नियती…..(भाग ६)
घरी पोहोचल्या पोहोचल्याच तिने अविनाशला मेसेज केला..’ घरी पोचलास की मेसेज कर..’ आणि मोबाईल चार्जिंगला लावून आईला मदत करायला किचन मध्ये गेली. सगळं आवरून झाल्यावर तिने परत येऊन मोबाईल बघितला तर तिने पाठवलेला मेसेज अविला अजून डिलिव्हर झाला नव्हता…तिला थोडी काळजी वाटू लागली..कारण अविला इथून जाऊन साधारणतः दोन तास झाले होते. एव्हाना तो घरी पोचायला हवा होता..त्याला बाईक खूप जोरात चालवायची सवय आहे हे सुद्धा रश्मीला त्याने कॉफी पिताना सांगितलं होतं…त्यामुळे तिला जास्तीच काळजी वाटत होती..नानाविध शंका तिच्या मनात येत होत्या..किती तरी वेळा तिला वाटलं…’ कॉल करून विचारू का??? पण मी कॉल केला तर त्याला काय वाटेल…तो काय विचार करेल….आणि मुख्य म्हणजे मी का त्याची इतकी काळजी करतेय… इतक्या कमी वेळात मी त्याच्याशी एवढी attach झालीये का….की त्याला साधा मेसेज डिलिव्हर नाही झाला तर मी अस्वस्थ व्हावं….जाऊ दे..तो बघितल्यावर करेल रिप्लाय….’ असं स्वतःशीच म्हणून अस्मिने दुसरीकडे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुध्दा मोबाईल वाजला की त्याचा मेसेज असेल म्हणून ती उत्सुकतेने व्हॅट्स अँप ओपन करायची आणि मग तिचा हिरमोड व्हायचा…मग तिने एअरफोन्स कानात टाकले आणि तिची आवडती प्लेलिस्ट चालू केली…जेव्हा तिला कधी बोअर व्हायचं तेव्हा ती ती प्लेलिस्ट ऐकत बसायची…एक दोन गाणी ऐकली असतील तेवढ्यात वरच्या नोटिफिकेशन बारवर अविनाशचं नाव दिसलं..तिने लगेच मेसेज ओपन केला…
‘ hey…. sorry… हो मी पोहोचलो आत्ता घरी….’
रश्मीने मेसेज वाचला…जरा रागातच…आणि ‘ok…good night.’ एवढाच रिप्लाय केलं… तिच्या त्या रिप्लाय वरून तिचा मूड ऑफ आहे हे समजायला अविनाशला वेळ लागला नाही. मुलीचा मूड ऑफ असला आणि तिला काय झालंय हे विचारलं नाही तर तो मुलगा कसला….मग तो अवि असो वा दुसरा कोणी…त्याने लगेच रश्मीला कॉल केला…त्याचा कॉल आलेला बघून रश्मीला एकदम हसायला आलं…पण तरीही तिने लटक्या रागातच फोन उचलला….
” हं……”
” काय ग…काय झालं??? ”
” कुठे काय ??? काही नाही…”
” हो का….चेहऱ्यावरून मूर्ख दिसतो ग मी फक्त…पण प्रत्यक्षात नाहीये…” अविनाश हसतच म्हणाला…त्याच्या अशा बोलण्यावर रश्मीलासुद्धा हसायला आलं पण आलेलं हसू दाबत ती म्हणाली…
” मला कसं माहीत असणार….मी थोडीच ना तुला खूप दिवसांपासून ओळखते….”
” हा…ते सुद्धा बरोबर आहे म्हणा….पण मी जेवढं तुला या काही दिवसांपासून ओळखतो त्यावरून आता हे नक्की सांगू शकतो की तुझा मूड खराब आहे…त्यामुळे आता जास्ती भाव न खाता सांग काय झालं….अर्थात…तू सांगायला comfortable असशील तर….” अविने त्याचा डाव टाकला…
रश्मी विचारात पडली…आता याला काय सांगायचं….याला असं थोडीच सांगू शकतो की तू लवकर रिप्लाय दिला नाहीस म्हणून मी रागावलेय… त्याचा काही वेगळाच गैरसमज होईल…
” अरे काही खास नाही….ही घरी आई कटकट करत होती…म्हणून जरा मूड ऑफ होता…”
हे खरं कारण नाहीये हे अविला लगेच समजलं…पण तरीही अजून खोलात न शिरता त्याने ते कारण त्याला पटलय असं दाखवलं…त्या नंतर ते बराच वेळ फोनवर बोलत होते. बोलता बोलताच अविनाशला झोप लागली कारण त्याला रात्री जागायची फारशी सवय नव्हती….एरवी साधारणतः साडेदहा अकरालाच त्याची रात्र होऊन जायची. रश्मी मात्र एक दोन वाजेपर्यंत जागायची…अविनाश झोपला तरी रश्मीने फोन चालूच ठेवला.. तो पूर्णपणे झोपला याची खात्री होताच त्याला गुड नाईट म्हणून तिने फोन ठेवून दिला आणि पुन्हा प्लेलिस्ट चालू केली.
************************************
” रश्मी…ए रश्मी….अगं ऊठ…वाजले बघ किती…आज ऑफिसला नाही जायचं का???”
