
महापूर: नैसर्गिक संकट की मानवनिर्मित??
पावसाळा सुरू झाला की जसा शेतकऱ्यांना आनंद होतो तशीच आता बऱ्याच लोकांच्या मनात भीती निर्माण होतेय. त्याचं कारण म्हणजे पावसामुळे सखल भागात सचणारं पाणी, अतिवृष्टीमुळे येणारे महापूर.
ह्या सर्व गोष्टींच्या जर मुळाशी गेलं तर एकच मुख्य कारण आपल्याला सापडेल ते म्हणजे बेकायदेशीर होणारं बांधकाम.
पाण्याचा निचरा होणारे सर्व मार्गच आपण बंद करून टाकलेत. मोठमोठ्या नाल्यांमध्ये भरावं टाकून त्यांना आपण इतकं अरुंद केलंय की जास्त प्रमाणात पाऊस झाला तर जमा झालेलं पाणी समुद्रात किंवा खाडीमध्ये पोहोचण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त वेळ लागतो. तो पर्यंत ते सगळं पाणी तसंच साचून राहतं. पूर्वीसुद्धा आता पडतो तितकाच पाऊस पडायचा पण तेव्हा त्या पाण्याचा निचराही लगेच व्हायचा त्यामुळे महापूर वगैरे सारखी आपत्ती लगेच यायची नाही.
अगदी कोल्हापूरचं उदाहरण घ्यायचं झालं तर कोल्हापूर मध्ये जवळजवळ शंभर वर्षांनी पुन्हा पूर आला तो २०१९ साली आणि त्यानंतर येणाऱ्या पुराचं प्रमाण सतत वाढतच आहे. कोकणात आलेल्या पुराचं कारण हे नैसर्गिक आहे कारण सुदैवाने तिथे अजूनही बेकायदेशीर बांधकामे फारशी झालेली नाहीयेत. पण मुंबई, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी येणारे पूर ही माणसाने निसर्गाशी केलेल्या प्रतारणेची फळे आहेत.
आज गेली कित्येक वर्षे मुंबई ची तुंबई होतेय. जरासा पाऊस आला तरीही मुंबईच्या सखल भागात पाणी साचतंय. प्रशासनाने नालेसफाईचे कितीही दावे केले तरी आता हे सगळ्यांसमोर आलेलं आहे की मुंबईची गटारं आणि नाले साचलेले पाणी वाहून नेण्यास सक्षम नाहीत. भरतीची वेळ असली की पाणी अजूनच जास्त वर चढतं.
अनेक ठिकाणी भरावं टाकून झोपड्या, इमारती बांधताना पाण्याचा निचरा करण्यासाठी अत्यंत अरुंद पाईप टाकला जातो जो अजिबात पुरेसा नाहीये. साचणारं पाणी जिरण्यासाठी मोकळ्या जागी शेततळी बांधायला हवी, पाझर तलाव बांधायला हवे, डोंगर उतारावर पाणी अडवायला हवं.
पूरपरिस्थितीवर तसेच वादळांमुळे निर्माण होणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी आसाम मॉडेलचा जास्तीत जास्त अभ्यास आणि उपयोग व्हायला हवा. बदललेल्या निसर्गचक्राने पावसाचं प्रमाण वाढलं आहे आणि हे वाढलेलं पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन त्यावर वेळीच योग्य त्या उपाययोजना करायला हव्या नाहीतर येणाऱ्या काही वर्षात अनेक गावं, शहरांना जलसमाधी मिळणार हे निश्चित.
©प्रतिलिखित
No Comment