​दिवाळी : आधीची आणि आत्ताची

     दिवाळी…नुसतं नाव जरी घेतलं तरी आठवतो तो दिवाळीचा चविष्ट फराळ, फटाक्यांची आतिषबाजी, नवीन कपड्यांची ,दागिन्यांची , घरातल्या वस्तूंची खरेदी, सुंदर सुंदर रांगोळ्या.

           पण जसजसे आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत आपली संस्कृती हळू हळू लोप पावत आहे. पूर्वी दिवाळी म्हणजे किती उत्साह असायचा.  किमान महिनाभर आधी दिवाळीची तयारी सुरु व्हायची. लाडू, करंज्या,  चकली, चिवडा,अनारसे, शंकरपाळ्या असे फराळाचे नाना जिन्नस घरीच बनवले जायचे. सगळे नातेवाईक एकत्र मिळून सगळा फराळ बनवायचे. त्यांच्या नात्यातला गोडवा ह्या फराळाच्या चवीत उतरायचा. पण आता ही गोडी कुठेतरी कमी झाली आहे. आता आपण हे सगळे जिन्नस आयते विकत आणतो. त्याला कारणंही तसंच आहे म्हणा.कामानिमित्त आपण शहरात स्थायिक झालो. एकटी स्त्री तिची नोकरी सांभाळून एवढे सगळे पदार्थ कसे बरे बनवणार? त्यामुळेच रेडीमेड फराळाकडे हल्ली जास्त कल असतो.

     दिवाळीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आकाशकंदील. पूर्वी हे आकाशकंदीलसुद्धा घरीच बनवले जायचे. प्रत्येक गावानुसार त्या कंदिलाला पारंपरिक साज चढत असे. आपण मात्र आपण आयते बनवलेले आकाशकंदील आणतो. त्यामुळेच स्वतः आकाशकंदील बनवण्यात काय गंमत असते हेच आपण विसरून गेलो आहोत.

         आजकाल दिव्यांच्या माळा सुद्धा बल्बच्या असतात. काय तर म्हणे दिवे लावल्याने तेलाचा अपव्यय होतो. असा विचार जर आपण करू लागलो तर अजून काही वर्षांनी दिवाळी साजरी होईल की नाही ही शंका सुद्धा मनात आल्याशिवाय राहत नाही.

           दिवाळीचं अजून एक आकर्षण म्हणजे किल्ले बनवणे. पूर्वी लहान मुलं मोठ्या हौशेने किल्ले बनवायची. त्यावर तोफा, मावळे अशी सुंदर रचना असायची. पण आताच्या मुलांना किल्ला कसा असतो हे सुद्धा माहित नाही मग किल्ला बनवणं हि तर फार लांबची गोष्ट. 

        रांगोळ्यांचे सुद्धा आता रेडीमेड सेट मिळतात. पूर्वी रांगोळी काढणं हे मुलींचं आवडतं काम असायचं. तासंतास मुली रांगोळ्या काढत असायच्या. संस्कारभारती, ठिपक्यांची रांगोळी अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या पाहायला मिळत. 

         या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट उत्तम झाली आहे की आताच्या जनजागृतीमुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात तरुणाईचा भर आहे. पूर्वी फटाके नव्हते तरी दिवाळी साजरी होतच होती आणि आताही ती फटाके न वापरता साजरी होऊच शकते.

           आपण फक्त आपल्याला आपली संस्कृती जपली पाहिजे म्हणून मोठमोठ्या वल्गना करत असतो. पण नुसत्या रांगोळ्या , किल्ले बनवण्याच्या स्पर्धा भरवून हे साध्य होऊ शकते का? फक्त पाडव्याच्या दिवशी मिरवणूक काढायची, पारंपरिक वस्त्रे परिधान करायची एवढ्यानेच आपली संस्कृती थोडीच टिकून राहणार आहे. आपला पारंपरिक वारसा आपल्या पुढील पिढीला समजायला हवा तरच त्यांना आपल्या संस्कृतीचं महत्व कळेल. एकीकडे पाश्चिमात्य देश आपल्या भारतीय संस्कृतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हीच आपली भारतीय संस्कृती आपल्याच देशात लोप पावत आहे या पेक्षा दुसरं दुर्दैव ते काय म्हणावं लागेल?

शुभ दीपावली !!

–                             प्रतिक प्रवीण म्हात्रे

1740cookie-check​दिवाळी : आधीची आणि आत्ताची

Related Posts

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

गुन्हेगार

गुन्हेगार

2 Comments

  1. Hi Pratil. So sweeeet i luv d way u wrute. sry i was away 4 sum time n dint messg on ur posts bt now m back n will read all ur posts i luv u bye

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories