निसर्गाचं पूनरुत्थान

निसर्गाचं पूनरुत्थान

‘अरे माणसा माणसा कधी होशील माणूस’..
सद्यस्थिती पाहता कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेतील ही ओळ आज पुन्हा एकदा माणसाला विचारण्याची वेळ आली आहे असे वाटते. ‘हे विश्वाची माझे घर ‘ ही संत ज्ञानेश्वरांची ओवी आपल्यासाठीच आहे असे मानून संपूर्ण विश्व आपली मक्तेदारी मानून आपलं अधिपत्य निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या मानवाला आज निसर्गाने अशी चपराक दिलीये की त्याच अस्तित्वच धोक्यात आलं आहे. समस्त प्राणिमात्रांमध्ये स्वतःला श्रेष्ठ मानून इतरांवर अन्याय करणाऱ्या मानवाचं घराबाहेरही पडणंही अवघड होऊन बसलंय. जणू काही तुमच्या असण्याने किंवा नसण्याने मला काहीही फरक पडत नाही, तुम्ही पाहुणे आहेत पाहुण्यासारखं राहा, अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नका असं तर निसर्गाला आपल्याला सांगायचं नसेल ना ??

माणसाने अथक प्रयत्नाने आर्टीफिशल इंटेलिजन्सचा शोध लावला. ज्यामध्ये त्याच्या सिस्टीम मध्ये काहीही तांत्रिक बिघाड झाला तर ऑटो रिबुट ची सुविधा माणसाने पुरवली. मग हा माणूस ज्या सिस्टिमचा भाग आहे त्या सिस्टीमची निर्मिती करताना त्याच्या डेव्हलपरने म्हणजे निसर्गाने सिस्टिममध्ये येणारे व्हायरस काढण्यासाठी अँटीवायरस तयार केला नसेल का?? आपण बघितलं तर जवळपास दर शंभर वर्षांनी हे निसर्गाचं रिबुट चालतं. सन १८२०, १९२० आणि आताचं २०२०. एका शतकाच्या कालावधी नंतर निसर्ग स्वतःच स्वतःला रिबुट करतो आणि स्वतःच पूनरुत्थान करतो.

पण एक मात्र खरं, माणूस चुकला की निसर्ग त्याला क्षमा करत नाही. या पृथ्वीतलावावरील वनराई, पशु, पक्षी त्यांचा अधिकार सिद्ध करतात. कोरोनामुळे अपार मनुष्यहानी होत आहे. आर्थिक फटका बसला आहे. माणूस घरातच थांबलाय पण निसर्ग आनंदलायं.

होय, याचा अनुभव आपण सर्व जण घेत आहोत. प्रदूषणाची पातळी बऱ्यापैकी कमी झाली आहे. सर्व नद्यांचे पाणी शुद्ध होत आहे. ज्या नद्यांची पात्र मोठमोठे निधी मंजूर होऊन देखील स्वच्छ होत नव्हती ती केवळ मानवाच्या घरात बसण्याने स्वच्छ झाली आहेत. अनेक राष्ट्रीय उद्यानातील प्राणी,पक्षी निर्भयपणे मुक्त संचार करत आहेत.चिमण्यांची कलकल सुखावतेय, कोकिळेची कुहू-कुहू साद घालतेय, इतरही अनेक पक्षांचा गुंजारव कानांत घुमू लागला आहे.

या प्रसन्न वातावरणाची अनुभूती घेत खिडकीतून बाहेर पाहिल्यावर आपल्या डोक्यावरील तुरा मिरवत आनंदाने गुंजन करणारा बुलबुल, गोलगोल फिरणारा कबुतरांचा थवा, एरवी पिंजराबंद असलेले हिरवे गर्द रंगांचा आणि त्यांच्या लाल चोचीतून शीळ घालत बिनधास्थ फिरणारा पोपटांचा थवा हे मनोहरी दृष्य मन प्रफुल्लित करते. आहा, अशी सुंदर सकाळ गेल्या काही दिवसांपासून आपण अनुभवतोय. जल, हवा शुद्ध झाल्याचं जाणवतेय, सर्वच गोंगाट बंद झाल्याने मनःशांती मिळतेय.काहीतरी हरवलेलं सापडल्याचा आनंद होतोय. आपण आनंदच हरवून बसलोय.

कोरोना हे निमित्त झालं, पण पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांच्या विरोधात माणसाने काही केले किंवा नैसर्गिक नियमांचे उल्लंघन केले की त्याची फळे भोगावी लागतात, याची जाणीव निसर्गाने आपल्याला करून दिली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आणि या वसुंधरेवर आपला हक्क गाजवण्यासाठी माणूस सातत्याने निसर्गावर अत्याचार करत आला आहे.
 हीच वेळ आहे. आपल्या चुकांची जाणीव करून घेण्याची. आपण केलेल्या चुका सुधारण्याची..नाहीतर कदाचित पुढचं पूनरुत्थान करताना निसर्गाला संपूर्ण मानवजातीचा ह्रास करावा लागेल.

12810cookie-checkनिसर्गाचं पूनरुत्थान

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 116,893 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories