गावठी

गावठी“मित्रा, लायब्री कुठं हाय जरा सांगतोस का मला. नवीन ऍडमिशन घेतलाय तर आयडी बनवायला द्यायचयं.” राजेशने जरा अवघडूनच विचारलं.

“सॉरी… आय डिडन्ट अंडरस्टॅंड यू” उजव्या कानातून एअरफोन काढत सॅमने विचारलं.

“लायब्री ,लायब्री” राजेश पुन्हा म्हणाला.

“लायब्री???” सॅमने प्रश्नार्थक चेहऱ्याने बाजूलाच बसलेल्या अक्षयकडे पाहिलं.

“लाइब्रेरी रे…मित्रा दुसऱ्या मजल्यावर एकदम डावीकडच्या कोपऱ्यात आहे लाइब्रेरी. तू दुसऱ्या मजल्यावर कुणालाही विचारलंस तर तो सांगेल तुला..”

“धन्यवाद भाऊ.” राजेश हसऱ्या चेहऱ्याने म्हणाला आणि तो त्याच्या मार्गाने निघूनही गेला.

“सच गावठी पीपल ” सॅम उपहासाने म्हणाला.

“काय म्हणालास ???” अक्षयने पुन्हा त्याला विचारलं.

“गावठी रे.. कुठून कुठून येतात काय माहित. ” सॅम हसत म्हणाला.

“का?? त्यांनी शहरात यायचं नाही का शिक्षणासाठी??”

“त्यांच्या इकडे असेलच ना एखादं कॉलेज. पण तिकडेच जायचं ना त्यांनी. कशाला शहरातल्या कॉलेजमध्ये यायचं???” सॅम खांदे उडवत म्हणाला.

“पण त्यांच्या गावी नसतात ना शिक्षणाच्या एवढ्या संधी उपलब्ध. म्हणून तर ते येतात इथे.”

“येतात ठीके. पण बघ ना त्यांचं इंग्रजी कसं.. साधं लाइब्रेरी कुठेय हेही त्याला इंग्लिशमध्ये विचारता आलं नाही “

“त्याने काय फरक पडतो ??” अक्षयने आश्चर्याने विचारलं.

“पडतो ना.. आपल्या क्लासमध्ये तर सगळेच इंग्लिश बोलतो आपण. क्लासच कशाला तर कॉलेज मध्ये पण सगळे स्टुडन्ट, प्रोफेसर इंग्लिशच बोलतात. याला काय समजणार आहे कोण काय बोलतंय. कुणाशी धड बोलू तरी शकेल का हा?”

“इथेच तर चुकतो ना आपण. ” अक्षय थोडा गंभीर होत म्हणाला.

“मीन्स???”

“बघ…हे मॉडर्न वगैरे आपण आता झालोय. पण आपला जवळपास सत्तर टक्के देश अजूनही ग्रामीण आहे. आणि ग्रामीण म्हणजे गावठी लोकं, त्यांना काही येत नाही असा समज करून घेऊ नकोस. त्यांना जरी इंग्लिश येत नसलं तरी त्यांच्याजवळ जे व्यवहारज्ञान असतं ना ते आपल्याला शिकूनही येणार नाही. “

“म्हणजे?? क्या बोल रहा है तू ???”

” ग्रामीण भागातला सर्वात मोठा व्यवसाय कोणता तर शेती. आपल्या संपूर्ण देशासोबतच इतर देशसुद्धा अन्नासाठी त्यांच्यावरच अवलंबून आहोत. ते पिकवतायेत म्हणून आपण खातो. उद्या सगळ्यांनीच जर ठरवलं की शहरात जाऊन राहायचं तर शेती कोण करणार?? बाकीचे उद्योग कोण करणार?? सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत इथे.”

“मग या मुलांनीही शेतीच करायची ना.. कशाला बाकीच्या फंदात पडायचं!”

” तुझ्या बाबांचं मेडिकल आहे ना ??”

“हो.”

“मग तू मेडिकलच्या कोणत्यातरी क्षेत्रात असायला हवं होतंस. इंजिनिअरिंग मध्ये काय करतोय?”

“मला नाही आवडत मेडिकल. मला कोडिंग आवडतं”

“करेक्ट.. मग त्यांच्यापैकी काही जणांना नसेल आवडत शेती करणं. त्यांची काही तरी वेगळं शिकायची इच्छा असेल. आणि ते त्यांच्या गावी शक्य नसेल म्हणून येतात ते शहरात.”

