आठवणीतला गणेशोत्सव…

आठवणीतला गणेशोत्सव…

गणेशोत्सव म्हटला की सगळ्यांकडे काही ना काही बोलण्यासारखं असतंच. सगळ्या हिंदू सणांपैकी सर्वात आवडता सण म्हणजे गणपती. अगदी दिवाळीपेक्षाही जास्त आवडता. आपल्या घरी बाप्पा येणार ही भावनाच मनाला आनंद देऊन जाते. गणपतीच्या निमित्ताने चाकरमानी खास सुट्टी काढून त्याच्या गावी जातो. कोकणी माणसावर आपण कितीही विनोद केले तरी गणपती आणि कोकण यांचं नातं दुसरं कुणी समजूनच घेऊ शकणार नाही.

वसई विरार मुंबईला लागून असल्यामुळे प्रगतीपथावर असलं तरीसुद्धा सण, उत्सव अजूनही तिथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. स्थानिक नागरिकांसाठी तर गणपती हा खूप मोठा सण असतो. वसई मधील बऱ्याचशा गावांमध्ये अजूनही सामूहिक पद्धतीने आरती केली जाते. (मागच्या आणि ह्या वर्षाचा अपवाद वगळता). आमचं गावही त्याला अपवाद नाही. आमच्या म्हात्रेवाडी गावातसुद्धा पहिल्या दिवसापासून ते गौरीपर्यंत सगळ्यांच्या घरी जाऊन आरत्या घेतल्या जातात.

मी लहान होतो तेव्हा आमच्या गावात दहा गणपती होते. पाच गणपती दीड दिवसाचे आणि पाच गौरी विसर्जनापर्यतचे. गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री नऊ साडे नऊला आरतीला सुरुवात व्हायची. गावातली मुलं प्रत्येक घरी जाऊन गणपतीची, दुर्गेची, शंकराची, दत्ताची आणि विठ्ठलाची ह्या ठरलेल्या आर्त्यांसोबतच ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असेल त्यांच्याघरी पहिल्या दिवशी एक गणपतीची आरती जास्ती घ्यायचे. आरतीनंतर प्रत्येकाच्या घरी अल्पोपहाराचा काही न काही बेत असायचा. बच्चेकंपनी तर त्यावर यथेच्छ ताव मारायची. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठीसुद्धा गावातली सगळी मंडळी उपस्थित असायची. दुसऱ्या दिवशीपासून गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशीपर्यंत आरत्या घेण्यात खरी गंमत असायची. कारण फक्त पाचच गणपती असल्यामुळे ठरलेल्या आरत्यांसोबतच दशावतार, तुकाराम, हनुमान, त्रिंबकनाथ, राम, ज्ञानेश्वर, कृष्ण अशा अनेक आरत्या घेतल्या जायच्या. नवीन आरती असल्यामुळे त्या आरत्या म्हणायला एक वेगळा जोश यायचा. शिवाय शाळेला सुट्टी असल्यामुळे जागरणाचा वगैरे काही प्रश्न नसायचा.

गौरी विसर्जनाच्या दिवशी साधारण चार साडेचार वाजता गावातल्याच विहिरीवर गौरी विसर्जन करून सगळेजण गणपतीच्या विसर्जनासाठी सज्ज व्हायचे. सगळेजण एकत्रितपणे विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील व्हायचे. गणेश मूर्तीचं विसर्जन आगाशीतल्याच भवानी शंकर मंदिराच्या तलावात केलं जायचं. विसर्जनाआधीसुद्धा तलावावर एकदा आरती व्हायची.

पण गेल्या वर्षी कोरोना आला आणि सगळं चित्र बदललं. सगळ्यांना घरच्या घरीच आरत्या घ्याव्या लागल्या. विसर्जनासाठी सुद्धा एका गणपतीसोबत फक्त चार जण जाण्याचीच परवानगी देण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी सगळयांना आपल्या भावनांना आवर घालावा लागला. गेल्या वर्षी आणि या वर्षीही गणेशोत्सव अगदी साधेपणाने पार पडला. पण हरकत नाही. ही दोन वर्षे काळजी घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पुढल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असेल आणि आपल्या सगळ्यांनाच आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाचा उत्सव अगदी जल्लोषात साजरा करता येईल अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पांकडे करूया.

गणपती बाप्पा मोरया….

©प्रतिलिखित

30316cookie-checkआठवणीतला गणेशोत्सव…

Related Posts

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories