‘वंदे मातरम’ की ‘वन डे मातरम’

‘वंदे मातरम’ की ‘वन डे मातरम’

 

१५ ऑगस्ट २०१८. कालच आपल्या भारत देशाचा ७२ वा स्वतंत्रदिन मोठ्या उत्साहात पार पडला. अगदी गल्लीपासून दिल्ली पर्यंत सर्वच ठिकाणी नानाविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसं पाहायला गेलं तर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे वर्षातले दोनच दिवस आपण स्वतःला भारतीय असं अभिमानाने म्हणवून घेतो. पण ते दिवस मावळताच पुन्हा आपण आपल्या धर्माच्या किंवा जातीच्या नावाने स्वतःचे दंड थोपटत एकमेकांविरुद्ध उभे ठाकतो. अर्थात आजचा विषय हा नाहीये म्हणा. पण ‘वंदे मातरम’ नाव देताना त्याचाही विचार करायलाच हवा.

जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला सुद्द्धा हौस होती. दोन रुपयांचा प्लॅस्टिकचा तिरंगा विकत घायचा..त्यात नारळाची किंवा कडक अशी काठी घालून सायकलच्या हाताच्या ब्रेकमध्ये अडकवायचा. फडफडता तिरंगा घेऊन सायकलवर रपेट मारण्यात एक वेगळीच मजा होती. पण या तिरंग्याचा मान जपण्यासाठी, त्याच रक्षण करण्यासाठी आणि त्याचा मान उंचावण्यासाठी कोणी कोणी किती खस्ता खाल्ल्या आहेत याबाबत आम्ही अगदीच अनभिज्ञ होतो. म्हणजे क्रांतिकारक वगैरे शब्द आम्ही ऐकून होतो पण तेव्हा ते समजण्याइतपत शहाणपण आलं नव्हतं. तो एक दिवस गेल्यावर विकत घेतलेला तिरंगा कुठे जायचा हे आज मला आठवतही नाही. पण जसजस कळू लागलं की यामुळे आपल्याच देशाचा आपण अवमान करतोय तस मी तिरंगा घेणं बंद केलं.

आपलं आपल्या देशावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आपण तिरंगा विकत घायलाच हवा का ?? आपण समजा आपण तो घेतलाच तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यायला नको. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवसांनंतर जागोजागी फाटलेल्या तिरंग्याचा खच पडलेला असतो. फक्त शाळकरी मुलंच नाही तर जाणत्यांच्या हातूनही हे होतंच.आणि मग काही स्वयंघोषित संस्था जाण ठेवून ते सर्व उचलतात आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावतात. अशी जनजागृती करणारे अनेक व्हिडिओ दर वर्षी येत असतात पण तरीसुद्धा आपण तसेच वागतो. आपण जर हौसेखातर तिरंगा विकत घेतोय तर त्याचा योग्य तो मान ठेवायला नको ???

अशा दिवशी आपण खूप मोठमोठ्या गोष्टी करतो. आपण किती देशभक्त आहोत हे समाजाला दाखवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. अगदी तिरंग्याच्या रंगात आपला फोटो रंगवून फेसबुक, व्हॅट्स अँप वर डीपी ठेवतो. मग इतर दिवशी तुमची देशभक्ती कुठे जाते. भारतमातेची एखादी कन्या जेव्हा मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडते तेव्हा तुमचे कान का बंद होतात ??
जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी काम करून घेण्यासाठी तुमच्याकडून लाच घेतो तेव्हा स्वतःच काम करवून घेण्यासाठी लाच देऊन आपण भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याच्या गोष्टी करतो तेव्हा आपण देशभक्ती किती वरच्या स्तरावर नेऊन ठेवतो ????

आज आपल्या देशाचं संपूर्ण जगात एक स्वतंत्र असं स्थान निर्माण झालं आहे. भ्रष्टाचार, घोटाळे वगैरे सगळं बाजूला ठेवलं तर अमेरिका आणि चीन नंतर सर्वात जास्त सैनिक भारताच्या भूदलात आहेत. भारतीय वायुसेना संपूर्ण जगात चौथ्या क्रमांकावर आहे तसेच भारतीय नौदलाचा पाचवा क्रमांक आहे. अवकाशक्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा उल्लेख संपूर्ण जगाने घेतलेला आहे. पण एवढं असूनही भारताला जातीयवाद आतून पोखरतोय. इंग्रजांनी जसं ‘ फोडा आणि राज्य करा.’ हे तंत्र अवलंबलं तेच आज पुन्हा होतंय. त्यामुळे पुन्हा भारत विभाजनाच्या वाटेकडे खेचला जात आहे. ‘ वंदे मातरम’ हे ब्रीद फक्त एक दिवसच नाही तर अखंड हिंदुस्थान जपण्यासाठी मनापासून आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे.

© प्रतिक प्रवीण म्हात्रे.

6680cookie-check‘वंदे मातरम’ की ‘वन डे मातरम’

Related Posts

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

गुन्हेगार

गुन्हेगार

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 120,412 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories