Site icon PRATILIKHIT

वीरभद्र मंदिर, लेपाक्षी | Veerbhadra Temple

Advertisements

वीरभद्र मंदिर, लेपाक्षी  (Veerbhadra Temple Lepakshi)

 

वीरभद्र मंदिर हे आंध्रप्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यात वसलेले आहे. या मंदिराची निर्मिती सोळाव्या शतकात तत्कालीन विजयनगर राजा अच्युतार्थ ह्याच्या दरबारी असलेल्या विरुपन्ना आणि वीरन्ना या दोन शिल्पकारांनाही केली. नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेलच की हे मंदिर भगवान शंकराचा अंश समजल्या जाणाऱ्या वीरभद्राला अर्पण करण्यात आलेलं आहे. वीरभद्र हे भगवान शंकराचे संहारक रूप म्हणून ओळखले जाते. वीरभद्राचा जन्म राजा दक्षाच्या यज्ञानंतर झाला होता.

वास्तुतज्ञांच्या म्हणण्यानुसार ह्या मंदिराला ७२ दगडी खांब आधार देत आहेत. पण ह्या खांबांपैकी एक खांब अधांतरी आहे आणि हेच ह्या मंदिराचे मुख्य रहस्य आहे. जमिनीच्या पृष्ठभागापासून हा खांब काहीसा वर उचललेला आहे. अनेक वास्तुतज्ञांनी या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला पण त्याबाबत ठोस असे कुणी अद्यापही सांगू शकलेले नाही म्हणूनच या मंदिराला ‘हँगिंग पिलर टेंपल’ म्हणूनही ओळखले जाते. असे म्हणतात की ब्रिटिश इंजिनिअर हेमिल्टन याने १९०२ मध्ये मंदिराचा आधार कोणत्या खांबावर आहे याचा शोध घेण्यासाठी मंदिराच्या झुलत्या खांबावर हातोड्याने प्रहार केला आणि प्रहार करताक्षणी आजूबाजूच्या साधारण पंचवीस फूट बांधकामाला तडे गेले.

मंदिराच्या निर्मितीशी निगडित अनेक कथा प्रसिद्ध आहेत. या ठिकाणाचा संबंध थेट रामायणाशी जोडलेला आढळतो. असे सांगितले जाते की सीतेचे हरण करून तिला लंकेला घेऊन जात असताना रावण आणि पक्षिराज जटायू यांच्यात तुंबळ युद्ध झाले आणि युद्धानंतर जखमी अवस्थेत पक्षिराज जटायू इथेच पडून राहिले. जेव्हा भगवान श्रीराम सीतेचा शोध घेत इथपर्यंत येऊन पोहोचले तेव्हा त्यांनी पक्षिराज जटायूला ‘ले पाक्षी’ असं म्हणून आपल्या उराशी कवटाळले. ‘ले पाक्षी’ हा एक तेलगू शब्द आहे आहे ज्याचा अर्थ आहे ‘हे पक्षिराज, उठा.’

पौराणिक मान्यतांनुसार ह्या मंदिराची निर्मिती अगस्ती ऋषींनी केली. कथेनुसार एकदा विष्णूचे भक्त वैष्णव आणि शंकराचे भक्त शैव यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण म्हणून वाद सुरु झाला. हा वाद शमवण्यासाठी अगस्ती ऋषींनी ह्याच जागी तपश्चर्या केली.

मंदिर परिसरामध्ये एक भव्य पायाचा ठसा आहे ज्याला त्रेता युगाचा पुरावा मानलं जातं. पक्षिराज जटायू जेव्हा जमिनीवर पडले तेव्हा सीतेने स्वतः जमिनीवर उतरून आपल्या पायाचा ठसा जमिनीमध्ये निर्माण केला आणि जटायूला विश्वास दिला कि जो पर्यंत श्रीराम इथे पोहोचणार नाहीत तो पर्यंत ह्या पायाच्या ठश्यात जमा असलेले पाणी जटायूला जीवन देत राहील.

Related Posts

कैलास मंदिर
विरुपाक्ष मंदिर

Follow  AncientIndiaMarathi    
Follow PRATILIKHIT

https://pratikpravinmhatre.com/

 

45720cookie-checkवीरभद्र मंदिर, लेपाक्षी | Veerbhadra Temple
Exit mobile version