आईने हाक मारताच रश्मी ताडकन उठून बसली…
डोळे चोळत चोळतच तिने मोबाईलमध्ये बघितलं तर साडेसात वाजले होते.
” shit…. साडेसात वाजले…आई…तू उठवलं का नाहीस मला???”
” मला काय माहीत तू अजून उठली नाहीये..मला वाटलं उठून आवरत असशील…पण नेहमीच्या वेळेला बाहेर आले नाही म्हणून बघायला आहे मी…तर तू आपली साखरझोपेत…सकाळी लवकर उठायचं असतं तर रात्री जरा लवकर झोपावं ना माणसाने…तर ते नाही…”
” ए आई…तू प्लीज आता सकाळी सकाळी सुरू नको ना होऊस… आधीच मला उशीर झालाय…मी आवरते पटकन…तू कॉफी करून ठेव ना प्लिज….”
” हो..केव्हाही बनवून ठेवलीय…तू जा आवर पटकन…”
” अरे माझी स्वीट मम्मा….” असं म्हणून तिने आईचा एकदम गालगुच्चाच घेतला.
” बस बस…अगदीच लाडात नको येऊस… जा आवर पटकन…आई हसतच म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली.
रश्मी ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा अविनाश कोणाशीतरी फोनवर बोलत होता…रश्मीला पाहताच त्याने इशाऱ्यानेच तिला गुड मॉर्निंग केलं आणि पुन्हा आपलं लक्ष फोनवरच्या माणसाकडे वळवलं..रश्मी सुद्धा तिचा pc चालू करून कोणाचा मेल आलाय का ते चेक करू लागली…थोडा वेळ फोनवर बोलल्यावर अविनाशने थोड्या नाराजीतच फोन ठेवून दिला…त्याने फोन ठेवताच रश्मी म्हणाली…
” अरे अवि…सो सॉरी..मला यायला जरा उशीरच झाला…”
” ठीक आहे ग…त्यात काय एवढं..माझ्या दिवसाची सुरवातच नकार घंटेने झालीये…”
” का ?? तुला सकाळी सकाळी तोंड पाडायला काय झालं ??”
” अगं अजून एक हॉल वाल्याला फोन केला होता…त्याच्याशी बोललो सविस्तर…सगळं बोलून झालं आणि मग म्हणतो की सर सकाळी फ्री आहे हॉल…संध्याकाळी एक वाढदिवस आहे…मग हे आधी नाही का सांगता येत याला…मी सुरुवातीलाच विचारलं की संध्याकाळी फ्री आहे का म्हणून…”
” अरेरे…जाऊ दे आपण अजून प्रयत्न करू… आपण राजला विचारायचं का?? त्याच्याकडे नक्की कॉन्टॅक्टस असतील..आपल्या कंपनीशी कनेक्टेड…”
” अरे हो…हे आपल्या लक्षातच नाही आलं…आपण आपल्याच कॉन्फिडन्स मध्ये होतो….त्यालाच जाऊन विचारू..”
असं म्हणून त्याने रामसिंगला राज आलाय का म्हणून विचारलं…तर रामसिंग कडून त्यांना असं कळलं की राज चार दिवसांसाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला आहे…झालं…परत घोडं अडलं…
” रश्मी….आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल…”
” हो…करू रे आपण…तूच करशील बघ…मला विश्वास आहे तुझ्यावर….”
” मी काय म्हणतो…जर हॉल मिळत नाहीये आपल्याला… तर आपण एखाद्या ग्रीन पार्टी लॉन बघितला तर….रात्रीचीच आहे ना पार्टी…तर ते पण मस्त होईल..”
” क्लायंटला विचारावं लागेल ना आधी…त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर मग ठीक आहे..आणि लॉनवर असला तर मग आपल्याला आपल्यानुसार डेकोरेशन पण करता येईल…”
” हो…त्यांना कॉल करून विचारू आपण..की भेटून बोलायचं….म्हणजे सविस्तर बोलता येईल..”
” आय थिंक भेटून बोलावं…ते जास्त बेटर होईल…”
“ठीक आहे मग…आजच जाऊया मग…”
” चालेल….लंच नंतर जाऊ…तो पर्यंत काही लॉन ची माहिती काढू…त्यांचे फोटो वगैरे…म्हणजे त्यांना दाखवायला बरं पडेल…”
” येस…आता तरी जीव शांत झाला का तुझा?? कालपासून टेन्शन घेऊन बसलायस नुसता..” रश्मीने हसतच विचारलं..
” येतं ग मला टेन्शन…मला काम वेळच्या वेळी झालेलं आवडतं.. नाही झालं की मग माझी चिडचिड होते…आय नो की या बिझनेसमध्ये डोकं शांत ठेवावं लागतं…पण नाही जमत मला…जेवढं जमतं तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करतो मी…”
” हम्म…जमेल जमेल…मी आहे ना..शिकवेन तुला…”
” हाहा…बघ try करून…जमलं तर माझ्या साठी चांगलंच आहे….” असं म्हणून अविनाश त्याच्या pc कडे वळला..रश्मी मात्र काही सेकंद विचारात गढून गेली.
क्रमशः
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
सुंदर लेख प्रतिक👌👌👌
Thanks mavshi