शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू

डिसेंबर १९२८, भगत सिंग आणि त्यांचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार केले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स नावाचा अधिकारी बळी पडला. १९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली.३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेमुळे १७ नोव्हेंबर, १९२८ ला त्यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली. सरदार भगतसिंग ह्यांच्यावर अनेक चित्रपट, लेख वैगैरे आले. त्यामानाने शिवराम राजगुरू आणि सुखदेव हे थोडेसे दुर्लक्षितच राहिले. आज शिवराम राजगुरू यांची जयंती. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील ह्या महान क्रांतिकारकाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी हा आजचा लेख आहे.

शिवराम हरी राजगुरू ह्यांचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. लहानपणी १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले. आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयत, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने – वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती, आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते.

मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायामविशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतले. आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूंजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिव वर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर पिस्तूल न घेताच परतले. सायंकाळ असल्याने शर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले, आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरुळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरुळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती. पोलिसांनी नाद सोडून दिला. पोलीस गेल्यावर मथुरेच्या दिशेने राजगुरू पळत सुटले. पुढील २ स्थानके त्यांनी पळतच पार केली. नंतर मथुरेच्या गाडीत बसून मथुरेत आले. येथे यमुनेकाठी कपडे धुऊन वाळूतच झोपले. तिसऱ्या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर वर्मांना धक्काच बसला!

त्या काळी सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले. लाहोरला पंजाबकेसरी लाला लजपतराय यांनी कमिशनची वाट अडवली. पोलीस अधिकारी स्कॉट याने साँडर्स याच्यासमवेत लालाजींवर जबरदस्त लाठीमार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशीच सायंकाळी लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या, ‘‘लालाजीकी चिता की आग ठंडी होने के पहलेही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिये!’’ त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंग व्याकूळ झाले. त्यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव पार्टीत मांडला. स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणे आवश्यक होते, की स्कॉटला का मारावे लागले? आणि हे काम भगतसिंह करू शकत होते. पण राजगुरूंना हे मान्य नव्हते. राजगुरू हट्टाने पेटून उठले. त्यांना मोहिमेत सामील केले गेले.

योजना अशी आखण्यात आली की, मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरू त्याच्या इशाऱ्यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंग यांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंगांनी खुणेनेच सांगितले की हा नसावा, पण ही ‘नसावा’ ची खूण राजगुरूंच्या लक्षात आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिगांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी चालत नव्हते. त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले, की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही.

साँडर्सच्या हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेषात राजकोटला निसटले. (या वेळी भगवतीचरण व्होरा यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांनी भगतसिंहांच्या पत्‍नी असल्याचे नाटक तान्ह्या लेकरासह केले होते.) राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंगांबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, `जागृत’ पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले.

त्यानंतरच्या काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशनसमोर कंपनीबागेत सुरू ठेवला. राजगुरूंच्या या धारिष्ट्यास काही सीमाच नव्हती. बरेच महिने राजगुरू काशीत उघडपणे, निर्भयतेने वावरत होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात पाहिले. पण कोणासही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक असेल! अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. पण अखेर सप्टेंबर, १९२९ मध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले. पुढे जेलमध्ये आमरण उपोषण, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार ह्या घटना घडल्या. भगतसिंग, सुखदेव व अन्य काही क्रांतिकारक त्यांच्या समवेत होतेच.सर्वांना राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी उपोषण सुरू केले. राजगुरू अर्थातच पुढाकार घेत होते. डॉक्टर रोज सकाळी १०-१२ सहकाऱ्यांना घेऊन रबरी नळीने, जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्‍न करीत. या पोलिसांच्या प्रयत्‍नांमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागला, शारीरिक हाल-अपेष्टांचा सामना करावा लागला. पण याही स्थितीत सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.

लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.

राजगुरूंचे राष्ट्रीय स्मारक भारताच्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला येथेच आहे. शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले.राजगुरू वाडा हे राजगुरूंचा जन्म झालेले त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.२,७८८ चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली ही वास्तू पुणे-नाशिक रोडवरील भीमा नदीच्या काठावर आहे. शिवराम राजगुरू यांचे स्मारक म्हणून ते राखले जात आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती (एचआरएसएस) ही स्थानिक संस्था २००४ पासून प्रजासत्ताक दिनी येथे राष्ट्रध्वज फडकावते.

शिवराम राजगुरू यांच्या जीवनावर ‘हुतात्मा शिवराम हरी राजगुरू’ हा मराठी चित्रपट सुद्धा आला होता. अंशुमन विचारे यांची त्यात मुख्य भूमिका होती. चित्रपटाची लिंक सुद्धा खाली देत आहे.

माहिती – विकिपीडिया, २०२ साहसकथा (वि.श्री.जोशी)

PRATILIKHIT

14550cookie-checkशिवराम हरी राजगुरू

Related Posts

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

मराठीचा मानापमान

मराठीचा मानापमान

बुलबुलांचं रुटीन

बुलबुलांचं रुटीन

ये है मुंबई मेरी जान…

ये है मुंबई मेरी जान…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 258,922 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories