व्यथा…
ठाण्याला ऑफिस असल्यामुळे रोजचा विरार ते दादर, आणि मग दादर ते ठाणे असा लोकल प्रवास ठरलेलाच. अर्थात ऑफिस म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते एकदम चकाचक, लखलखणारं काचेचं ऑफिस…पण आमचं ऑफिस मात्र तसं नाहीये बरं का…साधारण तीस पस्तीस वर्षे जुन्या इमारतीत एका वन रूम एवढं आमचं ऑफिस..चालू होतंच संपून जातं.. मी गेली पाच वर्षे इथे असल्याने मला मात्र खूप मोठं असल्यासारखं वाटत..अगदी पिंजऱ्यातल्या पोपटासारखं…त्याला कसं त्याचा पिंजराच त्याचं जग वाटतो अगदी तसंच.
जेव्हा सुरुवातीला मुंबईला राहायला आलो तेव्हा भांडुपला भाड्याच्या घरात राहायचो. पण जेव्हा लग्न झालं तेव्हा वडिलांनी गावाकडे असलेला छोटा जमिनीचा तुकडा विकला आणि मला थोडेफार पैसे दिले. त्या तुटपुंज्या पैशात मुंबईला घर घेणं म्हणजे एखाद्या टिटवीने गरूडभरारी घेण्याचं स्वप्न पाहण्यासारखं आहे. त्या पैशात विरारलाच एक घर घेणं मला जमण्यासारखं होतं. कर्ज काढलं आणि घर घेऊन टाकलं.
पण म्हणतात ना..’कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है..’ घर तर घेतलं पण पाच तासाचा लोकल प्रवास जीवनात आला. हळूहळू त्याची सवय झाली आणि मग आयुष्य ‘घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर..’ एवढंच मर्यादित झालं.
तसा दिसायला मी साधारणच..महिना अखेर आली की घरी जेवण काय करायचं हा यक्ष प्रश्न उभा असतो समोर..मग दाढी करायला, नवीन कपडे घायला तरी कुठून पैसे आणणार. आज छोट्याला बरं नव्हतं म्हणून रोजची ट्रेन चुकली. थोडी उशिराची ट्रेन पकडली तर त्यात तुडुंब गर्दी..मोठया मुश्किलीने चढायला मिळालं..माझ्या पुढेच एक झकपक कपडे घातलेला माणूस उभा होता. एक दोनदा मागून आलेल्या धक्क्यामुळे माझा धक्का त्याला लागला. त्याने जळजळीत नजरेने माझ्याकडे पाहिलं. गर्दीत हात वर घ्यायलासुद्धा जागा नव्हती पण त्याला परत धक्का लागू नये म्हणून मी हात वरती करण्याचा प्रयत्न करू लागलो आणि त्या प्रयत्नात त्या माणसाच्या पाकिटाला माझा हात लागला आणि ते थोडंस वरती आलं. मी काही बोलणार तोच त्या माणसाने आरडाओरड करून शिव्या द्यायला सुरुवात केली. मी काही बोलणार तोच त्याचा ‘ढाई किलोचा हात’ माझ्या गालावर पडला. त्याने हात उचलतात आजूबाजूच्या इतर माणसांनी सुद्धा माझं काहीही न ऐकता मला मारायला सुरुवात केली. अगदी जीव तोडून मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण कुणी सुद्द्धा माझं ऐकून घेतलं नाही. एका शिक्षित माणसासमोर मला सर्वांनी तुच्छच समजलं असेल बहुदा.
दुपारी जेवणाच्या सुट्टीत सगळे जण घरून आणलेला डबा उघडत होते. मलाही सांगितलं सगळ्यांनी. पण कसला डबा आणि कसलं काय…’बाहेर खाऊन येतो..’ असं म्हणून बाहेर पडलो आणि इडली डोशाकडे वळणारी पावलं आज आपसूकच वडापावच्या गाडीकडे वळली. घरी बायकोने आणि छोट्याने काय खाल्लं असेल याच विचारत एक वडापाव खाऊन पुन्हा कामावर गेलो.
संध्याकाळी ठाण्यावरून दादरला येईपर्यंत मोफत मसाज झाला होता. माझ्यासारख्या गरिबाला कुठे एखाद्या स्पा किंवा मसाज पार्लर मध्ये जायला मिळणार. दादरला ज्या डब्यात चढलो त्याच डब्यात एक भजनी मंडळाचा ग्रुप आहे. नाला सोपारा येईपर्यंत छान भजन गात असतात ते. थोडावेळ डोळे बंद केले तरीही तल्लीन व्हायला होतं. गाडीत जागा अडवून जुगार खेळणाऱ्या धनदांडग्यांपेक्षा भजन मंडळी नक्कीच चांगली.
दमून भागून घरी पोचलो आणि बायकोच्या हातची भाकर खाऊन लगेच निद्राधीन झालो. सकाळचा प्रकार घरी सांगितला नाही पण तरीसुद्धा मनातून विचार जाता जात नव्हता.
‘ का…???’ का फक्त आम्हीच नेहमी अन्याय सहन करायचा???…निर्दोष असताना देखील का आम्हीच नेहमी शिक्षा भोगायची. आम्हाला सुखाने जगण्याचा हक्क नाही का?? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना तुम्ही तुमच्या सोसायटी मध्ये राहायला देता…विकतच घेतात ना ते तुम्हाला…आणि आम्ही गरीब म्हणून आम्हाला हडतुड करता.आम्ही कधी घर बघण्यासाठी आलो की सर्वप्रथम तुमच्या नजरेत संशय दिसतो. तुम्ही पैशाने माणसाची किंमत करायला लागला आहेत..आम्हीही जगू आमच्या पध्द्तीने आमचं आयुष्य…कोणालाही कमी लेखताना फक्त एकदा विचार करा..पैशाच्या बाबतीत गरीब आहोत आम्ही…पण भिकारी नक्कीच नाही…
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
खूप सुंदर विचार मांडला आहेस…व्यक्तीची श्रीमंती पैशाने नाही तर त्याच्या गुणांनी असते हे सर्वांंना कळायला हवे😀