“ते ठीक आहे. पण तरीही इंग्लिशचे वांदेच ना त्यांचे.”

“कुणी सांगितलं? आपण चांगलं इंग्लिश का बोलू शकतो? कारण आपण रोज बोलतो. इंग्लिश त्यांनाही समजतं. पण फक्त आपल्यासारखं फास्ट बोलता येत नाही. जर त्यांना समजतच नसतं तर हा जो मुलगा आहे तो डिप्लोमा पूर्णही करू शकला नसता. त्याने डिप्लोमा पूर्णसुद्धा केलाय आणि त्याला आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशनसुद्धा मिळालंय. म्हणजेच त्याला मार्क सुद्धा चांगलेच मिळाले असणार. आणि तुला तर खूप भारी इंग्लिश येतं न रे.. मग तुला मागच्या सेमिस्टरमध्ये दोन केट्या कशा??”

“ए.. माझ्या केटी आणू नकोस मध्ये.”

“सांगायचा मुद्दा एवढाच की कुणाच्याही भाषेवरून त्यांची पारख करणं अत्यंत चुकीचं आहे. तुला असं नाही वाटत की आपल्या इथे लोकं इंग्रजीचा पोकळ अभिमान घेऊन वावरतात.”

“म्हणजे??”

“म्हणजे बघ ना. आपला देश वगळता बाकीच्या सगळ्या देशात इंग्रजीला फक्त संवाद साधण्याचं एक माध्यम समजलं जातं. जगातील अनेक विकसित देश जसे रशिया, जर्मनी, जपान, चीन या सगळ्या देशात त्यांच्या भाषेला प्रथम स्थान दिलं जातं आणि मग इंग्रजीचा वापर केला जातो. बऱ्याच देशात तर उच्च शिक्षणाला जायचं असेल तर त्यांच्या भाषेच्या परीक्षा द्याव्या लागतात. मग जर आपल्या देशात कुणी त्यांच्या लोकल भाषेत बोललं तर त्यांना कमीपणा का??”

“पण आपल्याकडे इंग्लिशच वापरतो ना आता आपण.”

“आपण त्या भाषेचा स्वीकार केला आहे कारण दीडशे वर्ष आपल्यावर इंग्रजांची सत्ता होती. आपली मूळ भाषा इंग्लिश नाहीये. हिंदीसुद्धा आपली राष्ट्रभाषा नाही. आपल्या देशात जवळजवळ साठ अधिकृत भाषा आणि बाकी अनेक बोलीभाषा आहेत. आणि रोजच्या व्यवहारात ह्या सगळ्या भाषा वापरल्या जातात. “

“हं. बरोबर आहे, आम्ही घरी गुजरातीच बोलतो. “

“सगळ्यात पहिले आपण इंग्रजी भाषेला ज्ञानाचं परिमाण न समजता फक्त एक संवादाचं माध्यम समजायला हवं. कुणी मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्येसुद्धा त्यांचे विचार मांडू शकत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. एखाद्याला इंग्लिश येत नाही म्हणून तो माणूस मूर्ख आहे किंवा त्याला काही कळत नाही असं नसतं रे. बऱ्याचदा येणाऱ्या वाईट अनुभवांमुळे, इतरांकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे त्याचं मानसिक खच्चीकरण होतं. माझंच बघ ना. मी सुद्धा मराठी मिडीयमचा आहे. दहावीनंतर भाषेचा प्रश्न समोर आलाच. मलाही खूप टेंशन यायचं पण तेव्हा माझ्या कोणत्याही मित्राने मला चिडवलं नाही, सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं, मला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी मदत केली, मी बोलताना करत असलेल्या चुका मला वेळोवेळी समजावून सांगितल्या आणि म्हणून आज मी बऱ्यापैकी इंग्लिश बोलू शकतो. जर तेव्हा माझ्या मित्रांनी मला मदत न करता माझी खिल्ली उडवली असती आणि मी ते मनाला लावून घेतलं असतं तर मी कधीच शिकू शकलो नसतो.”

“बरोबर बोललास रे.. माफ कर दे यार.. चूक झाली.”

“हरकत नाही रे. चूक समजली ना..पुरेसं आहे तेवढं. यापुढे कोणाच्या भाषेवरून तरी तू त्यांना जज नाही करणार.”

“नक्कीच.”

© PRATILIKHIT

13790cookie-checkगावठी

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

2 Comments

  1. सुंदर😍🙌तुझ्या या लेखामुळे थोड्या लोकांची मानसिकता बदलली तरी मिळवलं 😁

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories