
रेड सिग्नल….
गाडी भरधाव वेगात असताना अक्षयने अचानक ब्रेक मारला.
” काय रे…काय झालं..” मोबाईलमधून डोकं वर काढून शिवमने विचारलं.
” अरे रेड सिग्नल आहे…”
” वेडा आहेस का तू ???कसले सिग्नल वगैरे पाळत बसलाय..बघ..कुणीच थांबत नाहीये..आणि पांडू सुद्धा नाहीये इथे..तो असला तर उगाच शंभर दोनशे रुपयाची कात्री लागते.”
” त्या पेक्षा थांबायचं ना थोडा वेळ. पैसे पण वाचतील आणि स्वतः च्या मनाला समाधानही मिळेल..”
” ह्या…सिग्नलला थांबतं का कुणी…कोण उगाच वाट बघत दोन चार मिनिटं वाया घालवेल…”
” इतर वेळी तर अर्धा अर्धा तास वाट पाहतो ना..तेव्हा नाही वाटत की एवढ्या वेळ का वाट पाहायची म्हणून…”
असंच काहीसं संभाषण तुम्हीही ऐकलं असेल किंवा तुमच्यातच कधीतरी घडलं असेल. सिग्नल हे तोडण्यासाठीच असतात असंच आपल्यातल्या बहुतांशी लोकांना वाटत असतं. सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस नाही हे पाहून आपण सर्रास सिग्नल तोडतो. पण मुळात पोलिसांना घाबरून सिग्नल पाळण्याची काहीच आवश्यकता नाहीये. कारण सिग्नल पाळणं ही आपली जबाबदारी आहे आणि ही सवय आपण आपल्या अंगवळणी पडून घ्यायला हवी.
आपण इतर देशातील अनेक गोष्टींचं अनुकरण करतो. पाश्चिमात्य संस्कृती, त्याचे कपडे , त्यांचं राहणीमान सारं काही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तर आपण त्यांच्याकडून ही सिग्नल पाळण्याची, वाहतुकीचे नियम पाळण्याची चांगली सवय आत्मसात नाही करू शकत का???
काही सवयी या तिथल्या लोकांनी त्यांची अंगवळणी पाडून घेतलेल्या आहेत. अगदी सिग्नलवर थांबून समोर उभ्या असलेल्या वृद्धांना रस्ता क्रॉस करून दिल्याचे अनेक व्हिडिओ आपण इंटरनेटवर पाहतो. पण तेच जर आपल्या इथे घडलं तर..
” ए म्हाताऱ्या…मरायचंय का..गाडी दिसत नाही का..” असं आपण बिनधास्त बोलून मोकळे होतो.
कुणी एकाने सिग्नल तोडला की मग आपण मेंढ्यांसारखे मागचा पुढचा विचार न करता त्याचं अनुकरण करतो.
वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षिततेसाठी बनवलेले आहेत. आणि आपण ते तोडून आपणच आपला जीव धोक्यात घालतो.
मागे मी म्हटलं होतं की समोर उभा आलेला पोलीस आपल्याला लुटायला नसून आपल्या रक्षणासाठी आहे याची जेव्हा मनाला खात्री पटेल तेव्हाच मी स्वतंत्र झालो असं म्हणता येईल. पण आता ते थोडं बदलावस वाटतंय. जेव्हा समोर पोलीस उभा नसताना सुद्धा मी रेड सिग्नलवर थांबेन तेव्हाच मी स्वतःला सुजाण नागरिक म्हणू शकेन.
© PRATILIKHIT
खरंय👍स्वःताला बदला देश बदलेल😊
Thank you appu 💝