वृक्षवल्ली आम्हा सोयरे…
उन्हाळा सुरू झाला की आपल्यावर वृक्षारोपण, ओझोन, ग्लोबल वॉर्मिंग अशा जड जड शब्दांचा भडिमार होतो. उन्हाळ्याच्या तडाख्याने पोळलेली जनता यातून प्रेरित होऊन पावसाळ्याच्या सुरुवातीला सामूहिक वृक्षारोपण वगैरे सारखे कार्यक्रमही राबवतात. पण काळजी न घेतल्यामुळे यातली बरीच झाडं ही पाण्याअभावे सुकून जातात. आता तुम्ही म्हणाल की पावसाळा संपल्यावर माणसांना पिण्यासाठी पाणी मिळायची पंचाईत, तर तिथे झाडांना कोण पाणी घालणार…आणि मग वृक्षारोपण करूनही त्या नंतर येणाऱ्या उन्हाळ्यात ती जमीन बोडकीच..पण असेही काही अवलिया आहेत जे रोज संध्याकाळी या झाडांना नियमितपणे पाणी घालतात, त्यांची काळजी घेतात.
फिटनेसच्या नावाखाली हल्ली शनिवारी आणि रविवारी माझी आमच्याच इथे असलेल्या एका भागामध्ये रपेट होतेय. तसा तो भाग मानवी वस्तीपासून थोडा एका बाजूला आहे. इतका की संपूर्ण भारतात रस्ते बांधणीचं काम जोरात चालू असताना त्या भागातून जाणारा रस्ता तुम्हाला खड्ड्यातूनच गेलेला दिसेल.पण तिथे ना गाड्यांचा गोंगाट, ना कोणतं प्रदूषण. एका बाजूला मोकळी शेतं आणि दुसऱ्या बाजूला संथपणे वाहणारी भाटिबंदरची खाडी..हा भाग तसा पूर्णपणे हिरवागार आहे. आणि त्याचमुळे बरेच जेष्ठनागरिक, फिटनेसप्रेमी तिथे चालायला, धावायला म्हणून येत असतात. परिसर जरी हिरवागार असला तरी मध्ये काही काही ठिकाणी तुम्हाला एकही झाड दिसणार नाही. वरून नुसतं रणरणतं ऊन. हीच गोष्ट एका व्यक्तीने हेरली.
दूरदर्शनवर पाहिलेल्या पारंपरिक ठिबक सिंचनाच्या मदतीने त्या व्यक्तीने ठराविक अंतरावर लहान लहान रोपं आणून लावली.त्यांना नियमित पाणी मिळावं म्हणून त्याने त्या रोपाच्या बाजूला एक काठी बांधून त्या काठीला प्लास्टिकची बाटली उलटी बांधून ठेवली. त्या बाटलीच्या झाकणाला त्याने एक लहानसं भोक पाडून ठेवलं जेणेकरून त्या बाटलीतून थेंब थेंब पाणी त्या झाडाला सतत मिळत राहील. इतकं करूनही ते थांबले नाही तर प्रत्येक संध्याकाळी ते सायकलवरून तिथे येतात. बाटली रिकामी झाली असेल तर ती पूर्ण भरून ठेवतात. आजूबाजूची माती वाऱ्याने उडून गेली असेल तर ती पुन्हा नीट करतात. अशी एक नाही दोन नाही जवळपास शंभर रोपं त्यांनी लावली आहेत.
यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे. आपल्यापैकी अनेक जण हे सकाळी किंवा संध्याकाळी पाय मोकळे करण्यासाठी अशा ठिकाणी जात असतो. जाताना आपल्या सोबत एखादी छोटी पाण्याची बाटली घेऊन जातोच. फिरून झाल्यावर ते पाणी तसच घरी परत घेऊन येण्यापेक्षा तिकडच्या एखाद्या झाडाला टाकलं तर निसर्गाला आपली मदतच होईल. फक्त वृक्षारोपण करून नंतर त्या झाडांची काळजी घेता येत नसेल तर दिखाव्यासाठी असे कार्यक्रम राबवण्याचा काय उपयोग??
© PRATILIKHIT
No Comment