Uncategorized
एक उनाड दिवस…
मोडून रोजचे तेच तेच वेळापत्रक
कधीतरी घ्यावी कामातून सुट्टी
थोडा वेळ स्वतःसाठी काढून
जमवावी निसर्गाशी गट्टी
जावे सिमेंटच्या जंगलापासून दूर
आणि अनुभवावा सह्याद्रीचा निसर्गरम्य सहवास
चाखावी डोंगरच्या काळ्या मैनेची आंबट गोड चव
आणि अनुभवावा रानफुलांचा मनमोहक सुवास
कधीतरी भागवावी एकांताची हौस
आणि एकटंच समुद्रकिनारी जाऊन बसावं
काही क्षण सर्व व्याप विसरून
अथांग पसरलेला सागर निरखत राहावं
कधी तरी अमावस्येच्या रात्री
एखाद्या उंच कड्यावर जाऊन पाहावा आकाशगंगेचा थाट
तर कधी गर्द झाडीत जाऊन अनुभवावा
चमचमणाऱ्या काजव्यांचा लखलखाट
रोजच्या धकाधकीच्या जीवनात
कधीतरी स्वतःसाठी जगावे
कधीही न घेतलेले अनुभव घेऊन
ते क्षण अविस्मरणीय करावे
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment