शिवछत्रपतींचा रायगड…
रायगड…नुसतं नाव जरी ऐकलं तरी नजरेसमोर उभा राहतो तो उत्तुंग,नजरेत न मावणारा, भव्य दिव्य असा किल्ला. तसा पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा. पण रायगडाची सर नाही त्याला. रायगड त्यापेक्षा दशगुणी उंच आणि दुर्गम. आज साडे तीनशे वर्षानंतरसुद्धा, एवढ्या सुख सोयी असूनसुद्धा रायगड एका दमात चढणं केवळ आणि केवळ अशक्यच.
ज्याने गड पाहिला नाहीये त्याला सुद्धा त्याच्या भव्यतेची जाणीव शब्दातून होते. शिवरायांनी ह्या गडालाच तख्त म्हणून निवडलं यात आश्चर्य ते कोणते..आता अर्थात आजचा लेख हा रायगडाचा इतिहास सांगण्यासाठी नाहीये. कारण तो तुम्हाला माहीतच असेल. मागच्या काही दिवसांत रायगडाला भेट देण्याचा योग आला. गडाचं संवर्धन वगैरे गोष्ट ठीक आहे पण खरंच रायगडाची आजची अवस्था पाहिली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. एकेकाळच्या वैभवाची, विरतेची, बलिदानाची आणि रयतेच्या राज्याच्या राजधानीच्या ह्या अवस्थेला जबाबदार कोण हा प्रश्नही इथे योग्य आहे असं नाही म्हणता येणार.
महाराष्ट्रातील गड किल्यांची इतर ऐतिहासिक वस्तूंशी तुलना करताना एक प्रश्न नेहमी उभा राहतो की इतर राज्यातील महाल, किल्ले हे आज शेकडो वर्षे होऊनही दिमाखात उभे आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते, यांना पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जातो तर आपल्या गडकोटांना फक्त स्फूर्तिस्थान म्हणून का पाहिलं जातं?
जेव्हा आपल्या देशात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित होत होती तेव्हा बहुसंख्य राजे हे मृत्यू आणि लुटीच्या भयाने इंग्रजांचे मांडलिक झाले. त्यांना इंग्रजांचं अभय होतं. या उलट मराठे हे शेवटपर्यंत इंग्रज सरकारशी प्राणपणाने लढले. त्यामुळे युद्धात एखादा गड पडला की सूडाच्या भावनेने इंग्रज त्या गडाची नासधूस करत. तो गड लुटून त्याला आग लावून देत. तो गड उध्वस्त करत.रायगड सुद्धा १८१८ मध्ये असाच प्रकारे कर्नल प्रॉथरने जिंकल्यानंतर उध्वस्त केला.
असं जरी असलं तरी गड फिरताना तिथे असलेल्या अवशेषांवरून तिथे असलेल्या दारूगोळ्याचं कोठार, राणीवशासाठी असलेला परस, शिवरायांचा महाल, गोड्या पाण्याचे तलाव, महादरवाजा, राज्याभिषेकाची जागा, टकमक टोक इत्यादी पाहून मन तृप्त होतं.
रायगडाची धूळ मस्तकी लावताना एक वेगळीच वीरश्री संचारते. नकळत झालेल्या हर हर महादेव च्या गर्जनेने अंगावर काटाच उभा राहतो. आणि गडाची दुरवस्था पाहून शोकांतिका मांडणारा सुद्धा जाताना इतिहासाचा साक्षीदार असल्यासारखा तृप्त होऊन बाहेर पडतो.
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment