आठवणीतले दिवस

मे महिना सुरू झाला की शाळेत असतानाच्या मे महिन्याच्या सुट्टीची आठवण येणार नाही असा कोणी क्वचितच सापडेल. तोंडी, लेखी, प्रॅक्टिकल अशा सगळ्या परीक्षांचा भडिमार सहन केल्यानंतर येणारी मे महिन्याची सुट्टी म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना जणू पर्वणीच…लहान मुलांना मस्त खेळताना पाहून शाळेतून बाहेर पडलेल्या सगळ्यांच्याच सुट्टीच्या आठवणी जाग्या होतात. (आमच्या सारखे काही बिचारे मात्र मे महिन्यात परीक्षा देत असतात.)

मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावातली निदान दहा ते पंधरा जण एकत्र जमायचो. सगळे भाऊ बहिणीच होते म्हणा..आणि सगळ्यांची घरं आजूबाजूलाच. त्यामुळे दोन तीन जण जमले की गॅंग जमायला फार वेळ लागायचा नाही.

मस्त उशिरा उठून नाश्ता वगैरे करून सगळे कोणा एकाच्या घरी जमायचो. अगदी दहा अकरा वाजता सुद्धा ऊन फार असायचं. मग त्यावेळी बाहेर खेळलं की आई बाबांच्या शिव्या पडायच्या म्हणून मग सगळे जण कॅरम, पत्ते वगैरे खेळायचो.

_20180502_0654201656834353.jpg

दुपारी जेवण झाल्यावर गॅंग चे मेंबर थोडे कमी असायचे. मग ते कोणाच्या तरी वाडीत जाऊन कच्च्या कैऱ्या, आवळे पाडून आणून ठेवायचे. आमच्यातल्या काही जणांना विहिरीतले मासे पकडण्याची भारी हौस. भर उन्हात घरातून पीठ चोरून आणून त्याचे छोटे छोटे गोळे गळाला लावून पठ्ठे तासनतास विहिरीवर बसून राहायचे. मला मात्र ते कधीच जमलं नाही. गळाला लागलेला मासा मला अजूनही बाहेर काढता येत नाही. एकदा तर गळाला मोठ्ठा मासा लागला तर घाबरून मी ती दोरीच त्या गळासकट पाण्यात सोडून दिली होती.

कधीतरी कोणाच्या तरी वाडीतल्या विहिरीत उतरून आम्ही तासंतास पोहायचो. कोण किती वेळ पाण्याखाली राहते, कोण सर्वात वरून उडी मारते याच्यासुद्धा स्पर्धा लागायच्या.

साधारण चार साडेचार झाले की मग सगळे हळू हळू जमायला सुरुवात व्हायची. मग आणलेल्या कैऱ्या बारीक कापून , त्यात मीठ, मसाला, चिंच, साखर घालून आम्ही त्याचा मस्त कुसमुर करायचो. त्याची आंबट गोड चव खूप भारी लागायची.

पेटपूजा वगैरे करून झाल्यावर मग संध्याकाळच्या मेन खेळाला सुरुवात व्हायची. पटावरचा सापशिडीचा खेळ आम्ही मैदानावर खेळायचो. पाण्याच्या बाटलीला बारीक भोक पाडून आम्ही त्याचा वापर रेषा आखण्यासाठी करायचो. थोड्या वेळाने पाणी सुकून जायचं मग त्या सुकलेल्या जागी परत मार्किंग करायचो. सापशिडी व्यतिरिक्त हिंडा, डबा-आण-आणि-टीप (डबाणटीप), लपाछुपी, क्रिकेट, बॅडमिंटन, सायकल रेसिंग असे खेळ असायचे. लपाछुपी खेळताना तर अनेकदा आम्ही कोणाच्या तरी घरात, माडीवर जाऊन लपायचो. आपल्यावर राज्य येऊ नये म्हणून सगळे जण प्रयत्न करायचे.

हे सगळं करताना मी अनेकदा रडलो देखील आहे. पण ते सगळे दिवस आठवले की आजसुद्धा हसायला येते. खूप गंमत वाटते. आजही कधीतरी त्या सगळ्या गमतीजमती पुन्हा कराव्याश्या वाटतात.
पण म्हणतात ना..

वक्त तो होता ही हैं, बदलने के लिये
ठहरते तो बस लम्हे है….

©प्रतिक प्रवीण म्हात्रे

6090cookie-checkआठवणीतले दिवस

Related Posts

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

गुन्हेगार

गुन्हेगार

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 120,410 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories