका असायचा. त्यामुळे जोवर युद्ध होत नाही तोवर आपल्या मुलाच्या, नवऱ्याच्या, वडिलांच्या जीवाला धोका नाही हा विश्वास प्रत्येक सैनिकाच्या कुटुंबियांना असायचा.
पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललीये. उघडपणे जिंकू शकत नाही ह्याची जाणीव झाल्याने शेजारील राष्ट्र आणि त्यांच्या संस्था आपल्या सैनिकांवर छुपे हल्ले करतायेत आणि त्यात आपल्या सैनिक शहीद होतायत. एकीकडे शांततेचा प्रस्ताव आहे असं वरवर भासवायचं आणि अतिरेकी संघटनांना पैसे पुरवून त्यांच्यामार्फत भारतात बॉम्बस्फोट, छुपे हल्ले करायचे ह्याची सवयच शेजारील राष्ट्राला झालीये.
ह्याला कुठेतरी जबर वचक बसायला हवा होता आणि तसा आता तो बसलाही असेल. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांच्याच घरात घुसून दिलेलं प्रत्युत्तर आणि नंतर केलेला एअर स्ट्राईक ह्यामुळे भारत आता शांत बसणार नाही ह्याची कल्पना त्यांच्यासह संपूर्ण जगाला आलीच असेल.
‘ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…’ ह्याची जाणीव आता जगाला झालीये. पण हा बाणा कायम ठेवण्यासाठी देशातलं सरकार, इतर अधिकारी आणि देशातील नागरिक ह्यांची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. सैनिकांची ताकद वाढविण्यासाठी त्यांना अद्यावत शस्त्रास्त्रे पुरवणे, इतर संरक्षण सामग्रीचं उत्पादन आपल्याच देशात सुरू करणे तसेच सुरक्षेसाठी लागणाऱ्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाच्या शोधासाठी आवश्यक तो निधी पुरवणे आणि मुख्य म्हणजे ह्यात कोणताच भ्रष्टाचार होणार नाही ह्याची काळजी घेणे हे सरकारचं काम आहे तर नागरिकांनीही आता जागरूक राहून एखाद्या संशयास्पद गोष्टीकडे कानाडोळा न करता ती तात्काळ पोलीस किंवा इतर सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी जेणेकरून असे भ्याड हल्ले आपल्याला नक्कीच टाळता येतील.
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
No Comment