स्वतंत्र भारत
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली आणि ते हुतात्मे झाले. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले आणि कुणी काय केले हे आपण ऐकतो.पण ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती दिली त्यांची इच्छा काय होती हे कोणालाही माहीत नाही. आज या हुतात्माची तळमळ मी आपल्यापुढे मांडीत आहे…
आपण बनविलेल्या हुतात्मा चौकात मी शांत पडून होतो. म्हटले, चला.. आपल्या लाडक्या तिरंग्याला सलाम करावा , म्हणून मी बाहेर पडलो. गेले दोन दिवस मी सारा देश पालथा घातला आणि लाजेने मानचं खाली घातली.
आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मी आहे तरी कोण?? मी आहे बाबू गेनू, मी आहे टिळक, मी आहे सावरकर आणि मीच आहे सुभाष चंद्र बोस.. सगळ्या हुतात्म्यांचा चौक बांधून तुम्ही कर्तव्यातून मोकळे झालात, पण आज आम्ही तळमळत आहोत कारण इथे प्रत्येक माणूस गुलाम आहे. प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगायला शिकलाय. अरे !! स्वातंत्र्य म्हणजे काय स्वतःसाठी जगणे का? पण ते तुम्हाला कसं समजणार ? कारण आजचा तिरंगा बाजारात विकत मिळतो. २६ जानेवारी असु दे किंवा १५ ऑगस्ट असु दे. तिरंग्याला सलामी दिली कि संपले तुमचे कर्तव्य. अरे हा तिरंगा आम्हाला इंग्रजांच्या जेल मध्ये तयार करावा लागला. पांढऱ्या शुभ्र कपड्यावर हिरवा पानांचा गंध करून हिरवा रंग निर्माण केला, छातीवर गोळ्या झेलून भगव्या रंगाची होळी केली, तेव्हा हा तिरंगा झेंडा फडकला.
अरे नशेच्या आहारी जाणारया तरुणांनो!!! आम्हीही कधी तरी तरुण होतो.आम्हाला सुद्धा नशा होती पण ती स्वातंत्र्याची, स्वार्थाची नव्हे.
इथे सर्व काही नीट आहे तरी दुष्काळ कसा? देश माझा स्वतंत्र झाला तरी मी गुलाम कसा? इंग्रज तर निघून गेले तरी इथे जातीवाद कसा? आई आहे, बाप आहे तरी मी पोरका कसा?चुलीवर अन्न शिजते आहे तरी मी उपाशी कसा? कष्टाची इच्छा जरी प्रबळ आहे तरी मी बेकार कसा? आजच्या तरुणांचे रक्त शांत आहे. हुतात्मा बाकी तळमळत आहेत.
एक कळकळीची विंनती आहे. देशबांधवांच्या रक्ताचे पाट वाहून मिळवलेल्या देशाला सदैव सुजलाम सुफलाम ठेवा.हीच खरी आपल्या हुतातम्याची आदरांजली असेल.
जय हिंद !
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment