छत्रपती शिवाजी महाराज कोण होते??

छत्रपती शिवाजी महाराज कोण होते??

“आजोबा, शिवाजी महाराज कोण होते?” आठ वर्षाच्या दैवतने खेळता खेळता त्याच्या आजोबांना सहज विचारलं.

“बाळा, ये इकडे. बैस. आज तुला रामायण, महाभारत नाही तर शिवराज्याची गोष्ट सांगतो. ” आजोबांनी त्याला जवळ बोलावून बळेच बाजूला बसवून घेतलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली.

“साधारण साडेचारशे वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह,मोगल अशा राज्यकर्त्याचं राज्य होतं. ते राजे प्रजेवर फार जुलूम करायचे आणि म्हणून त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन लोकांचं राज्य स्थापन केलं. ”

” एवढ्या त्या मोठ्या शाह्यांशी लढून???” दैवतने निरागसपणे विचारलं.

“हो. आणि त्यात तो मोगल बादशाह औरंगजेब काही साधा माणूस नव्हता बरं. फार मोठा मुत्सद्दी राज्यकर्ता. तितकाच तो क्रूर सुद्धा होता. त्याने स्वतःच्या बापालासुद्धा कैद केलं होतं. आणि त्याला हे आपलं छोटूसं स्वराज्य जिंकायचं होतं.”

“कशाला??? त्या आदिलशाह्या वगैरे मोठ्या असतील ना. मग त्या का नाही जिंकल्या त्याने??”

“कारण बाळा, आदिलशाही ही आदिलशहाची होती, कुतुबशाही कुतुबशाहाची होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे कुणा एका राज्याचं नव्हतं. तर ते रयतेचं राज्य होतं. आणि जेव्हा राज्य रयतेचं असतं तेव्हा त्या रयतेमधला प्रत्येक माणूस मारायला आणि मरायला तयार असतो. औरंगजेबाला माहित होतं की स्वराज्य जर संपवलं नाही तर पुढे त्याचा धोका अधिक आहे. आणि त्याला जी भीती होती तेच झालं पुढे.”

“काय झालं ??”

“पुढे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना देवाज्ञा झाली. पण त्या नंतरसुद्धा रयत लढत राहिली. जुलमी औरंगजेबाच्या विरोधात. त्याला मरेपर्यंत स्वराज्य जिंकता आलं नाही. आणि नंतर पुढे जाऊन पेशव्यांच्या काळात मराठी साम्राज्य थेट दिल्लीच्याही पुढे पसरलं.”

” पण आजोबा, शिवाजी महाराजांनी हे केलं कसं ??” दैवतने उत्सुकतेने विचारलं.

” बाळा, मी तुला जे सांगणार आहे ते तुला कितपत कळेल शंकाच आहे, पण तरीही सांगतो कारण तुला हे नंतर कुणी सांगेल की नाही यात शंकाच आहे.”

“थांबा, मी माझा मोबाईल आणतो, त्यात रेकॉर्ड करून ठेवू. ” एवढं बोलून दैवत त्याचा मोबाईल घेऊन आला सुद्धा.

“हं, बोला आता आजोबा.”

“तर बाळा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असं व्यक्तिमत्व ज्याचा आदर्श आज आपले लोक सोडले तर संपूर्ण जग घेतंय. अगदी व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा, शौर्य, धैर्य, साहस, चातुर्य ह्या सगळ्या गोष्टींचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समोरचा शत्रू काय विचार करेल ह्याच्या विचार आधीच करून त्यावर मार्ग शोधून तो अमलात आणण्यासाठी योजना बनवणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची खासियत. छत्रपती शिवाजी महाराज कसा आणि किती दूरचा विचार करायचे हे तुला पुढे कळेल. ”

“हं. सांगा तुम्ही.”

“आपल्याकडे सध्या पाण्याचा दुष्काळ खूप आहे ना.”

“हो ना. टीव्ही वर दाखवतात ना. कशा बायका विहिरीत उतरतात.”

“बाळा रायगडावर एक तलाव आहे. गंगासागर नावाचा. साडेचारशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेला. अकरा हजार फूट उंचीवर. एकदा महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. १९७२ साली. माझाही जन्म झाला नव्हता त्या वेळी. महाराष्ट्रातील बऱ्याच विहिरी कोरड्या पडल्या होत्या तेव्हा. पण त्या वेळीही रायगडावरच्या गंगासागर तलावात भरपूर पाणी होतं. गडावरून खालच्या गावात पाणी आणलं गेलं तेव्हा.”

” बापरे. एवढ्या वरती कसं काय पाणी ??”

“शिवकालीन पाणी योजना. इतकंच नाही. मी साधारण बावीस तेवीस वर्षांचा होतो. राजगडाच्या माचीचं बांधकाम सुरु होतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेलं अँटी चेंबर सापडलं तिथे. त्या काळचं. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात माईक नव्हते. पण तरीही त्यांनी ते तंत्र विकसित केलं. आजही रायगडावर एक जण सिंहासनाच्या जागी उभा राहिला, दुसरा नगारखान्याजवळ उभा राहून हळूच जरी पुटपुटला तरी सिंहासनाजवळ ऐकू येतं. ”

“भारीच एकदम. ” दैवत एकदम उत्साहात म्हणाला.

“इतकंच नाही. तर फोन वगैरे नव्हते. कसा देणार मग निरोप लगोलग. त्यासाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्याय शोधला होता. कोणतं लाकूड जाळल्यावर काळा धूर होतो, कोणतं लाकूड जाळल्यावर लाल, कोणतं लाकूड जाळल्यावर पांढरा धूर यावरून त्यांचे संकेत ठरलेले असायचे. म्हणजे एखादी अशुभ बातमी असली तर रायगडावर काळा धूर करायचे , रायगडावरचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळाधूर, तोरण्याचा काळा धूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावर काळाधूर, राजगडावरचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा, असं करता करता पन्हाळा, रांगण्यावरून थेट सिंधुदुर्ग अशा तीनशेसाठ किल्ल्यांवर हा धूर दिसायचा आणि निरोप पोहोचायचा. ”

“म्हणजे फोन नसतानासुद्धा एवढ्या लवकर मेसेज जायचा. ” दैवतने थोडं संशयानेच विचारलं.

“हो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटलं जातं. ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे शिवरायांनी पक्के जाणले होते. पण त्या काळी जहाजे इंग्रजांकडून विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडून आणि दारुगोळा डच लोकांकडून. म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण, वसई, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या स्थळी गोद्या (जहाज बनविण्याचे कारखाने) उभारल्या. कुडाळमध्ये दारुगोळा बनवण्याचे कारखाने काढले. त्या वेळी गुराबा, तरांडा, गलबते, पगारा, मचवे, तिरकाठी, पाली, संगमिरी अशा विविध प्रकारच्या नौका तयार केल्या. कोळी व भंडारी जवानांना आरमारात भरती करून आरमार फिरते आणि तरबेज केले. आज सम्राट चंद्रगुप्तांनंतर हिंदुस्तान स्वतःचं आरमार उभं करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद आहे. तेव्हा जर छत्रपती शिवाजी महाराज आणखी दहा पंधरा वर्षे अजून जगले असते ना तर भारताचा चेहरा काही वेगळाच असता. कारण जर ते असते तर इंग्रजांना संपूर्ण भारत पाहताही आला नसता. राज्य करणं तर लांबची गोष्ट. ”

“पण आजोबा, जर शिवाजी महाराज इतके मोठे होते तर मग मला लहानपणी आईबाबांनी त्यांची गोष्ट का नाही सांगितली.”

“हेच तर खरं दुर्दैव आहे ना आपलं. आम्ही आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचलो पण त्यातून शिकलो काहीच नाही. त्यांच्या नावावर राजकारण केलं तर त्यांचे विचार कधी आचरणात आणलं नाही. स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं. आज जो पक्ष बहुमत बनवेल सरकार त्या पक्षाचं होतं. जनतेचं सरकार आहेच कुठे? पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही पुसून टाकायला टपलेत लोकं. शाळेत फ्रेंच राज्यक्रांती शिकवली जाते, मार्क्सवाद शिकवला जातो. काय गरज आहे त्याची?? भारताला काय कमी इतिहास लाभलेला आहे. पण कुणीही त्याकडे लक्ष देत नाही. मग भारतीय इतिहास पुसला नाही जाणार तर काय होणार वेगळं? तुझ्या आई बाबांना पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फार माहिती असेल की नाही ह्याबद्दल मला जरा शंकाच आहे. जर इतिहासाचं जतन केलं नाही तर हळूहळू तो नक्कीच पुसला जाईल आणि जसं रामायण, महाभारताला लोकं काल्पनिक समजतात तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा येणारी पुढची पिढी काल्पनिक समजेल. पुढील धोका लक्षात घेऊन आधीच आताच्या पिढीच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार रुजवणं गरजेचं आहे. ”

“आजोबा, माझ्या शाळेत आता स्पर्धा सुरू होतील. तुम्ही मला शिवाजी महाराजांची गोष्ट लिहून द्या. मी तीच सांगेन. आणि मला प्रॉमिस करा की तुम्ही मला अशा छान छान गोष्टी सांगणार अजून.”

“हो. सांगेन ना. माझ्या राजांचा इतिहास जर तुला आवडत असेल तर मी नक्कीच सांगेन. काळाची गरज आहे ती.”

(आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसलेल्या काही गोष्टी ह्या आजोबा आणि नातू ह्यांच्या २०८० सालच्या संवादातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.)

© PRATILIKHIT

14630cookie-checkछत्रपती शिवाजी महाराज कोण होते??

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

3 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories