दिल, दोस्ती.. दोबारा..

दिल, दोस्ती.. दोबारा..

 

फावल्या वेळात फेसबुक स्क्रोल करत असताना सम्राटने अन्याने म्हणजेच अनिकेतने त्याच्या ऑफिसच्या मित्रांबरोबर केलेल्या ट्रिपचे फोटो पाहिले आणि पुन्हा त्याचं मन कॉलेजच्या जुन्या आठवणीत रमलं.

कॉलेजची त्याची गॅंग…तो, अनिकेत, शर्वरी, सुशांत,तन्वी, मनीषा ध्रुव..शनिवारची अगदी आतुरतेने वाट पाहत असायचे सगळे जण..शनिवारी कॉलेज आणि extra लेक्चरच्या नावाखाली अख्खी मुंबई फिरून झाली होती त्यांची. इतकच नाही तर सकाळी सहा ते रात्री बारा अशा अठरा तासांत त्यांनी अलिबाग ट्रिप सुद्धा केली होती. फिरायला सगळे एका पायावर तयार. मग कधी गेलेल्याच ठिकाणी परत जायचं असलं तरी त्यांचा उत्साह कमी व्हायचा नाही. कुठे जायचं ठरलेलं नसलं की चला नॅशनल पार्क असा त्यांचा अलिखित नियमच होता.

पण कॉलेज संपलं आणि मग सगळे आपापल्या मार्गाला लागले.
सम्राट, ध्रुव, अनिकेत, मनीषा नोकरी करून दुसऱ्यांचा बिझनेस वाढवत होते. तन्वी आणि शर्वरी दोघीपण एमएस करण्यासाठी अमेरिकेला गेल्या आणि सुशांत आयइएस करण्यासाठी पुण्याला…ते सगळे जेव्हा वेगळे झाले तेव्हा आठवड्यातून त्यांचा एक skype call व्हायचा…हळू हळू आठवड्याचा महिना झाला..नंतर महिन्याचं वर्ष…नंतर नंतर तर कोणाचा वाढदिवस असेल तेव्हाच त्या व्यक्तीचं बाकी लोकांशी बोलणं व्हायला लागलं.

आता सगळ्यांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं. पूर्वी इच्छा असून त्यांना भेटता कुठे जाता येत नव्हतं आणि आता सगळ्यांचं जग हे वेगळं झालं होतं. अगदी कोणी ठरवून भेटायचं ठरवलं तरीसुद्धा भेटता येईल की नाही अशी शंका कधी कधी सम्राटला यायची. कॉलेजला असताना कोणताही प्लान बनवण्यात सम्राटच पुढे असायचा पण जर कोणी प्लान रद्द केला तर तो प्रचंड चिडायचा. आता जर आपण काही प्लान बनवला आणि उगाच वैयक्तिक कारणं देऊन यायचं टाळलं तर उगाच पुन्हा हिरमोड…त्या पेक्षा नकोच असा विचार करून तो विषय तिथल्या तिथे थांबवायचा.

होतं ना आपल्या बरोबरसुद्धा असं…आपण शाळेत असतो. तेव्हा सगळे एकत्र असतो.त्या नंतर जेव्हा शाळेतून कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपल्याला दुसरे मित्र मैत्रिणी बनवण्याशिवाय गत्यंतर नसतं.. जेव्हा कॉलेज संपतं तेव्हा मग पुन्हा इतर निमित्ताने आपण वेगळे होतो. आणि एकदा का वेगळं झालं की पुन्हा पहिल्यासारखं एकत्र येणं जवळजवळ अशक्य असतं. कारण निसर्गाचा नियमच आहे की पक्षाची पिल्लं एकाच घरट्यात मोठी होत असली तरीसुद्धा त्यांना काही काळाने स्वतंत्र भरारी घ्यावीच लागते..पुन्हा त्या घरट्याकडे परत न येण्यासाठी…मग त्यांना नवीन सोबती हे शोधावेच लागतात. आपलंही तसंच असतं..जेव्हा आपण एकटे पडतो तेव्हा आपल्याला सोबत ही शोधावीच लागते. हा सगळ्यात सहवास हा अत्यंत महत्वाचा आहे. जसं प्रेम टिकण्यासाठी सहवास महत्वाची भूमिका बजावतो तसाच मैत्री टिकवण्यासाठी सुद्धा. जो पर्यंत सगळे एकत्र असतात तो पर्यंत त्यांच्यातील मैत्री ही टिकून राहते. जर दुरावा आला तर त्यांच्यातील मैत्री राहते पण पहिल्याइतकी घट्ट नाही.

( प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातचं..पण सर्वसाधारणपणे घडणारी गोष्ट सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.प्रत्येकाची मते ही वेगळी असू शकतात. याबाबद्दल तुमचं मत ऐकायला मला नक्की आवडेल. )

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

6590cookie-checkदिल, दोस्ती.. दोबारा..

Related Posts

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories