
FOMO (Fear of missing out)
FOMO. तसं ऐकायला नवीन वाटत असलं तरी संकल्पना मात्र जुनीच आहे..Fear of missing out… म्हणजे काय बरं???
थोडक्यात सांगायचं झालं तर इतर लोकं त्यांच्या आयुष्यात काय करतायेत हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा किंवा एखाद्या गोष्टीमधून आपण वगळले जाण्याची भीती…आजच्या सोशल मीडियामुळे ही भीती वाढत आहे. आपले सगळे मित्रमैत्रिणी, नातेवाईक आपल्या सोशल मीडियाचा भाग असतात. आणि त्यामुळे त्याच्या स्टेटस अपडेट, पोस्ट यावर आपली सतत नजर असते. ते त्यांच्या आयुष्यात काय करतायेत हे जाणून घेण्यासाठी आपण बरेच उत्सुक असतो..आणि हेच FOMO चं मुख्य कारण आहे.
जेव्हा सोशल मीडिया नव्हती तेव्हा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत आपण अगदीच अनभिज्ञ होतो. स्मार्टफोन आल्यावर सोशल मीडियाचा वापर वाढला आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, अनुभव, कार्यक्रम याची माहिती मिळण्यास सुरुवात झाली. आणि मग वाढली ती उत्कंठा…सगळं काही माहीत करून घेण्याची…कधी कधी आपल्याला कसली कमतरता जाणवतेय हे आपल्याला माहितीच नसतं पण सतत काही ना काही कमी असल्याची भावना आपल्या मनात सलत असते.
आणि मग आपण सोशल मीडियावर अपडेट आहोत असं दर्शवण्यासाठी सतत काही ना काही पोस्ट करण्याचा, शेअर करण्याचा प्रयत्न करतो…सतत कोणाच्या तरी पोस्ट वर कॉमेंट करून आपल्यालाही सगळं कळतं असं दर्शवण्याचा प्रयत्न करतो. एखाद वेळी आपल्या फोटोला अपेक्षित likes आले नाहीत तर आपण अस्वस्थ होतो. मेसेज पाहुनसुद्धा आपल्याला रिप्लाय आला नाही की आपण सैरभैर होतो आपले मित्रमैत्रिणी जेव्हा त्यांच्या ट्रिपचे, त्यांच्या पार्टीचे फोटो शेअर करतात तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव सतत होत राहते.आपल्या मनात अलिप्त असण्याची जी भीती निर्माण होते ती म्हणजे FOMO.
मागे युट्युब वर FOMO नावाची एक मराठी वेबसिरीज सुद्धा येऊन गेली. एकाच ऑफिस मध्ये काम करणारे दोघे जण.पण त्यांना त्या ऑफिस मधलं कुणीच ओळखत नाही. बरेच दिवस त्या ऑफिसमध्ये असूनसुद्धा कुणीच त्यांच्याशी बोललं नाही. आणि मग काहीतरी फंकी केलं की लोक आपल्याला ओळखतात या गैरसमजामुळे त्या दोघांनी त्यांची फेक रिलेशनशिप सर्वासमोर आणण्याचा प्रयत्न केला.सांगायचं तात्पर्य हेच की मग सर्वांनी आपल्याला ओळखावं म्हणून मग आपण चुकीचं पाऊल उचलायलादेखील मागेपुढे पाहत नाही.
का बरं अडकावं आपण ह्या FOMO च्या कचाट्यात?? आपल्याला स्वतःच आयुष्य, स्वतःची प्राथमिकता वगैरे काही आहे की नाही? का दुसऱ्याचं वेळापत्रक, दुसऱ्याचं आयुष्य बघून आपण आपल्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं. आपल्याला जसं जगायचंय तसं जगायच ना बिनधास्त..
दुनिया माने बुरा तो गोली मारो,
डर के जीना हैं कोई जीना यारों।।
© PRATILIKHIT
Very good
Thank you