मैत्री.
पुढील लघुकथा ही पुर्णपणे काल्पनिक नसून तिचा वास्तवाशी थेट संबंध आहे.(माझाच नव्हे तर सगळ्यांचा..) आणि तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजू नये.
फेसबुकची वॉल स्क्रोल करत असताना शिवमला एका मुलीचा मेसेज आला. सवयीप्रमाणे त्याने रिप्लाय करायच्या आधी तिच्या प्रोफाईलला भेट देऊन आणि तिला टॅग केलेले फोटो पाहून ते फेक अकाउंट नसल्याची खात्री करून घेतली आणि मग त्याने तिला रिप्लाय केला. फेसबुकवर बोलता बोलता दोघांमधली मैत्री हळूहळू वाढत गेली. आणि मग ‘ व्हॅट्स अँप वर असशीलच तू…’ या थोड्याशा जुन्या झालेल्या नंबर मागायच्या पद्धतीने त्या दोघांमधली मैत्री फेसबुक वरून व्हॅट्स अँप वर आली.
दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. कधी तरी त्यांच्यात बोलणं व्हायचं. अशातच साधारण वर्ष गेलं. या वर्षभरात दोन तीनदा ते दोघे ठरवून भेटले देखील. तेवढ्या भेटी आणि बोलणं सोडलं तर एकमेकांच्या खासगी आयुष्यबाबत त्यांना तिळमात्र सुद्धा कल्पना नव्हती. हळू हळू त्यांच्यातलं बोलणं वाढत गेलं. कधी कधी होणारं चॅट रोज होऊ लागलं. अगदी बोलायला काही विषय नसेल तरीसुद्धा दोघे बोलत असायचे. आणि मग अचानक काही दिवसांनी तिच्याकडून रिप्लाय यायचं प्रमाण कमी झालं. ऑनलाईन असून सुद्धा आपल्याला रिप्लाय उशिरा येत आहेत म्हणून मग शिवम थोडासा अस्वस्थ व्हायला लागला. तिला मेसेज केल्यावर मेसेजला ब्लू टिक आलीये का हे तो दर दोन मिनिटांनी चेक करायचा. आणि ब्लू टिक असूनही जर तिने रिप्लाय केला नसेल तर याची प्रचंड चिडचिड व्हायची. आणि मग या चिडचिड आणि अस्वस्थतेला पर्याय म्हणून मग त्याने सिगारेटला त्यावरचा उपाय समजायला सुरुवात केली.
तिने एखाद्या मुलासोबत फोटो जरी टाकला तरी तो फोटो पाहून बैचेन व्हायचा. त्या मुलाचं तिच्यासोबतचं नात शोधण्याचा प्रयत्न करायचा. पण ऑनलाईन ओळख झाल्यामुळे त्या दोघांमध्ये mutual असं कोणीच नव्हतं. आणि त्याने कधी तिला विचारायचा प्रयत्न सुद्धा नाही केला. नेहमी स्वतःच असा काहीतरी निष्कर्ष काढून मोकळा व्हायचा.
असं बरेच दिवस चाललं आणि मग त्या दोघांमधली मैत्री केवळ नाममात्र उरली. या सगळ्या गोष्टींची तिला मात्र अजिबात कल्पना नव्हती. हळू हळू त्याने रोज मेसेज करणं बंद केलं. पुन्हा पूर्वीसारखं कधी तरी बोलणं व्हायला लागलं. जर त्यांच्यातल्या गैरसमज वेळीच दूर झाले असते तर ही वेळ आली नसती.
यामध्ये ती आणि तो दोघेही एका जलाशयाप्रमाणे होते दोन्ही जलशयांचं स्वतंत्र अस्तित्व होतं. आणि मैत्री ही त्या दोघांना जोडणारी नदी. एका जलाशयाला अनेक नद्या येऊन मिळतात पण तो जलाशय सर्व नद्यांना आपल्यात सामावून घेतो. कोणत्याही नदीला पाणी कमी पडणार नाही याची काळजी तो जलाशय घेतो. पण दोघांनीही काळजी न घेतल्याने ती नदी आटली आणि तिचा प्रवास खुंटला.
आपल्या बरोबरसुद्धा होतं असं बऱ्याचदा…आपण प्रवाहाबरोबर वाहत जातो. आणि शेवटच्या टोकाला पोहोचलो की मग पुढे जायचा मार्ग नाही म्हणून मग पुन्हा मागे प्रवास करायला सुरुवात करतो. पण वाहत जात असतानाच आपण मार्गातील शेवटच्या टोकाकडे न जाता तो मार्गच जर एन्जॉय केला तर आपल्यावर शिवमसारखी वेळ येणार नाही आणि तो प्रवाह समजून घेण्यासही मदत होईल. कारण एकदा का आपल्याला कळलं की इथे पाणी सोडून काही होणार नाहीये मग आपण आपल्या मनाच्या धरणाचे दरवाजे बंद करू शकतो जेणेकरून भावनारूपी पाणी आपल्या मनातून उगाच वाहून त्याचा कोणालाच त्रास होणार नाही.
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment