नियती….पर्व दुसरे..(भाग १७)
रात्री नेहमीच्या रुटीनप्रमाणे तिने अविनाशला कॉल केला. पण दोघांकडेही बोलण्यासारखं खास असं काही नव्हतं. रोजच्या दिवसाचे तेच तेच अपडेट तरी किती देणार. थोडा वेळ बोलून तिने फोन ठेवून दिला. झोप येत नव्हती पण हॉस्टेलमध्ये अकरा वाजता लाईट बंद करावे लागत असल्याने ती तशीच बेड वर पडली आणि निद्रेच्या आधीन कधी झाली तिचं तिलाच कळलं नाही.
आठवडा असाच निघून गेला. तरी बरं त्यांना शुक्रवारीच कळलं की शनिवारी सुट्टी नाही आहे. मग अक्षयने पुढाकार घेऊन रविवारी सकाळीच कोवलम बीचला जायचा प्लान नक्की केला. आणि एक एक करून जवळ जवळ अख्खी बॅच त्या प्लान मध्ये सामील झाली. अपवाद होता तो मुंबईचाच दुसरा ग्रुप..निखिल,कार्तिक,गौरव ,ऐश्वर्या, हिमांशी, रोहित, सिद्धेश आणि विराजस..केरळला येतानाच आपण बॅचसोबत फिरायचं नाही आपण आपलं स्वतंत्र फिरायचं असं ते ठरवूनच आले होते. त्यामुळे बॅचच्या प्लान मध्ये सामील होण्याचा काही प्रश्नच नव्हता.
निखिलने त्याच्या जुन्या मित्रांना फोन करून एका दिवसात कुठे जाता येईल याची माहिती काढली आणि शुक्रवारी रात्री ते वर्कला बीचला गेलेसुद्धा.
इथे अक्षयने सर्वाना सकाळी आठ वाजता तयार राहायला सांगितलं होतं.आठ वाजता बस मुलींच्या हॉस्टेलला पोहोचणार आणि मग तिथून मुलांच्या हॉस्टेलला येऊन मुलांना घेऊन मग सरळ कोवलम बीच..पण त्यांना निघायलाच साडेदहा झाले. उशीर झाल्याने अक्षयचा पारा बराच चढला होता. बस येई पर्यंत त्याची सगळ्यांना शिव्यांची लाखोली वाहून झाली. शेवटी बस निघाली तसा सगळ्यांनी एकच जल्लोष केला.
बसमध्ये सुरुवातीला सगळे शांत होते पण मग ड्रायव्हरने उडती लावायला सुरुवात केली आणि आपोआप सगळ्यांचे पाय गाण्याच्या तालावर थिरकायला लागले. सुरुवातीला फक्त अक्षय आणि नेहा नाचत होते आणि मग अक्षयने जबरदस्तीने सगळयांनाच उठून नाचायला लावलं. ते कोवलमला पोचले तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. बसमधून उतरून कोवलम बीच वर पोहोचेपर्यंत सगळ्यांची डोकी तापली होती पण कोवलमचा तो निळाशार समुद्र पाहिला आणि सगळ्यांचा थकवा कुठल्या कुठे पळाला.
” आयच्या गावात….काय क्लिअर आहे पाणी…यात डुंबायला मजा येणार..मिथिला पाण्यात येणार आहेस तू????” अक्षयने एकदम उत्साहात विचारलं.
मिथिलाकडून नकाराची अपेक्षा करणाऱ्या अक्षयला त्याच्या बाजूने कौल मिळताच मोबाईल आणि पाकीट मिथिलाकडे देऊन तो धावत सुटला. मिथिला काही बोले पर्यंत तो पाण्यापर्यंत पोचला देखील होता.
” किती एर्नर्जेटिक आहे हा…” रश्मी सहज मिथिलाला म्हणाली.
” अगं अजून थोडे दिवस थांब…कळेल मग तुला..आपण कधी विचारसुद्धा करणार नाही असे उद्योग करून झालेत त्याचे. डोकं असं चालतं ना त्याचं कि विचारू नकोस…”
” हाहा…बघूया काय उपद्व्याप करतोय ते…”
“तसा चांगला आहे ग…पण मस्ती करायला लागला की समोरच्याला रडवूनच सोडतो…”
” ओह…बरं तू येणारच नाही आहेस का पाण्यात….”
” नाही…एक तर दुसरे कपडेसुद्धा नाही आणलेत..आणि मला अजिबात आवडत नाही त्या ओल्या कपड्यात राहायला..”
” अगं पूर्ण पाण्यात नाही जायचं…थोडेसे पाय भिजवू….”
” नको..तू आणि नेहा जा…”
” तिचा कुठे पत्ता…ती बघ फोटो काढत कुठपर्यंत पोचली…”
” हा..हिला एक फोटोग्राफीच वेड….कुठे गेली की फोटोच काढत बसते…”
” जाऊदे…मी जाते एकटीच…तसही आपल्यातले बरेच आहेत तिथे….”
“ठीक आहे…मी थांबते इथेच..तू ये जाऊन…”
समुद्राच्या त्या पारदर्शी पाण्यात रश्मी शांतपणे उभी होती. दूरवर पसरलेला अथांग सागर आणि नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा मध्येच कापूस पिंजून ठेवल्यासारख्या मेघांचा आसमंत यात तिची नजर फिरत होती. मध्येच थंडगार वाऱ्याची झुळूक त्या तप्त उन्हातसुद्धा शरीरासोबतच मनालाही गारवा देत होती.
‘ आता अवि असता तर इथे….’ असा विचार क्षणभर तिच्या मनात येऊन गेला. तिने लगेच त्याला फोन करण्यासाठी मोबाईल बाहेर काढला. पण ‘No Service’ पाहून ती थोडीशी हिरमुसली. मोबाईल पुन्हा खिशात ठेवून ती पुन्हा पायाला हळुवार स्पर्श करून गुदगुल्या करणाऱ्या लाटांचा आनंद घेऊ लागली.
इतक्यात तिच्या अंगावर पाण्याचे काही तुषार उडाले. तीने डोळे उघडून पाहिले तर समोर अक्षय उभा…क्षणभर ती त्याच्याकडे बघतच राहिली. पण लगेच तिने स्वतःला सावरलं.
” काय मॅडम…कसल्या विचारात आहेत….” अक्षय पाण्यात कोलांटी उडी मारत म्हणाला.
रश्मी काही बोलणार तोपर्यंत अक्षय पाण्याखाली गेला होता. रश्मी मागे वरून जाणार तोच मागून अक्षयचा आवाज आला.
” सॉरी सॉरी….मी तुला विचारलं आणि मीच गायब झालो. ”
” इट्स ओके….”
” तू काय नेहमीच इतकी सिरीयस असतेस का ???”
” सिरीयस??? नाही रे…काहीही काय…”
” नाही तर काय…कधी पासून बघतोय मी….एवढा छान निसर्ग आहे…त्याची मजा घायची सोडून तू कुठल्यातरी विचारात मग्न आहेस…डोन्ट टेल मी की तू उद्याच्या प्रेझेंटेशनच टेन्शन घेतलयस..”
” नाही रे…असं काही नाही….असंच जर एकटं राहावंसं वाटलं म्हणून…”
” ऑल ओके ना…”
” हो…”
” मग ठीक आहे…चला आता निघुया…जेवून झाल्यावर बरंच फिरायचंय…”
” हो…बाकीच्यांना तर सांग….”
” हो…सांगतो…” आणि अक्षय पुन्हा ओरडत पाण्यात शिरला.
‘ कसा आहे हा…एकदम वल्ली…’ रश्मी पाण्यातून बाहेर पडताना स्वतःशीच म्हणाली.
कडाडून भूक लागलेली असल्यामुळे सगळ्यांनी आवडीच्या डिश ऑर्डर केल्या खऱ्या पण पहिला घास तोंडात टाकताच सगळ्यांनी तोंड वाकडी केली. सगळे पदार्थ नारळाच्या तेलात बनवलेले..त्यामुळे घास खाल्ल्यानंतरसुध्दा एक वेगळीच चव जिभेवर रेंगाळत होती. कसंबसं जेवण संपवून सगळे जवळच असलेल्या लाईट हाऊस वर पोहोचले. लाईट हाऊस चांगलं सात आठ मजली उंच होतं. लाईट हाऊसच्या एका बाजूने जवळपास वीस ते तीस किलोमीटरचा परिसर आरामात पाहता येत होता. ते दृश्य खरोखरच विलोभनीय होतं. समुद्राच्या बाजूने खाली पाहिलं तर दगडांवर आपटून परत येणार फेसळलेलं पाणी पांढऱ्याशुभ्र दुधाप्रमाणे भासत होतं.
थोडावेळ तिथेच थांबून फोटोसेशन वगैरे करून सगळे परतीच्या प्रवासाला लागले. दिवसभराच्या थकव्यामुळे बसमध्ये सगळ्यांच्याच विकेट पडल्या होत्या. अक्षय मात्र जागा राहून सगळ्यांचे झोपलेल्या अवस्थेत वेडेवाकडे फोटो काढत होता.
साधारण आठ वाजता सगळे होस्टेलवर पोहोचले. थोडंस खाऊन लगेचच सगळे आपापल्या रुम मध्ये गेले.
रश्मीने सवयीप्रमाणे अविनाशला फोन लावला. आणि जवळपास दोन आठवड्यांनी त्यांच्यात पुन्हा पहिल्यासारखं बोलणं झालं. दोघांनाही थोडं बरं वाटलं. बोलता बोलता रश्मी निद्रेच्या आधीन झाली. मग अविनाशने मनातच तिला गुड नाईट विश करून फोन ठेवून दिला आणि झोप येत नसल्याने शनिवारी काढलेले फोटो एडिट करायला सुरुवात केली.
क्रमशः
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment