गॅलरीतला पाऊस…..🌦🌧🌩
तसा पावसात घराबाहेर पडायचा मला कंटाळाच..अगदीच काही महत्वाचं काम असेल तरच काय ते बाहेर निघायचं. कारण कितीही मोठी छत्री, रेनकोट घालून गेलं तरी शेवटी भिजायचं ते भिजतोच आपण. छत्री घेऊन गेलं म्हणजे नुसती आपल्या मनाची समजूत..जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा मात्र त्या पावसात भिजण्यात खूप गंमत असते..वर्षाचे आठ नऊ महिने उन्हाच्या झळा सोसल्यावर आलेल्या पहिल्या पावसात चिंब भिजण्याची मजाच काही वेगळी असते.पण जसा पावसाचा जोर वाढत जातो तसा तो आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, आपल्याला तो किती आवडतो अशा बाता मारणारे सुद्धा त्याला नंतर नावंचं ठेवतात.
आता हेच बघा ना…अगदी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाच्या प्रवासाची बितंबातमी देणारे, पाऊस आल्यावर वातावरणात झालेला बदल अगदी रंगवून सांगणारे मीडिया वाले सुद्द्धा गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे होणारी वाहतूककोंडी, रद्द झालेल्या लोकल ट्रेन्स, आणि ठप्प झालेले व्यवहार…याच बातम्या दाखवत आहेत.
म्हणूनच पावसाची मजा अनुभवण्यासाठी बाहेर पडण्यापेक्षा घरातच खिडकीत किंवा गॅलरीत बसून बाहेर धोधो कोसळणारा पाऊस बघणं मी नेहमीच पसंत करतो. पडत्या पावसात गरमागरम कॉफी पिण्याचा आनंद तो काय वर्णावा…
पावसाची अनेक रूपे बसल्या जागी आपल्याला अनुभवायला मिळतात. कधी फक्त हलकेच बारीक भुरभुरणारा, कधी सरळ उभा पडणाऱ्या पांढराशुभ्र जाडसर थेंबाचा, कधी आडवा तिडवा धो धो कोसळणारा, तर कधी सरकत पुढे पुढे जाणाऱ्या तिरक्या धारांचा पाऊस.
पडत्या पावसातसुद्धा उंच झाडावर चिडीचूप बसून राहीलेले बगळे, मध्येच पंखांवरचा पाणी झटकून पिसे फुलवून घरट्यात दडून बसणाऱ्या चिमण्या, बुलबुल…एखाद्या प्रामाणिक पहारेकऱ्याप्रमाणे झाडाच्या फांदीवर बसून टेहळणी करणारा खंड्या (kingfisher)…आडोसा पकडून अंग फुलवून झोपी गेलेली मनी..आणि पावसापासून बचाव करण्यासाठी कोणाच्या तरी टेरेस चा आसरा घेणारे कावळे…सर्वच जण आपापल्या परीने पाऊस एन्जॉय करत असतात.
लहान असताना जेव्हा खिडकीत बसायचो तेव्हा बाहेर कोसळणाऱ्या पावसाने खिडकीच्या काचा आतल्या बाजूने बाष्पामुळे धुरकट होत. त्याच्यावर बोटांनी रेघोट्या ओढायला फार मजा येई. त्या काचेवर आनंदी, दुःखी असे चेहरे काढायला नाहीतर आपली नाव लिहायला खूप भारी वाटायचं.. पावसाची जोराची झड खिडकीच्या आत आल्यावर उडणारे थंडगार तुषार मी दोन्ही हात पसरून चेहऱ्यावर घेई. खिडकीसमोर एखादी तिरकी जाणारी वायर लटकलेली असे. त्यावरून हे पावसाचे थेंब एकमेकांशी स्पर्धा करीत धावत जात.
कधी कधी घराबाहेर न पडता घरातच बसून बाहेर बरसणाऱ्या त्या पावसाकडे पाहिलं तरी आपल्याला एक अवर्णनीय सुख अनुभवायला मिळतं.. या लेखाच्या निमित्ताने सभोवताली अनुभवायला मिळालेल्या सर्व गोष्टी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment