
गणपती विसर्जन की विघटन ???
अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हमखास दिसणारे दृश्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेले गणेश मूर्तींचे भग्नावशेष आणि निर्माल्य..ही स्थिती याच वर्षी नाही बरं का..तर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न सरकार आणि सर्व पर्यावरण मित्रांपुढे आ वासून उभा आहे पण यावर ठोस अशी काही उपाययोजना अजूनही करता आलेली नाही.
दर वर्षी गणपती विसर्जनानंतर आपल्या मंगलमूर्तीचे अवशेष हे इतस्ततः विखुरलेले असतात. अगदी आपण खोल समुद्रात नेऊन जरी गणेशमूर्तीचे विसर्जन केले तरीसुद्धा ते काही काळाने किनाऱ्याला लागतात. काही मूर्तींचे हात तुटलेले असतात, काहींची सोंड..काही मूर्ती तर शंकर आणि गणपती मध्ये झालेल्या युद्धाचीच आठवण करून देतात. गणेश मूर्ती छोटी असो किंवा मोठी जर ती पाण्यात पूर्णपणे विरघळली नाही किंवा तिची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर मग आपल्यापुढे मोठा यक्षप्रश्न उभा राहतो.
अर्थात मूर्तींची उंची किती असावी हा सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हौसेखातर अनेक मंडळे ही उंचच उंच मुर्त्या बनवून घेतात. आता जर जबाबदारी घेतलीच आहे तर ती पुर्णपणे पाळायला नको ?? गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होण्यापूर्वी आपण ती प्राणपणाने जपत इच्छित स्थळी घेऊन येतो पण उत्तरपूजा झाल्यानंतर विसर्जन करताना त्या मूर्तीचे पावित्र्य जपायला नको ?? की गणेशोत्सव मंडळे अनंत चतुर्दशी नंतर विसर्जन झालेल्या ठिकाणी जाऊन उरलेल्या भग्नावशेषांची विल्हेवाट लावतात.?? की हे करण्याचा ठेका फक्त अशासकीय सामाजिक संस्थांनीच घेतला आहे का ??
दरवर्षी आपण बघतो की विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात भग्नावशेषांचे फोटो छापून येतात..मान्य आहे की सध्याची परिस्थिती पाहता यावर कायमस्वरूपी उपाय मिळणं थोडं अवघड आहे पण निदान त्या भग्नावशेषांची लवकरात लवकर योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर निदान त्या मुर्तींचं पावित्र्य राखण्यास तरी मदत होईल.
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/
No Comment