फॅन…
सकाळीच एक व्हिडिओ पाहण्यात आला. आवडत्या खेळाडूने ऑटोग्राफ दिला नाही म्हणून संतप्त झालेला एक फॅन तो खेळाडू किती गर्विष्ठ किंवा उद्धट आहे अशी मुक्ताफळे उधळत होता. अर्थात कोणतीही जबाबदार व्यक्ती ही कधीच (काही अपवाद वगळता ) उद्धटपणे वागत नाही. आपण आपल्या आवडत्या खेळाडूची किंवा एखाद्या कलाकाराची जी लाईफ पडद्यावर पाहतो त्यांचं खरं आयुष्य हे कितीतरी वेगळं असतं. शेवटी सेलेब्रिटी असले तरीसुद्धा ते माणूसच आहेत आणि माणूस म्हटला की पर्सनल आयुष्य हे आलंच. तुम्ही जर कधी एकदम वैतगलेले असाल आणि तुम्हाला कोणी येऊन काही विचारलं तर तुमची चिडताच की नाही…
आपण जेव्हा एखाद्या आपल्या आवडीच्या आणि प्रसिद्ध व्यक्तीला भेटण्याचा किंवा त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती व्यक्ती ही लोकांना भेटण्यासाठीच तिथे आली असेल तर ठीक आहे. पण ती जर तिच्या खासगी कामासाठी किंवा तिच्या रोजच्या कामातून दमून घरी जात असेल आणि तुम्ही त्यांच्याशी जबरदस्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्याची प्रतिक्रिया ही स्वाभाविक आहे..त्यांनासुद्धा खासगी आयुष्य आहे की नाही. आणि समजा त्यांनी तुम्हाला स्पेशल वागणूक देऊन तुम्हाला भेटले वगैरे तर मग बाकीच्या फॅन्सना सुद्धा आशा लागून राहते. आणि मग एक व्यक्तीमुळे इतर अनेक जणांचा हिरमोड करणं सेलेब्रिटी प्रकर्षाने टाळतात.
आपण ज्या व्यक्तीचे फॅन आहोत त्यांना भेटावं असं आपल्याला नेहमीच वाटत असतं आज त्यात काही वावंगही नाही. पण तो आपल्या समोर असून सुद्धा आपण त्यांना भेटू शकलो नाही तर मग उगाच चिडचिड करून काय साध्य होणार आहे. असे कितीतरी फॅन मी पाहिलेत जे त्या सेलिब्रिटीला भेटण्याची इच्छा न ठेवता फक्त त्यांना फॉलो करत असतात. एक तर अशीही आहे की विराट कोहलीचं लग्न झाल्यावर सुद्धा त्याचे आणि अनुष्का शर्माचे एकत्र फोटो टाकून त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधत असते.
फॅन असावं…आवडत्या व्यक्तीला फॉलोही करावं…पण त्या व्यक्तीच्या एखाद्या कृतीमुळे आपल्याला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी..
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment