मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन

एखाद्या विशिष्ट दिवशी त्या दिवसाशी निगडित असलेल्या गोष्टींना महत्व द्यायचं आणि पुढचं एक वर्ष त्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही हे आपल्या अगदीच अंगवळणी पडलेलं आहे. ‘मराठी भाषा गौरव दिन’ आला की प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तातलं मराठीपण जागं होतं. पण फक्त स्टेटस टाकण्यापूरतचं हं. इतर वेळी स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी आपण आपला पाया भक्कम असतानासुद्धा इंग्रजीच्या कुबड्यांचा आधार घेतो.

एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच; किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आव्हान आहेच.. त्याचबरोबरीने आपली भाषा समृद्ध करायची, तिचा वापर-प्रसार करायचा आणि तिचे चिरंतनत्व अबाधित राखायचे हेसुद्धा मोठे आव्हान आहे.

कोणती भाषा श्रेष्ठ, कोणती नाही हा वादच नाहीये. कारण प्रत्येक भाषेचं स्वतःचं असं एक वेगळेपण आहे. जगरहाटीसाठी आपल्याला इंग्रजी भाषा यायला हवीच, पण एखाद्या भाषेला झुकतं माप देताना आपल्या मातृभाषेवर आपण अन्याय करतो हे लक्षातच येत नाही आपल्या.

बऱ्याच लोकांचा हाही समज असतो की मराठी बोलणं म्हणजे डाउन मार्केट. म्हणून मग ओळखीच्या मराठी माणसांशी सुद्धा ते इंग्रजी किंवा हिंदी मधूनच बोलतात.

पण युट्यूब, सोशल मीडिया, वेब सिरीज यांसारख्या जागतिक सोशल बाजपरपेठेत अशीही काही लोकं आहेत ज्यांनी आपलं मराठीपण जपलयं.

भाडीपा, आम्ही Memekar, सुशांत घाडगे, टेरिबल मराठी टेल्स, RJ सोहम, जस्ट निल थिंग्स, करण सोनावणे, हर्षदा स्वकुळ, माधुरी देसाई यांसारखे अनेक जण मराठी भाषेमध्ये व्हिडिओ, मीम बनवतात.

मराठी कंटेंट चालत नाही या विचारांना छेद देऊन या लोकांनी मराठी कंटेंट इतका लोकप्रिय केला की अमराठी लोकांनासुद्धा तो आपलासा वाटू लागला.

हल्ली अमेरिकेत असलेले मराठी भाषिक सुद्धा आपल्या मुलांना मराठी भाषा यावी म्हणून त्यांना अमेरिकेमध्ये मराठी भाषेच्या शिकवण्या लावतात..आणि इकडे महाराष्ट्रातच आपण मराठीमध्ये बोलायला लाजतो. मराठी माध्यमांमधून शिक्षण घ्या किंवा इंग्रजी माध्यमांमधून…आपली मातृभाषा तर आपल्याला यायला हवीच.. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या किती तरी जणांना साधं मराठी वाचताही येत नाही ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे…

आता मराठी भाषेने कात टाकली आहे…फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच झेप घेतली आहे. आणि या प्रवासात आपण तिला सोबत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे..आणि ते आपण सर्वांनी पार पाडायलाच हवं…तुम्ही हिंदीत बोला, इंग्रजीत बोला…पण जेव्हा शक्य आहे तेव्हा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करा…तेराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या, देशात चौथ्या आणि जगात एकोणिसाव्या स्थानावर असलेल्या आपल्या या मराठी भाषेचा अभिमान बाळगा…. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राचं मराठीपण जपा….

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी |
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी ||

©PRATILIKHIT

23101cookie-checkमराठी भाषा गौरव दिन

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 114,880 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories