आत्मनिर्भर भारत

आत्मनिर्भर भारत

 

कोरोनाचा कठीण काळ आणि संपूर्ण जगाबरोबर ठप्प झालेला व्यवहार लक्षात घेऊन पुढे जर कधी अशी परिस्थिती उद्भवली तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये ह्या हेतूने भारतवर्षात पुन्हा एकदा आत्मनिर्भर बनण्याचं रणशिंग फुंकलं गेलं. पण हे अभियान जरी आता प्रकाशझोतात आलं असलं तरी त्याची पाळंमुळं हि आधीच रोवली गेली आहेत. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया यांसारख्या अनेक योजना ह्या आत्मनिर्भर अभियानाचा भाग आहेत.

भारतातील उद्योगविश्वाला गती यावी म्ह्णून पंतप्रधानांनी मेक इन इंडिया ची हाक दिली. आपल्या देशासोबतच जगभरात लागणारं औद्योगिक उत्पादन असं उत्तम दर्जाचं करायचं कि त्याच्या निर्मितीतलं भारतीयपण अभिमानाने मिरवता यायला हवं. एके काळी मेड इन जर्मनी.. जपान, मेड इन यूएसए वगैरे अशा मेड इन..ना किंमत होती. त्या देशांत बनलेल्या वस्तू म्हणजे उत्तमच असणार असं मानलं जायचं. योग्यच होतं ते, कारण त्या देशांचा तसा लौकिक होता. एखादा चुकूनमाकून परदेशात गेलाच, तर परदेशी वस्तू मोठ्या अभिमानानं घेऊन यायचा.

बऱ्याचशा परदेशी वस्तूंचं उत्पादन हे आपल्या देशात होतं. पण केवळ कंपनी परदेशी असल्याने त्या उत्पादनावर परदेशी कंपनीचा टॅग लावून ते अवाच्या सव्वा किंमतींत विकलं जातं. आणि परदेशी ब्रँड पाहून आपण ते घेतोही. आज जगभरातल्या अनेक ब्रँडची भारत हि एक लाभदायक बाजारपेठ आहे. पण जर तेच उत्पादन ‘मेड इन इंडिया’ च्या टॅग वर बाजारपेठेत विकायला आणलं तर त्याकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही. आज व्हिएतनामसारख्या देशात अगदी अ‍ॅपल, बोस वगैरेची उपकरणं बनवली जातात. सॅमसंगच्या रूपानं द. कोरिया समोर आला आणि आसुसमुळे तैवानी उत्पादनांची ओळख व्हायला लागली.

ह्या सगळ्यामध्ये भारत कुठेच नव्हता. म्हणजे आपल्या कंपन्या इतर कंपन्यांसाठी उत्पादन वगैरे बनवून देतात;ते विकलं जातं दुसऱ्याच कोणत्या कंपनीच्या नावानं. हि पद्धत बदलण्याची सुरुवात झाली ती मेक इन इंडिया च्या यल्गाराने. २५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरु झालेल्या या अभियानामध्ये उद्योग, लघु उद्योग आणि उद्योजकांना त्याचे उत्पादन भारतात करण्यास सांगितले जाते. ह्या अभियानात अनेक परदेशी तसेच स्वदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीही झाल्या. अभियान सुरु झाल्यावर एका वर्षाच्या आत भारताने थेट परकीय गुंतवणुकीत अमेरिका आणि चीन यांना जवळपास ६०. १ अब्ज डॉलर्सने मागे टाकले.

आत्मनिर्भर बनण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ च्या अंतर्गत केंद्र सरकारने वीस लाख करोड रुपयांचं आर्थिक पॅकेज घोषित केलं आहे जे भारताच्या एकूण जीडीपीच्या जवळपास दहा टक्के आहे. जेव्हा हे अभियान जाहीर झालं तेव्हा सोशल मीडियावर जोक्स चा महापूर आला होता. पण हे अभियान समस्त भारतवासीयांसाठी किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. गेल्या तीन महिन्यात शेकडो करोडचा पीपीई किटचा उद्योग भारतीय उद्योजकांनी उभा केला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे कि ‘ देशात अशा उत्तम दर्जाचे उत्पादन व्हायला हवे जे ‘मेड इन इंडिया’ आणि ‘ मेड फॉर द वर्ल्ड’ असेल.

भारत आत्मनिर्भर बनू शकतो याच उत्तम उदाहरण ‘इसरो’. लाखो करोडो भारतीयांचा अभिमान असलेली इसरो (Indian Space Research Organisation) संपूर्णपणे स्वदेशी बनावटीवर भर देते. इतर विकसित देशांनी तंत्रज्ञान देण्यास नकार दिल्यावर इसरोने जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारतीय जुगाडाच्या माध्यमातून अशक्य असलेली मिशन शक्य करून दाखवली आहेत. आज जगातल्या टॉप अवकाश संशोधन संस्थांमध्ये इसरोचा समावेश केला जातो.

आणि ह्या आत्ननिर्भर बनण्याचं बीज भारतात रोवलं गेलेलं आहे हे आता आपल्याला पदोपदी दिसून येतंय. कालच एका फेसबुक ग्रुपवर कुणीतरी छत्र्या विकण्यासाठी जाहीरत टाकली होती. त्यातील एकूण कमेंटच्या जवळपास ७० टक्के कमेंटमध्ये लोकांनी ह्या छत्र्या ‘मेड इन चायना’ कि ‘मेड इन इंडिया’ हा प्रश्न विचारला होता. चिनी वस्तूंवर बहिष्कार असो किंवा चिनी अँप वर बहिष्कार आत्मनिर्भर बनण्याची ठिणगी तर पडली आहे आणि लवकरच ती ठिणगी वणव्याचं रूप घेणार हे निश्चित.

या सर्वांवरून आपण हे निश्चितच म्हणू शकतो कि येणाऱ्या काळाची सूत्रे नव्या भारताच्या हाती असू शकतात. आणि याच काळात जर भारत स्वयंपूर्ण बनला तर संपूर्ण जगासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो यात शंकाच नाही.

©PRATILIKHIT

13380cookie-checkआत्मनिर्भर भारत

Related Posts

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories