नाण्याची दुसरी बाजू

नाण्याची दुसरी बाजू

 

“संदिप यार, नाही सहन होत आहे मला आत्ता हे… किती पैसे दिले कीर्तीला, तरी सुद्धा ती धमकावतेच आहे मला. ” आशु रडकुंडीला येऊन म्हणाला.

“काय झालं ?? कसले पैसे?? तुझं आणि तिचं तर ब्रेकअप झालं ना. तू आधी शांत हो, मी घरी आल्यावर आपण ह्या विषयावर बोलूया. आता एका मीटिंगमध्ये आहे. मी लवकर निघतो आज ऑफिस मधून.” एवढं बोलून संदीपने घाईघाईने फोन कट केला.

आशुतोष आणि संदीप दोघे कॉलेजपासूनचे मित्र. दोघेही जिगरी यार. एकाच्या आयुष्यात काही घडलं आणि त्याची दुसऱ्याला खबर नाही असं कधी व्हायचं नाही. मात्र मागील काही दिवसांपासून आशुतोषच्या आयुष्यात एक प्रॉब्लेम सुरु होता. आशुतोष आणि त्याची गर्लफ्रेंड कीर्ती दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला आणि त्याची परिणीती ब्रेकअप मध्ये झाली. बरं दोघेही घरापासून लांब राहत असल्यामुळे त्यांच्यात जरा जास्तच जवळीक निर्माण झाली आणि अनावधानाने त्यांच्या हातून ती चूक घडली. त्या नंतर पुढचे काही महिन्यात त्या दोघांमधले संबंध बिघडले आणि अचानक एक दिवस आशुतोषला कीर्तीच्या भावाचा फोन आला.

अनोळखी नंबर पाहून आशुतोषने पहिल्या वेळी फोन उचलला नाही. त्या नंतर पुन्हा एकदा त्याच नंबरवरून फोन आलेला पाहून आशुतोषने फोन उचलला.

“हॅलो..”

“हॅलो… आशुतोष बोलतोय का ?”

“हो. बोलतोय. तुम्ही कोण बोलताय??”

“मी कीर्तीचा भाऊ बोलतोय.”

कीर्तीच्या भावाचा फोन आहे हे कळल्यावर आशूच्या पायाखालची जमीनच सरकली. पण लगेच त्याने स्वतःला सावरलं.

“हा. बोला ना.”

“काय बोलायचं बाकी ठेवलंय तू???”

“म्हणजे?? काय झालं ??”

“वाह. मलाच विचार आता काय झालं म्हणून. करताना लाज नाही का वाटली??”

“काय केलं मी??” आशुतोष आणि कीर्तीकडून घडलेला तो क्षण झर्रकन त्याच्या डोळ्यासमोरून गेला.

“माझ्या बहिणीवर जबरदस्ती करताना, तिचा फायदा घेताना लाज नाही वाटली का तुला??”

“मी…. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जबरदस्ती वगैरे नाही केलीये.”

“अच्छा मग मी खोटं बोलतोय का?? कीर्ती खोटं बोलतेय का??” कीर्तीच्या भावाने आवाज चढवत विचारलं.

“तुमचा गैरसमज झालाय दादा काहीतरी. मी जबरदस्ती वगैरे नाही केलीये काही. तू हवं तर कीर्तीला विचारू शकतोस.”

“कीर्तीनेच मला सांगितलंय तू काय केलंस तिच्या सोबत ते. त्यामुळे गप गुमाने मी सांगतो तसं कर नाहीतर तुझं आयुष्य बरबाद करून टाकेन.”

“धमकी देताय तुम्ही मला???”

“तसं समज हवं तर. तुला तर माहितीच आहे की निदान आपल्या देशात तरी मुलीने केलेल्या आरोपाची प्राथमिक चौकशी केली जात नाही. माझं ऐकलंस तर ठीक नाही तर…”

“काय हवय तुम्हाला???”

“फार काही नाही. फक्त एक लाख रुपये..” कीर्तीचा भाऊ मिश्कीलपणे हसत म्हणाला.

“काय.. पण मी कुठून आणू एवढे पैसे?? एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. “

“तू तुझा प्रश्न आहे. चोरी कर, दरोडा घाल पण मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. तुला एका आठवड्याची मुदत देतो. “

“अहो पण..” आशुतोषने काही बोलण्याच्या आतच समोरून फोन कट झाला.

आशुतोषने कीर्तीला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याचा फोन कट केला. त्याने व्हॅट्स अँप वर मेसेज केला तर तिने त्याला ब्लॉक केलं. आशुतोषला काय करावं कळत नव्हतं. त्यातच भरीस भर म्हणून कीर्तीचा भाऊ त्याला रोज फोन करून धमकावायचा. त्यामुळे आशुतोषने घाबरून जाऊन घरी अडचण आहे असं सांगून संदीपकडून पैसे घेऊन कीर्तीच्या भावाला दिले होते. पण आता पुन्हा पैशाची मागणी होतेय म्हटल्यावर त्याचा धीर खचला. संदीपला खरं सांगावं तर आधी त्याच्याशी खोटं बोलल्याची साल त्याच्या मनात होती. घरी ह्याबाबत सांगावं तर त्यांना धक्का बसेल म्हणून त्यांना सांगणंही सोयीच नव्हतं. पोलिसात जावं तर पोलीस त्याच्यावर कितपत विश्वास ठेवतील, की कीर्ती आणि तिचा भाऊ काही वेगळं नाट्य राहून त्याला बदनाम करतील अशी भीती त्याला वाटत होती. स्वतःची चूक नाही, घरच्यांनी त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा यामुळे आत्महत्या करणं त्याला पटत नव्हतं. काय करायला हवं होतं त्याने अशा परिस्थितीत??

फक्त आशुतोषच नाही तर अशी कितीतरी मुलं ह्या गोष्टीची शिकार होतात. आपल्या सर्वानांच मुलींवर होणाऱ्या अन्यायाची चीड येते. अर्थात ती यायलाच हवी. मग तो मुलीवर झालेला असु दे किंवा मुलावर. ह्यामध्ये जसं मुलींचं आयुष्य बरबाद होतं तसंच मुलींच्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे सूड उगवण्याच्या मनस्थितीमुळे एखाद्या निर्दोष मुलाचही आयुष्य बरबाद होऊ शकत. जेव्हा एखाद्या मुलीवर अन्याय होते तेव्हा संपूर्ण जग तिच्या पाठीशी उभं राहतं आणि ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. पण एखाद्या निर्दोष मुलावर खोटे आरोप केले जातात त्या वेळीही जग डोळे, कान बंद करून त्या मुलालाच दोषी ठरवून मोकळे होतं. अर्थात अशी घटना घडण्याचं प्रमाण अत्यल्प आहे पण अशा घटना घडतात. मुलींना कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्याचा वापर करायलाच हवा. पण त्या अधिकाराचा दुरुपयोग करू नये. जो अपराधी असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी पण निर्दोष व्यक्तीला आपल्या स्वार्थासाठी अपराधी ठरवलं जाऊ नये. कोणत्याही मुलावर किंवा मुलीवर अशी वेळ आणू नये ज्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बरबाद होईल.

(आजचा लेख लिहिण्याचा उद्देश हाच होता की समाज अजूनही अन्याय हा फक्त मुलींवरच होतो अशा गैरसमजात आहे. आणि कुणी दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की मागचा पुढचा विचार न करता, त्याचे विचार जाणून न घेताच त्याची विचारसरणी कशी महिलांविरोधी आहे हे सांगून मोकळे होतात लोक.)

© PRATILIKHIT

Make sure you also check our other articles in Marathi.
इतर मराठी लेख

https://punjabkesari.com/bollywood-kesari/jasleen-kaur-case-sarvjeet-singh-bedi-acquitted-after-4-years/

https://zeenews.india.com/marathi/blogs/sandeep-deshpande-blog-on-arthur-road-jail/402078

https://www.indiatoday.in/india/story/delhi-businessman-suicide-blame-haryanavi-singer-instagram-video-last-truth-1728834-2020-10-06

15330cookie-checkनाण्याची दुसरी बाजू

Related Posts

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

गुन्हेगार

गुन्हेगार

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories