
प्राचीन भारत (समज/ गैरसमज)
आज ५ ऑगस्ट २०२०. ज्या दिवसाची सगळे हिंदू आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस. अगदी लहानपणापासूनच अयोध्या ही श्रीरामजन्मभूमी हेच ऐकलंय आम्ही. पण आमच्या जन्माच्या आधी झालेल्या त्या घटनेबद्दल आम्हाला फार काही माहित नाही. आजच्या ह्या माहितीपर लेखामध्ये कोणत्याही धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा अपमान न करता प्राचीन इतिहास मांडण्याचा एक प्रयत्न आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नये.
शाळेत असताना अगदी थोड्या प्रमाणात आपल्या सर्वांना हे नक्कीच शिकवलेलं आहे की कसा भारत देश हा परकीय आक्रमणांना बळी पडला आणि भारतातील संस्कृतीची जागा इतर संस्कृतींनी घेतली. ह्या सर्व परकीय आक्रमणांमुळे भारतात इतर अनेक शासक निर्माण झाले आणि त्यांनी त्यांच्या सोयीने प्राचीन भारताचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला. बरेच जण ह्यामध्ये यशस्वीसुद्धा झाले. आणि भारताची मूळ संस्कृती नष्ट होऊन परकीय संस्कृती भारतावर लादण्यात आली. ह्या गोष्टीला खीळ बसली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुरुवातीला फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित होतं. त्या नंतर पेशव्यांच्या काळात ते पूर्ण भारतभर पसरलं आणि मोगलांचा शासनकाळ तिथे समाप्त झाला. त्या नंतर इंग्रज आले आणि त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे भारतात बरेच बदल केले. पण ह्या सर्व परकीयांच्या लाटेमधून सुद्धा भारतीय संस्कृती काही प्रमाणात का होईना टिकून राहिली.
६ डिसेंबर १९९२ ला झालेल्या एका राजकीय रॅली मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. आणि त्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये खटला सुरु झाला. त्याबाबत बराच वादंग उठल्यानंतर उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० मध्ये दिलेल्या निकालानुसार तिथे असलेल्या एकूण जागेचे म्हणजेच २. ७७ एकर जागेचे (फक्त मंदिराची जागा )तीन भाग करून त्यातला एक भाग राम मंदिरासाठी , दुसरा भाग मशिदीसाठी आणि तिसरा भाग निर्मोही आखाडा ह्यास्तही देण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला. पुढे तो आदेश मान्य नसल्याने केस सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी त्या जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी परवानगी दिली. त्याच बरोबर मशीद बांधण्यासाठी पर्यायी पाच एकर जागा देण्याचेही आदेश कोर्टाने दिले.
अयोध्या आणि प्रभू श्री राम यांचा काय संबंध आहे हे काही आपण वेगळं सांगायची गरज नाही. थोडं बाबरी मशिदी बद्दल पाहू. भारतावर आक्रमण करणारा पहिला मुघल सुलतान म्हणजे बाबर. नोव्हेंबर १५२६ मध्ये झालेल्या पहिल्या पानिपतच्या लढाईमधून बाबरचा भारताच्या राजकारणात प्रवेश झाला. ह्या लढाईनंतर बाबरने दिल्ली आणि आग्रा ही दोन ठिकाणं ताब्यात घेतली. असं म्हणतात कि त्याचा एक अधिकारी मीर बंकी ह्याने १५२८ साली बाबरच्या हुकुमावरून बाबरी मशीद बांधली. काही लोकांच्या सांगण्यानुसार १६५८ – १७०७ दरम्यान औरंगजेबाने अयोध्येला असलेले राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधली.
उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अखंड भारतात (ज्या मध्ये अफगाणिस्थान, नेपाळ,पाकिस्तान,बांगलादेश ,भूतान,म्यानमार,इराण हे सगळे आले ) सर्वात पहिलं असलेलं हिंदू साम्राज्य ‘गांधारा साम्राज्य’ ख्रिस्तपूर्व १५०० वर्षे ह्या काळात स्थापन झालं तेही आताच्या अफगाणिस्थान आणि पाकिस्तानमध्ये. त्यानंतर गोपाळ बन्सा ख्रिस्तपूर्व १४०० पासून आताच्या नेपाळमध्ये आणि ख्रिस्तपूर्व १२८० ह्या काळात पुंड्रवर्धाना ह्या साम्राज्यचा आता असलेल्या भारत देशात प्रवेश झाला. त्या नंतर कुरु, अंग, पांचाल, महिषपाल अशी अनेक हिंदू साम्राज्ये होऊन गेली. लेखाच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही त्यांची नावे आणि कार्यकाळ पाहू शकता. गौतम बुद्धांचा जन्म साधारण ख्रिस्तपूर्व ५६३ ह्या कालखंडातला. (खिस्तपूर्व कालखंड मोजताना साल हे उलटे मोजले जाते. म्हणजे जसे आपण गणितात मानतो की -१० हे -२ पेक्षा लहान. तसेच ख्रिस्तपूर्व १५०० वर्षे म्हणजे ख्रिस्त जन्माच्या च्या १५०० वर्षे आधी. )
म्हणजे साधारण ख्रिस्तपूर्व १२८० वर्षांपासून भारतात हिंदू धर्माची स्थापना झाली असावी. आणि तेव्हापासूनच राम, कृष्ण हे हिंदूंचे दैवत असल्याचे अनेक पुरावे आपल्याला उत्खननात सापडतात. इस्लाम धर्माची भारतात स्थापना झाली ती घुरीड साम्राज्यामार्फत साधारण बाराव्या शकतात. तत्पूर्वी काही मशिदी अरब लोकांमार्फत भारतात बांधल्या गेल्याचा उल्लेख आढळतो. जसे बारवाडा मशीद (ख्रिस्त जन्मांनंतर ६२३), चेरामन जुमा (६२९), पलैया जुम्मा पल्ली (६२८-६३०)
अजूनही भारतात होत असलेल्या उत्खननात आपल्याला हिंदू देवी देवतांच्या मूर्तींचे प्राचीन अवशेष आढळतात. रामायण हे साधारण सात हजार वर्षांपूर्वी झालं असं मानलं जातं आणि आपल्याकडे तर फक्त अडीच हजार वर्षांपूर्वीची माहितीच उपलब्ध आहे. त्यामुळे काही संदर्भ लावून इतिहास हवा तसा वळवला जातो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल आपल्याकडे फार थोडी माहिती उपलब्ध आहेत. आपल्या मानण्यावर सगळ्या गोष्टी असतात. पण म्हणून जर कुणी तरुण राम मंदिर बांधण्यासाठी सहकार्य करत असेल तर त्याला आंधळा भक्त म्हणणं चुकीच आहे. ही थोडी माहिती तुम्हा सर्वांपर्यन्त पोहोचवावीशी वाटली.
जय श्री राम.
© PRATILIKHIT
https://en.wikipedia.org/wiki/List_of_Hindu_empires_and_dynasties
No Comment