संस्कृती
“अविनाश.. मुहूर्ताचे विधी सुरु झालेत. तू येतोय का??”
“मुहूर्त?? म्हणजे??”
“मुहूर्त म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी नवऱ्या मुलाला आणि मुलीला दोघांना हळद लावतात. गणपतीपूजन होतं. आणि इतर अनेक रीती असतात. तू आलास तर कळेल तुला. ”
“आलोच कॅमेरा घेऊन. हे सगळं पाहिलं नाहीये कधी. त्यामुळे रेकॉर्ड करायला आवडेल मला.” अविनाश पटापट सगळं आवरत म्हणाला.
शहरात राहणारे अविनाश आणि नीरज दोघेही नीरजच्या बहिणीच्या लग्नासाठी नीरजच्या गावी म्हणजेच सोलापूरला आले होते. अविनाशचं बालपण शहरातच गेलं होतं तर नीरज शिक्षणासाठी शहरात गेला होता. दोघांचंही व्यक्तिमत्व बरंचसं भिन्न असलं तरीसुद्धा दोघांमध्ये छान मैत्री होती. अविनाशचे वडील व्यावसायिक असल्यामुळे त्यांचं बऱ्याच मोठमोठ्या लोकांच्या कार्यक्रमात जाणं व्हायचं. त्यांच्याबरोबर अविनाशसुद्धा जायचा. पण त्या कार्यक्रमात श्रीमंतीचा दिखावाच जास्त असायचा. त्यामुळे असा पारंपरिक लग्नसोहळा अविनाश पहिल्यांदाच अनुभवत होता. लग्नाच्या सगळ्या रीती, परंपरांमध्ये अविनाश नीरजसोबत उत्साहाने सहभागी होत होता. बरेच प्रश्न त्याच्या मनात होते आणि नीरज थोडा रिकामी बसलाय हे पाहून त्याने निरजकडे विषय काढला.
“नीरज, इकडे सगळीकडे अशाचप्रकारे लग्न होतात??”
“अशाच प्रकारे म्हणजे??”
“म्हणजे अशी पारंपरिक पद्धतीने. इतके सगळे विधी वगैरे.”
“हो. म्हणजे फक्त इकडेच नाही देशातल्या सगळ्याच ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनेच लग्नसोहळे पार पडतात. अर्थात जशी आपल्या महाराष्ट्रात कोसाकोसावर भाषा बदलते तसंच प्रांतानुसार रीती बदलतात पण सगळ्यांमध्ये काही ना काही साधर्म्य असतंच. तुझ्याही गावी असंच असेल. तू कधी गेला नाहीस तुझ्या गावी??”
“नाही. माझं गाव वर्ध्याला आहे इतकंच माहितीये मला. पण गेलो नाहीये कधीच.”
“अच्छा. कसंय ना. शहरामध्ये असं काही नाही होतं. बऱ्याच लोकांना तर आपल्या रूढी, परंपरा माहितीच नसतात. मी नेहमी म्हणतो की आपल्या रूढी परंपरा माहिती असलेली आपली ही कदाचित शेवटची पिढी असेल. कारण आपल्या आईवडिलांनीही फार काही माहित नाहीये यातलं. आजीआजोबा आणि त्यांच्याशी समवयस्क लोकांनाच याबद्दल माहिती आहे. आणि आपली पिढी तर हे सगळं समजून घेण्याचे कष्ट घेतच नाही. कारण आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर पाश्चिमात्य संस्कृतीचं भूत बसलंय ना. आपल्या सगळ्या रूढी, परंपरा म्हणजे अगदीच ओल्ड फॅशन वाटतं आपल्याला. आपल्याला परंपरा म्हणजे गुढीपाडव्याला किंवा इतर सणांना नऊवारी नेसायची, कुर्ता घालायचा आणि रॅली काढायच्या एवढचं माहितीये.”
“पण काही लोकं असं सुद्धा म्हणतात की परंपरा माणसांचं शोषण करतात. ”
“काही परंपरा होत्या अशा ज्या काळाच्या ओघात बदलल्या. कारण त्या बदलणं भाग होतं. त्यांचा काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला होता. उदाहरण द्यायचं झालं तर हुंडा, सती, बालविवाह वगैरे वगैरे. पण इथे आपण हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं की जशा परंपरा आपल्या देशात होत्या तशाच त्या इतर देशांमध्येसुद्धा होत्या. रोमन साम्राज्याबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकली. आता त्या सगळ्या प्रथा आहेत का?? नाही ना. काळाच्या ओघात त्या सगळ्या प्रथा बदलाव्या लागल्या कारण त्या प्रथांमुळे सामान्य लोकांचं शोषण होत होतं. पण आपल्या सगळ्याच रूढी परंपरा अशा नाहीयेत. बरेच जणं आपली संस्कृती म्हणून बोंबलत असतात पण त्यांनासुद्धा आपल्या संस्कृतीबद्दल फार काही माहिती नसते. ”
“पण संस्कृती म्हणजे काय नक्की???”
“आता लग्नातच पाहिलं असशील तू. की गावातल्या सगळ्या बायका एकत्र आपल्या होत्या. सगळ्यात आधी ताईची सठी झाली. त्यावेळी त्यांनी परंपरेनुसार गाणी गायली. त्यानंतर ताईला हळद लावताना त्यांनी त्यासंबंधित गाणी गायली. ह्या सगळ्या आपल्या परंपरा आहेत, आपली संस्कृती आहे. आपल्या प्रत्येक सणांमागे काहीतरी कारण असतं. धार्मिक कारणांसोबतच वैज्ञानिक कारणेसुद्धा आहेत. पण आपल्याला काही माहित आहे का त्यातलं?? आपण जर आपल्या ह्या परंपरा जपल्या नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण काय वारसा देणार?? काळानुसार काही गोष्टी बदलल्या मान्य आहे पण त्याचा पाया तोच आहे. आणि शेंड्याकडे मार्गक्रमण करताना आपण तो पायाच विसरतोय असं नाही वाटत का तुला?”
“तू बोलतोय त्यात तथ्य तर आहेच. पण आपल्या दोघांनी असा विचार करून काहीही होणार नाही. सगळ्यांनीच ह्याबद्दल गांभीर्याने विचार करायला हवा. आणि आपण त्याची सुरवात नक्कीच करू शकतो. ” अविनाश निश्चयाने म्हणाला आणि दोघेजण परंपरेनुसार ताईसोबत गावातल्या देवीच्या दर्शनासाठी गेले.
© PRATILIKHIT

Chhan dada👏🏻👏🏻
Khup khup aabhar omkar