ती एक भेट

ती एक भेट

“वहिनी, मेहेंदींची सगळी तयारी झालीये ना?? आणि हळद??हळद कुटून ठेवली ना?? आयत्या वेळेवर धावपळ नको बाई. अहो, त्या भटजींना पुन्हा एकदा फोन करून आठवण करा बरं. मागे पूजेसाठी सांगितलं होतं तर विसरूनच गेले होते. सुखदा, दादांना आज सकाळी दादर मार्केट मधून फुलं आणायला सांगितली होती ती घेऊन ये. आपण सगळे इतकी धावपळ करतोय आणि जिचं लग्न आहे ती कुठेय?? रसिका…ए रसिका….” आईने हाक मारल्यावर एवढ्यावेळ कसल्यातरी विचारात गढून गेलेली रसिका भानावर आली.

“आहे मी इथेच…तुमचं चालू दे. तोवर मी माझ्या रूम मध्ये जाते.” एवढं बोलून रसिका तिच्या रूम मध्ये निघून गेली. रूम मध्ये गेल्यावर कसल्याशा विचारातच तिने नीरजला फोन लावला.

“कुठे आहेस? मला भेटायचंय तुला. ” नीरजने फोन उचलताच रसिकाने प्रश्न केला.

“का गं? काय झालं?” नीरजने थोडं आश्चर्यानेच विचारलं.

“अरे तू भेट आधी. भेटल्यावर सांगते.”

“बरं, कुठे भेटायचं?”

“नेहमीच्याच जागेवर. आता लगेच निघ.” एवढं बोलून रसिकाने घाईघाईतच फोन कट केला.

“ठीक आहे.” हातातल्या पत्रिकेवरून नजर फिरवत नीरज म्हणाला.

नीरज आणि रसिका. दोघेही कॉलेजपासूनच एकत्र. पहिले मित्र, मग बेस्ट फ्रेंड आणि त्यानंतर प्रेम. अगदी साधी सरळ लव्हस्टोरी. त्यांच्या संपूर्ण ग्रुप मध्ये हेच एक कपल होतं. त्यामुळे त्यांच्यात कधी साधं भांडण जरी झालं तरी अख्खा ग्रुप ते सोडवायचा प्रयत्न करायचा. पण पासआउट झाल्यावर सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले आणि राहिले हे दोघेच. एकमेकांसाठी. दोघेही तसे मध्यमवर्गीय कुटुंबातलेच. आईवडिलांनी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट बघत मोठे झालेले. आणि त्यांना त्याची जाणसुद्धा होती. म्हणूनच तर आई वडिलांचा मान राखण्यासाठी रसिका मागचं सर्वकाही विसरून त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायला तयार झाली होती. अगदी दोन दिवसांवर लग्न आहे आणि रसिकाने आपल्याला का बरं बोलावलं असेल भेटायला ह्याच विचारात नीरज कॅफेमध्ये पोहोचला. रसिका आधीच येऊन बसली होती.

“काय गं, काय झालं?” नीरजने समोरच्या खुर्चीत बसत विचारलं.

“मला नाही करायचंय संकेतशी लग्न.” रसिकाने सांगून टाकलं.

“का? काय झालं?”

“मला तुझ्याशी लग्न करायचंय.”

“तू काय बोलतेय तुझं तुलातरी कळतंय का??” निरज प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.

“हो. मला तुझ्याशीच लग्न करायचंय. हवं तर आपण पळून जाऊन उद्याच लग्न करू.”

“आता खूप उशीर झालाय रसिका. शक्य नाहीये हे.”

“हो, उशीर झालाय पण अजूनही वेळ आहे आपल्याकडे. ”

“आणि तुझ्या घरच्यांचं काय? संकेतच्या घरच्यांचं काय?”

“घरच्यांचं बघू नंतर. त्यांना समजावून सांगितलं की समजून घेतील ते.”

” ही संधी सुद्धा होती तुझ्याकडे.” नीरज शांतपणे म्हणाला.

“म्हणजे ??”

“जेव्हा तुझ्या घरच्यांनी तुझं लग्न ठरवलं तेव्हा मी तुला म्हणालो होतो की घरी आपल्याबद्दल सांग म्हणून. तेव्हा तू काय म्हणालीस?”

“मी म्हणाले होते की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो पाहून मी त्यांना आपल्याबद्दल नाही सांगू शकत. पण मी सांगेन ना आता त्यांना नंतर.”

“ती संधी गमावलीस रसिका तू. आता सांगण्यात काहीही अर्थ नाहीये.”

