दसऱ्याचे महत्व

दसऱ्याचे महत्व

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, याच सणाला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात.

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’, या ओळीतच या सणाची महती गौरविलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.

दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.

फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती, त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, ‘मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तुम्ही मागाल ते मी देईन.’ ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यायचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.

कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्याची विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी चौदा कोटीच मुद्रा स्विकार केल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.

‘साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी-दसरा!’, या तुकाराम महाराजांच्या उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो सर्वतोपरी योग्य आहे याची प्रचिती आपल्याला दसऱ्याच्या दिवशी येते.

31110cookie-checkदसऱ्याचे महत्व

Related Posts

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories