नियती….पर्व दुसरे ( भाग २२)
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे विराजस सर्वांच्या आधी येऊन बसला होता. म्हणजे तसे निखिल, विराजस, कार्तिक वगैरे त्यांची गॅंग एकत्रच यायची. पण कालच्या ट्रीपमुळे सगळे जण दमले होते त्यामुळे त्या सगळ्यांनाच जरा उशीर झाला. विराजसला नेहमीच्या वेळेला जाग आली मग पटापट आवरून तो जिमला जायचं म्हणून लवकर निघाला. निघताना त्याने कार्तिक आणि निखिलला हलवून हलवून जागं केलं आणि दरवाजा नुसता लोटून घेतला.
थोड्या वेळाने एक एक जण येऊ लागले. विराजस मात्र रश्मीची वाट पाहत होता. रश्मी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून तरी तिचा मूड बरा दिसत नव्हता. रश्मी आली आणि तशीच विराजसकडे न बघता बाहेर गेली. विराजसला जरा आश्चर्यच वाटलं पण मग त्याने सुद्धा त्याच्या कामाकडे लक्ष वळवलं. नंतर दुपार पर्यंत तरी विराजस आणि रश्मी समोरासमोर आले नाहीत.
चार वाजता विराजस त्याच्या ग्रुप बरोबर चहा प्यायला म्हणून बाहेर आला होता तेव्हा रश्मीसुद्धा मिथिला बरोबर तिथे होती. रश्मीला पाहिल्यावर विराजस नेहमीच्या मस्करीच्यामूड मध्ये म्हणाला..
” आज तर काही लोकांना खूप भाव चढलाय वाटतं..शनिवारी तर किती मिस करत होते..आणि आज ओळख दाखवायला पण तयार नाहीत..”
” हा हा..तुला आधीच म्हणालो होतो मी पण तू भरकटला होतास ना…” निखिलने असं म्हणतात बाकीचेसुद्धा हसायला लागले.
यावर कोणी काही बोलणार तोच रश्मी किंचाळली..
” यार तुम्हाला काय दर वेळी मस्करीच सुचते का…तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता का ??”
रश्मी इतकं म्हणाली आणि ताडताड पावलं टाकत कलासमध्ये निघून गेली. मिथिलाचे क्षणभर विराजसकडे पाहिलं आणि नजरेनेच सॉरी बोलून ती सुद्धा रश्मीच्या मागे धावली.
” हिला काय झालं मध्येच…” सिद्धेश सिगारेट पेटवत म्हणाला.
” काय माहीत…त्या अक्षय बरोबर काही झालं असेल…” कार्तिक हसत म्हणाला आणि मग सगळेच त्या हसण्यात सामील झाले.
त्या नंतर विराजसने रश्मीकडे एकदाही पाहिलं नाही. तो स्वभावाने चांगला असला तरी शीघ्रकोपी होता. उगाचच समोरचा काही बोलला तर तो अजिबात ऐकून घायचा नाही. नवीन मुलींशी मैत्री करण्यासाठी तो नेहमी पुढाकार घ्यायचा पण ती मुलगी आपल्याला इग्नोर करतेय अशी थोडी जरी शंका आली तर तो तिला सरळ फाट्यावर मारायचा. त्याच्या जुन्या सगळ्याच मित्रमैत्रिणीना त्याचा हा स्वभाव चांगलाच माहीत होता. पण ते सगळे त्याला सांभाळून घायचे कारण एकदा का त्याचा राग शांत झाला की तो जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याची माफीही मागायचा.
एक दोन दिवस गेले असतील.विराजस पुढच्या पिकनिकच्या तयारीला लागला. पण यावेळी त्याच्यासोबत रश्मी नव्हती. विराजसने एकट्यानेच सगळ्या हॉटेल्स वगैरेला फोन करून चौकशी वगैरे केली. पण गुरुवारी त्यांना समजलं की केरळच्या किनारपट्टीच्या जवळ वादळ सुरू असल्याने त्यांना या वीकेंडला बाहेर जायला परवानगी मिळणार नव्हती. सगळ्यांचाच हिरमोड झाला.
शनिवारी सकाळी विराजस जरा उशिराच उठला..भूक लागली होती म्हणून सगळं आवरून तो नाश्ता करायला खाली गेला तर खाली सिद्धेश धापा टाकत बसला होता. त्याची अवस्था बघून हा रंनिंग करून आलेला आहे की विराजसला कळलं. त्याला न विचारताच विराजसने दोन ऑम्लेटपाव ची ऑर्डर देऊन टाकली.
नाश्ता करून दोघे रूमवर आले. आल्या आल्याच निखिल त्यांना म्हणाला..
” बिग बाजार ला जातोय आपण दुपारी…”
विराजस आणि सिद्धेशने अधिक काही न विचारता त्याला मूक संमती दिली. घरी बसून बोअर होण्यापेक्षा कुठे तरी बाहेर पडलेलं बरं हेच सगळ्यांचं मत होतं.
बिग बाजार मध्ये फिरण्यात त्यांची संध्याकाळ कशी निघून गेली त्यांचं त्यांनाच कळलं नाही. ऐश्वर्या आणि हिमांशीने तर संपूर्ण महिन्याची शॉपिंग करून घेतली. सगळे परतीच्या प्रवासाला निघणार तोच कार्तिकचा फोन वाजला. मिथिलाचा फोन पाहून त्याला जरा आश्चर्यच वाटलं.
” हॅलो…”
” हॅलो कार्तिक..मिथिला बोलतेय..”
” हा बोल ना..काय झालं??”
” कुठे आहेत तुम्ही …”
” आम्ही बिग बाजार ला आलो होतो..आता जातोय परत रूम वर…”
” बस पकडली का तुम्ही ??”
” नाही. आता बस स्टॉप वरच जातोय…”
” थांबा..आम्ही सुद्धा इकडेच आहोत…भेटा…काहीतरी ठरवायचय…”
” ठीक आहे तुम्ही कुठे आहात आत्ता???”
” आम्ही सुद्धा बिग बाजार च्या जवळच आहोत. ते कैलाश रेस्टॉरंट दिसतंय…”
” हो..ठीक आहे येतो..”
ते सगळे कैलाशच्या जवळ आले तर मिथिला, अक्षय, सुजित, रश्मी असा त्यांचा सगळा ग्रुपच तिथे होता. आणि त्यांनी कोवलम बीच वर जायचा प्लान बनवला होता. अक्षयचं कोणी ऐकणार नाही आणि रश्मी विराजस एकमेकांशी बोलत नव्हते म्हणून मग मिथिलानेच निखिल विराजसला सगळा प्लॅन सांगितला. परवानगी नसताना बीचवर जाणं रोहितला पटत नव्हतं पण मग सगळेच तयार झाल्याने त्याचासुद्धा नाईलाज झाला.
निखिलने ते आधी राहिलेल्या हॉटेल मध्ये फोन करून चार रूम बुक केल्या तो पर्यंत अक्षय आणि सुजित त्यांच्या ग्रुपसाठी आणि सिद्धेश आणि गौरव त्यांच्या ग्रुपसाठी हार्ड ड्रिंक्स घेऊन आले.
सगळे एकत्र निघालेले खरे पण अक्षय आणि विराजसला एकमेकांपासून दूर ठेवणं सगळ्यांसाठी खूप मोठं आव्हान होतं. कारण दोघांमध्येही मतभेद होते आणि दोन पेग पोटात गेल्यानंतर त्या मतभेदांचं कशात रूपांतर होईल कोणीही सांगू शकत नव्हतं.
क्रमशः
No Comment