“आपण जाऊ ना पळून. नंतरचं बघू नंतर ”

“आपण जाऊ शकतो गं पळून. पण संकेतची काय चूक आहे ह्या सगळ्यांत? त्याला कसली शिक्षा? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आधी करायला हवा होता तू रसिका. जर तुझं लग्न जबदस्तीने ठरवलं गेलं असतं तर गोष्ट वेगळी होती. मीही तुझ्या बाजूने उभा राहिलो असतो तेव्हा. पण तू लग्नाला संमती दिलीस. त्यांनंतरही साखरपुड्यापर्यंत तुझ्याकडे वेळ होता. तेव्हाही तू काहीच केलं नाहीस आणि साखरपुड्याला उभी राहिलीस. आणि आता लग्नाला दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना तुला उपरती होतेय की तुला संकेतशी नाही तर माझ्याशी लग्न करायचंय?? लग्न मोडायला काही ठोस कारण असेल तर एकवेळ समजूनही घेता येईल. पण आपल्या बाबतीत असं काही नाहीये आता. तुझी आणि संकेताची दोघांची फॅमिलीसुद्धा आता ह्यात आहे आणि लग्न मोडल्यावर काय त्रास असतो हे मी खूप जवळून अनुभवलय. ”

“पण म्हणून काय मी माझ्या मनाविरुद्ध लग्न करू का?”

“तुझ्या होकारामुळेच इथपर्यंत पोहोचल्यात गोष्टी. चित्रपटात दाखवतात गं. नायिका लग्न मोडून नायकाकडे परत गेली. पण खऱ्या आयुष्यात इतक्या सोप्या नसतात गोष्टी. जर तुला करायचंच नव्हतं लग्न तर हे तू तेव्हाच सांगायला हवं होतं. तेव्हा कदाचित तुझ्या घरचे थोडे रागावले असते, चिडले असते. पण आता जे पाऊल उचलायचा तू विचार करतेय ना त्याने तुझ्या घरचे अक्षरशः कोसळतील. तुझ्या चुकीची शिक्षा तू आता त्यांना देऊ पाहतेय.”

“मग आता काय करू मी?”

“बघ. मी आता ह्या क्षणाला तुझ्यासोबत पळून जाऊन लग्न करू शकतो. पण त्याने काही साध्य होणार नाही. तुझ्या घरच्यांनी तुझं लग्न जबरदस्तीने लावण्याचा प्रयत्न केला असता तर मी तयार झालोही असतो पळून जायला. पण तू त्यांना इतके दिवस अंधारात ठेवलंस. त्यांना स्वप्न दाखवलीस, संकेत आणि त्याच्या कुटुंबाला यात ओढलंस आणि आता तू यातून अंग काढायला बघतेय तर ते मला पटत नाही. तेव्हा तुझ्या मनात माझा विचार नाही आला मग आताही तो आणू नकोस. काही कालावधींनंतर तू पूर्णपणे विसरून जाशील मला. तुला आठवतंय. मागे अक्षयाचं लग्न मोडलं होतं आपण. कारण तिचा होणारा नवरा दुसऱ्याच मुलीबरोबर रंग उधळत होता. आपल्याला समजलं आणि आणि वेळेवर तिच्या घरच्यांना ह्याची जाणीव करून दिली. तेव्हा ते लग्न मोडणं गरजेचं होतं पण आता ते गरजेचं नाहीये. आणि विनाकारण स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्या भित्रेपणाची, तुझ्या चुकीची शिक्षा दोन्ही कुटुंबाला देणं मला अत्यंत चुकीचं वाटतंय.”

“पटतंय मला तुझं म्हणणं.” रसिका मान खाली घालत म्हणाली.

“कसंय ना, पोरखेळ नसतो गं लग्न वगैरे. आपली पिढी जेवढ्या वेगात धावतेय तेवढ्या वेगात समाज धावत नाही. आणि आपल्या घरच्यांनी अजूनही समाजाला धरून ठेवलंय. अर्थात यात त्यांची काहीच चूक नाही. कारण त्यांचा टाईमझोन वेगळा आहे . आपला टाईमझोन वेगळा आहे. पण म्हणून आपण काय त्यांचा विचार न करता त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं का? लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं मिलन असतं. आता आपण पळून गेलो, नंतर कदाचित तुझ्या घरचे आपल्याला माफही करतील पण ती आपुलकी, तो जिव्हाळा कुठेतरी हरवून जाईल. ”

“हं. आज मला अभिमान वाटतो नीरज की मी तुझ्यासारख्या मुलावर प्रेम केलं. तू मला चुकीचं पाऊल टाकण्यापासून रोखलंस. तुझ्या जागी दुसरा कुणीही असता तर एका पायावर पळून जायला तयार झाला असता. पण तू फक्त तुझ्या पुरता नाही तर सगळ्यांचा विचार केलास. आणि तुझी हीच सवय तुला खूप पुढे घेऊन जाईल. निघते मी. पण तुला गमावल्याची खंत मला आयुष्यभर राहील. टेक केअर.”

©PRATILIKHIT

22343cookie-checkती एक भेट

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 125,619 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories