नरक चतुर्दशीची पौराणिक कथा । Narak Chaturdashi in Marathi
नरकासुर आणि भगवान श्रीकृष्णाची कथा ही श्रीमद भागवत पुराणात आहे आणि आसाममधील लोककथेच्या रूपातही सांगितली जाते. कामाख्या मंदिर असलेल्या निलांचल पर्वताच्या दक्षिणेला पांडु-गुवाहाटी मार्गावर ज्या टेकड्या आहेत, त्यांना नरकासुर पर्वत म्हणतात. नरकासुर हा कामरूपचा राजा होता आणि तो देवी कामाख्याचा प्रमुख भक्त होता. ज्या मार्गाने बहुतेक लोक मंदिरापर्यंत पोहोचतात त्या मार्गाला नरकासुर मार्ग असेही म्हणतात.
नरकासुराने ब्रह्मदेवाची उपासना केली. वरदान मागितले की, हे देवा, मी भूमीचा पुत्र आहे आणि माझा मृत्यू झाला तर तो देवीच्या हातून व्हावा. वरदान मिळाल्यानंतर नरकासुराला पृथ्वीवरील सर्व राजांचा पराभव करून देवलोक जिंकायचा होता. इंद्राच्या दरबारावर हल्ला केला.
प्रतापी नरकासुराला पाहून इंद्र सिंहासन सोडून पळून गेले. नरकासुराने आपल्या महालात 16100 सुंदरींना बंधक बनवले होते. देवलोकातून परतताना, नरकासुर देवी अदिती (ऋषी कश्यपाची पत्नी, देवता ज्यांचे पुत्र मानले जातात) च्या सुंदर चमकणाऱ्या कर्णफुलांवर मोहित झाला, ते त्याने हिसकावून घेतले. अदिती रडत रडत सत्यभामेजवळ गेली. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाच्या आठ राण्यांपैकी एक होती.
सत्यभामाने आदितीला कृष्णाकडे नेले. कृष्ण सत्यभामाला म्हणाला, चल आमच्याबरोबर. रणांगणात तू माझ्यासोबत राहावे तुझी ही इच्छा नेहमीच असते… चल तर मग. कृष्ण आणि सत्यभागा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्राग्ज्योतिषपूर (आसाम) कडे निघाले.
नरक चतुर्दशीची पौराणिक कथा । Narak CHaturdashi in Marathi
कृष्णाला पाहून नरकासुराने आपला सेनापती मुराला युद्धासाठी पाठवले. कृष्णाच्या एकाच वाराने मुरासहित सर्व सैनिक मारले गेले. क्रोधित होऊन नरकासुराने राजवाडा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्रिशूळने प्रहार केला.
श्रीकृष्ण रणांगणावर बेशुद्ध पडले. श्रीकृष्णाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेने नरकासुरावर बाणाने हल्ला केला. नरकासुराचा वध झाला. तेव्हा सत्यभामा कृष्णाकडे वळली. तिने श्रीकृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसत उभे राहिले. ही त्यांची लीला होती. सत्यभामा साक्षात पृथ्वीचाच अवतार होता आणि नरकासुराला मातेनेच मारावे असे वरदान होते, म्हणून त्याचा वध झाला.
या युद्धानंतर 16,100 सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या. अदिती देवीला कर्णफुले प्राप्त झाली. ज्या दिवशी मायलोकचा राजा नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. नरकासुर कैदेतून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेढा घातला आणि विचारले, आता आम्हाला कोण स्वीकारेल? तुम्ही आम्हाला स्वीकारा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले- मी तुम्हा सर्वांना माझे नाव देईन आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे पालनपोषण करीन. भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलींशी विवाह केला.
नरकासुराने मृत्यूपूर्वी श्री कृष्णाकडे एक वर मागितला की या तिथीला पहाटे जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभंग स्नान करावे. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळावी म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदाने साजरा केला जातो.
नरक चतुर्दशीच्या दिवशी कारिटे का फोडले जाते?
कोकणात ‘कारिट’ नावाचे छोटे कडू रानफळ मिळते. ते पायाखाली चिरडून `गोविंदा`चा तीन वेळा पुकारा केला जातो. हे कारिट नरकासुराचे प्रतिक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा फक्त राक्षस नाही तर कधीही नष्ट न होणारी अघोरी, दृष्ट वैचारिक शक्ती. अर्थात कोकणात हा दिवस ‘चावदीस’ म्हणून साजरा करतात. नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनासाठी कारिटाचा का वापर करण्यात आला? यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण समजून घेऊया. दिवाळी म्हणजे नक्की काय, तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण. पूर्वजांनी आपली संस्कृती टिकविताना याचा पुरेपूर विचार केलेला दिसतोय. कारिट डाव्या पायाने फोडल्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायाच्या ग्रंथीची नस थेट मेंदूपर्यंत जाते असा उल्लेख आहे.
कारिटाचा गंध नाकापर्यंत पोहोचविणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रथा निर्माण करणार्यांची कल्पकता तरी बघा, नरकासुराचे विचार कधी बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, कारण तो दृष्ट आहे. तसेच कारिट हे एक असे फळ जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेले कारिट पुढच्या दिवाळीला वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारिट ठेवायचे. जसेच्या तसे राहणार. लोखंड किंवा अन्य शस्त्र लागून जर आपल्या शरिराच्या कुठल्याही भागाला सूज आली तर कारिट फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकर्यांना बहुतेकदा पायाच्या बोटांना, नखांना कोर होते, तर त्यावेळी बोटाला कारिट लावले जाते. यामुळे कोर बरी होवून जखमही भरून येते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठीच तर निवड केली असावी. पूर्वी कारिट ग्रामीण भागातच फोडली जायची, पण आज शहरी भागातही ती फोडली जातात.
नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान
नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘अभ्यंगस्नान’ केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात. संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. हा दिवस ‘छोटी दिवाळी’ म्हणून ओळखला जातो.
Also Read
नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT

