रविवारी सकाळी सकाळीच रश्मीचा फोन आला..
” हॅलो….गुड मॉर्निंग ”
” वेरी गुड मॉर्निंग..” अविनाश आळस देत म्हणाला.
” अजून उठली नाही वाटतं स्वारी…”
” नाही..म्हटलं आज आराम करूया जरा….”
” बरंय….मग…आज काय प्लॅन…??”
” माझे प्लॅन कधी ठरलेले असतात का..ते अचानक ठरतात..”
” हो..तेही आहेच…आम्ही आज बीच वर जाणार आहोत…”
” वाह…मस्त..कोणत्या…”
” St. Andrew’s म्हणून आहे कोणतातरी जवळच…मला सुद्धा नक्की माहीत नाही…मिथिलाचा मित्र आहे ना…तो आधी येऊन गेला होता केरळला..त्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती आहे..”
” अच्छा…म्हणजे तुझं केरळ फिरून होणार तर…”
” बघू… जेवढं मिळेल फिरायला तेवढं फिरायचं…”
” हो..”
” हं…चल मी ठेवते फोन..अजून सगळं सामान बॅग मध्येच आहे..आज जरा जायच्या आधी सामान लावून ठेवते..”
” बरं… ठीक आहे….मी झोपतो जरावेळ अजून….”
” हं… टाटा…”
” बाय…”
साधारण चार वाजता रश्मी, मिथिला, नेहा आणि मिथिलाचे दोन मित्र अक्षय आणि सुजित बीचवर गेले. दुपारची वेळ असल्यामुळे बीचवर फारशी वर्दळ नव्हती. बीचच्या आजूबाजूला फारशी झाडं सुद्धा नव्हती त्यामुळे ऊन जाणवत होतं. ओल्या मातीवर सूर्याची किरणे पडल्याने ती थोडीशी तांबूस भासत होती. एका बाजूला चॉकलेटी जेलिफिशचा एक कळप किनाऱ्याला लागल्यामुळे मरून पडला होता. अक्षयने लगेच बाजूला पडलेली काठी उचलून जेलिफिशला उलटसुलट करायला सुरुवात केली.
” अक्षय..कशाला नाय ते धंदे करतोयस…जेलिफिश विषारी असतात माहितीये ना…”
” म्हणून तर काठीने बघतोय ना…अक्षयने जेलिफिशवरून नजर न हटवता उत्तर दिलं.
” आधीच ते मरून पडलेत..बघ किती घाण दिसतंय ते…चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊया…”
” थांब ग…आपल्या इथे कधी पाहायला मिळतो का जेलिफिश…असेल तर तो सुद्धा तारापूरवालामध्ये..आयता दिसलाच आहे तर जरा निरीक्षण करू दे…”
” तू काही ऐकणार नाहीस..आम्ही जातो… तू ये तुझं झालं की…”
असं म्हणून मिथिलासोबत बाकी जण पण निघाले. त्यामुळे अक्षयचा सुद्धा नाईलाज झाला..भरभर त्या जेलिफिशचे फोटो काढून त्याने त्यांना गाठलं.
” मस्तय ना बीच..” नेहा सेल्फी काढत म्हणाली आणि तेवढ्यात मिथिला आणि रश्मीसुद्धा तिच्या फोटोत जॉईन झाल्या.
बरेच फोटो काढून झाल्यावर शेवटी मग पाचही जण तिथेच वाळूत बसले. मिथिला, नेहा, अक्षय आणि सुजित आधीच एकमेकांना ओळखत होते. गप्पा मारता मारता रश्मीची सुद्द्धा त्या सगळ्यांशी चांगलीच गट्टी जमली.
त्या रस्त्यावर रोडलाईट नाही हे अक्षयला आधीच माहीत असल्याने दिवस मावळायच्या आतच सगळे परतीच्या प्रवासाला लागले. इंटरनेट नसल्याने आणि भाषेचा थोडा प्रॉब्लेम होत असल्याने त्यांना पोचायला थोडा उशीर झाला. मिथिला, नेहा आणि रश्मीला त्यांच्या हॉस्टेलला सोडून सुजित आणि अक्षय पुढे गेले.
‘डे वेल स्पेन्ट..’ असं स्टेटस आणि एक पाऊट वाला सेल्फी अविनाशला पाठवून रश्मीने फोन चार्जिंगला लावला. गप्पा मारण्याच्या नादात रात्री अकरा कधी वाजले त्यांनाही कळलं नाही. रश्मी झोपायला आली तेव्हा अविनाशचा तिच्या मेसेजवर रिप्लाय आला होता. पण उशीर झाला असल्यामुळे अविनाश झोपला असेल असं समजून तीनेसुद्धा त्यावर रिप्लाय न करता फोन बाजूला ठेवून दिला आणि परत हॉलमध्ये जाऊन गप्पा मारत बसली.पण त्याच वेळी सुट्टी असूनसुद्धा दिवसभरात रश्मीशी बोलणं झालं नाही म्हणून अविनाश जागा राहून रश्मीच्या मेसेजची वाट पाहत होता.
रश्मीची सोमवारची सुरुवात झाली तीच मुळी पुढल्या आठवड्याच्या प्लॅंनिंगने..ती मिथिला आणि नेहा पुढच्या विकेंड बद्दल बोलत बोलत ऑफिसला पोचल्या. ऑफिसला पोचल्या पोचल्या तिला लक्षात आलं की आज अविनाशला गुड मॉर्निंग विश करायचं राहून गेलय.. तिने मेसेज पाठवायला नेट चालू केलं तरी अविनाशचा आधीच मेसेज आलेला. नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मग मोबाईल ठेवून ती तिच्या कामात व्यस्त झाली.
” अक्षय…पुढल्या आठवड्यात कुठे जायचं..”
मिथिलाचे कॉम्पुटरची स्क्रीन बंद करता करता विचारलं.
” बघू गं… वेळ आहे अजून..आणि आपल्याला शनिवारी सुट्टी आहे की नाही ते सुद्धा आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आता उगाच कल्पनेचे इमले बांधण्यात काहीही अर्थ नाही.”
” तेही बरोबर आहे म्हणा..पण तरी…”
” जर दोन दिवस सुट्टी असली तर लांब जाऊ कुठे तरी मस्त…नाही तर जवळच कुठेतरी जावं लागेल..”
” चालेल..पण कुठेतरी जायचं हा…हॉस्टेल मध्ये किती बोअर होतं यार…”
” पहिल्याच आठवड्यात बोअर झालीस…अजून तर तीन महिने जायचे आहेत..”
” कसे जाणार काय माहीत…”
” कसे जाणार काय..मस्त जाणार…एवढं स्वातंत्र्य मिळालंय का कधी…मस्त एन्जॉय करायचं…”
” हो ते आहेच रे..पण कधी लांब नाही राहिली ना घरापासून…म्हणून मग जमत नाहीये..एकदा सवय झाली की मग परत जाव असं नाही वाटणार…”
“हं…आहेत ते दिवस एन्जॉय करायचे.. पुन्हा कुठे तू केरळला राहायला येणार आहेस…”
” हा…बरं ऐक..आम्ही कॅफे मध्ये चाललोय.. येणार आहेस तू???”
” हो.कोण कोण येतंय…”
” मी रश्मी आणि नेहा…”
” ठीक आहे…चला…”
” रश्मी…किती वेळ मोबाईल बघत बसणार आहेस…चल आता…” मिथिला बाहेर निघता निघता म्हणाली.
रश्मीने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि ती आपल्याच विश्वात त्यांच्यामागे चालू लावली.
क्रमशः
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
